उत्तरप्रदेशमधील निवडणुकीचा प्रचार जोमात सुरु असतानाच एकमेकांवरील टीकेची पातळीही आता घसरली आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट रावणाशी करत सर्वात मोठा रावण दिल्लीत राहतो असे वादग्रस्त विधान केले आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी एका सभेत मोदींवर निशाणा साधला. मोदी हे १३१ कोटी जनतेचे राजा आहेत. रावण दहनासाठी ते लखनौमध्ये जातात. पण ते हेच विसरुन जातात की सर्वात मोठा रावण लखनौमध्ये नव्हे तर दिल्लीमध्ये राहतो असे आझम खान यांनी म्हटले आहे. सभेतील भाषणादरम्यान हसणा-या एका व्यक्तीमुळे आझम खान संतापले होते. तू माझ्यावर हसतोय की स्वतःच्या नशिबावर. आज जग तुझ्यावर हसत आहे. आमच्यासारखी लोक तुम्हाला परत कधी मिळणार नाही असे खान यांनी सांगितले.

दरम्यान, शाहबादमधील सभेत आझम खान यांनी अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. मेरठमध्ये पदयात्रेत सहभागी न झाल्याने  खान यांनी अमित शहांवर टीका केल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयावर केंद्र सरकारवर टीका करताना आझम खान म्हणाले, पंतप्रधानांनी हुकूमशहा असल्यासारखा नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे २०० लोकांनी जीव गमावला. पण हुकूमशाह राजाने कोणतीही भरपाई दिली. आमच्या सरकारने प्रत्येकाला २- २ लाख रुपये दिले असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मोदींनी गेल्या दोन वर्षात ८० कोटी रुपयांचे कपडे बनवून घेततेल. अंबानी, अडाणी, विजय मल्ल्या यांच्यापैकी कोणी हे महागडे कपडे दिले हे मोदींनी सांगावे असे आव्हानच त्यांनी दिले. मोदींनी गरीबांच्या बँक खात्यात पैसे जमा केले नाही. याऊलट विजय मल्ल्याला कर्ज माफ केले असा आरोपही त्यांनी केला. जो पती आपल्या पत्नीसोबत आणि जो मुलगा आपल्या आईसोबत राहत नाही, याचे कारणही त्याने सांगितले पाहिजे असे आझम खान यांनी म्हटले आहे.