08 March 2021

News Flash

त्या रात्री

रात्रीचे दोन वाजले आणि अचानक दारावर टकटक झाली.

नागपूरचा कार्यक्रम करून मी त्या हॉटेलमध्ये आले होते. सारं आवरून झोपायला रात्रीचे दोन वाजले आणि अचानक दारावर टकटक झाली.. भीतीचं सावट मन व्यापू लागलं. मी काही दार उघडलं नाही. दहा मिनिटांनी टकटक बंद झाली पण फोनची रिंग वाजू लागली. भयाण शांततेला चिरणारा तो आवाज भयानक वाटत होता.. काय करावं.. उचलावा का फोन.. मन दोलायमान झालं.. शेवटी मी उचललाच फोन..

दिवाळीची सुट्टी सुरू झाली की त्या आसपास दर वर्षी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांसाठी खास मनोरंजनात्मक कार्यक्रम, ‘पोलीस शो’ होत असतात. पोलिसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अगदी भव्य प्रमाणात हे कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतांशी हे ऑर्केस्ट्रा असतात. त्यात २-३ गाणारे, डान्सर्स, मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक सर्व काही असतं, पण एखाद्या प्रसिद्ध गायक किंवा गायिकेला ते सेलिब्रिटी आर्टिस्ट म्हणून आवर्जून बोलावतात. तशी सेलिब्रिटी आर्टिस्ट म्हणून ‘पोलीस शो’मध्ये मी किती तरी वेळा गायले आहे. एका पाठोपाठ चार-पाच कार्यक्रम असतात. रोज संध्याकाळी ७ ला कार्यक्रम सुरू होतो आणि रात्री १० पर्यंत संपतो. मग तिथल्याच हॉटेलमध्ये राहायचं. सकाळी दुसऱ्या गावाला जाऊन दुसऱ्या हॉटेलमध्ये उतरायचं. आराम किंवा रियाज करायचा. संध्याकाळी तोच शो तिथे करायचा. तिसऱ्या दिवशी मुक्काम तिसऱ्या गावी. पण सेलिब्रिटी आर्टिस्टची व्यवस्था मात्र अगदी चांगली असते. प्रत्येक ठिकाणी चांगलं हॉटेल, स्वतंत्र गाडी, शिवाय दहा-साडेदहापर्यंत कार्यक्रम संपत असल्यामुळे जागरणाचाही त्रास नाही.
एकदा ‘पोलीस शो’साठी विदर्भातून बोलवणं आलं. अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि शेवटी नागपूर असे पाच कार्यक्रम होते. चंद्रपूरचा कार्यक्रम झाल्यावर हॉटेलात राहून शेवटच्या दिवशी नागपूरला सकाळी न जाता मी संध्याकाळी थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. कार्यक्रम संपल्यावर एका चांगल्या हॉटेलमध्ये माझा मुक्काम होता. रात्री आराम करून सकाळच्या विमानाने मला मुंबईला परतायचं होतं. नागपूरचा कार्यक्रम संपला. तो शेवटचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वाचे निरोप घेण्यात, गप्पांत, जेवणात बराच उशीर झाला. रात्री साधारण एकच्या सुमारास कार्यक्रमाचे आयोजक मला घेऊन नागपूरच्या एका हॉटेलात आले. रिसेप्शनवर मग माझं नाव, पत्ता लिहिला. रिसेप्शनवरच्या त्या हिंदी बोलणाऱ्या माणसाने मला तिसऱ्या मजल्यावरची रूम दिली. आयोजकाला दुसऱ्या दिवशी सकाळी एअरपोर्टला घेऊन जाण्यासाठी लवकर येण्याविषयी आठवण करून दिली आणि त्याचा निरोप घेऊन मी लिफ्टने तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत गेले. खोलीत गेल्यावर फ्रेश होऊन बेडवर आडवी झाले. पाच दिवस अगदी दगदगीत गेले होते. आता मात्र अगदी हलकं हलकं वाटत होतं. शिवाय उद्या सकाळी घरी पोहोचण्याचीही ओढ होतीच. लाइट डिम करून झोपणार इतक्यात दारावर टकटक झाली. ‘अरे, इतक्या रात्री कोण दार ठोठावतंय? आयोजकाला जाऊन तर अर्धा तास होऊन गेला होता. मग रिसेप्शनचा माणूस तर नसेल?’ विचार आल्याक्षणीच धाकधूक होऊ लागली. सर्व हॉटेल झोपी गेलं होतं. सर्वत्र अगदी सामसूम होती. इतक्या रात्री कोणाचं माझ्याकडे काय काम आहे, या विचाराने मी अस्वस्थ झाले. पण दार उघडायची हिंमत मात्र झाली नाही. बाहरेची व्यक्ती थोडय़ा अंतराने परत परत दारावर टकटक करीत होती पण भीतीने मी काही बोलले नाही आणि दारही उघडलं नाही, शेवटी दहा मिनिटांनी टकटक थांबली. पण माझी भीती काही थांबली नाही. त्या वेळी मोबाइल फोनही नव्हते. बेडवर नुसती बसून राहिले. मग थोडय़ा वेळातच फोन वाजायला लागला. २-३ वेळा वाजला, पण मी घेतला नाही. आता तर खात्रीच झाली की रिसेप्शनचा माणूसच मला फोन करीत असणार! त्या भयाण शांततेत फोनच्या िरगचा आवाज फारच भीतिदायक वाटत होता. पण हाही विचार येत होता, घ्यावा का फोन? कदाचित मुंबईहून, घरून काही बातमी असेल आणि ती आयोजकाने खालच्या माणसाला दिली असेल, त्यासाठीच कदाचित तो रिसेप्शनचा माणूस मला फोन करीत असेल! शेवटी धीर करून फोन उचलला. रिसेप्शनचा माणूस विचारत होता, ‘‘कैसी है आप?’’ मी चिडून विचारलं, ‘‘रात को दो बजे आपने ये पुछने के लिए मुझे फोन किया है?’’ पण माझं काहीही न ऐकता तो बोलू लागला, ‘‘इतकी रात्र झाल्येय, कोणी नाहीए, थोडी मजा करू या ना तुमच्या खोलीत.’’ आता मात्र संताप संताप होऊन मी फोन धाडकन ठेवून दिला. हद्द आहे या माणसाची! पाच मिनिटांनी त्याने परत फोन केला. या वेळी मात्र सारं बळ एकवटून मी फोन घेतला आणि त्याला बोलू न देता, सरळ थाप मारली, ‘‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मालूम है ना? वह चाचा है मेरे समझे?’’ आणि धाडकन फोन आदळला. डिस्कनेक्ट करून फोनचा रिसिव्हर काढून ठेवला. माय गॉड! काय प्रसंग आला होता माझ्यावर! सॉरी, बाळासाहेब अशा भयानक प्रसंगात सापडल्यामुळेच मी तुमच्या नावाचा उपयोग करून घेतला. त्या रात्री मी झोपू शकले नाही. सकाळी परत जायला निघाले तेव्हा त्या नालायक माणसाची डय़ुटी संपली होती आणि रिसेप्शनला दुसराच माणूस होता.
या प्रसंगातून मी एक धडा मात्र घेतला. कधीही कार्यक्रमाहून हॉटेलात येताना रात्री उशीर झाला तर आयोजकांना मी हॉटेलातल्या माझ्या खोलीपर्यंत यायला लावते व खोलीचे लाइट लावते, टॉयलेट उघडून आत कोणी नाही ना ते बघते. न जाणो, एखादा नराधम रात्रीच्या सुनसानवेळी झडप घालायला खोलीच्या आसपास टपून बसला असेल तर!

ऋणानुबंध
१९९६ मध्ये माझे सासरे गेले. जाण्यापूर्वीच लोणावळ्याचा बंगला त्यांनी मला दिला. सिद्धेश्वर सोसायटीतला तो बंगला अगदी प्रशस्त होता. खरं तर त्या बंगल्याचा खूप मोठा भाग आमच्याकडे होता. हा बंगला ब्रिटिश काळात बांधला गेला असावा. एका वकिलाने बांधला होता तो. ‘व्हिक्टोरिअन लुक’ होता त्या घराला. त्या बंगल्याच्या जोडीला थोडय़ा अंतरावर तिथे आणखी एक वास्तू होती. ती का बांधली असावी, हे माहीत नाही. पण नंतर ते मोठं आवार दोन्ही वास्तूंसकट एका शाळेनं घेतलं. त्यानंतर साधारण ६५ च्या सुमारास ती जागा सिद्धेश्वर सोसायटीने विकत घेतली. खूपच मोठं आवार, मोठे मोठे वृक्ष, फुलझाडं, असं त्याचं स्वरूप होतं. मग सोसायटीने आमचा म्हणजे मूळ बंगला तसाच ठेवून, आजूबाजूने जवळजवळ २०-२२ बंगले बांधले. मूळची झाडं न तोडता त्याला छान पार केले. आमच्या बंगल्यासमोर एक छोटसं देऊळ बांधलं. दुसरी वास्तू होती, तिथं इनडोर गेम सुरू केले. हौशी मंडळींनी ते बंगले भराभर विकत घेतले आणि ओसाड पडलेलं ते आवार माणसांनी फुलून गेलं. आमचा बंगला बरोबर मध्यभागी होता. त्याचं जुनं स्वरूप तसंच होतं. माझ्या सासऱ्यांनी तो १९६६ मध्ये खरेदी केला. जवळजवळ तीस र्वष वापरून त्यांनी तो मला दिला. मग आर्किटेक्ट असलेल्या माझ्या नवऱ्याने ९६ मध्ये त्या घराचं रूपच बदलून टाकलं. मूळचं खूप मजबूत आणि ऐसपैस असं बांधकाम होतं. त्यामुळे त्याचा प्रशस्तपणा तसाच ठेवून कुठलीही तोडफोड न करता त्यानं ते छान सजवलं. स्टेन्ड ग्लासचा वापर, हंडय़ा, ४ पोस्टर बेड, त्यावर सुरेख फिकट पिवळ्या रंगाची गोल मच्छरदाणी, कावर्ि्हग केलेलं डायनिंग टेबल, सुंदर लायटिंग, त्यामुळे ते घर एकदम सुंदर वाटू लागलं. अ‍ॅन्टिक वाटू लागलं. लग्नाचा २५वा वाढदिवस आम्ही सर्वाना बोलावून तिथेच साजरा केला. जवळजवळ १४ र्वष वापरून ते घर मी विकलं.
ते घर विकण्याच्या आधीची ही घटना! एके दिवशी दादरच्या वनिता समाजमधून मला फोन आला. त्यांना माझा बहिणाबाईंचा कार्यक्रम ठेवायचा होता. पण तेव्हा नेमकी मी लोणावळ्याला चालले होते. म्हणून मी त्यांना २-३ दिवसांनी यायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे तो महिलावर्ग मला भेटायला माझ्या घरी आल्या. कार्यक्रमासंबंधी बोलणं झालं. मग त्यातल्या एका बाईने मला विचारलं ‘‘उत्तराताई! लोणावळ्याला, का सहजच!’’ मी म्हटलं, ‘‘नाही, लोणावळ्याचा आमचा बंगला आहे, तिथे कधी कधी जातो आम्ही.’’ त्यावर त्या बाई म्हणाल्या, ‘‘लोणावळा म्हटलं ना की मला फार आपलेपणा वाटतो हो! अहो, माझ्या लहानपणीच्या किती तरी आठवणी लोणावळ्यातल्या आहेत. माझ्या काकांचा खूप मोठा बंगला होता तिथे! दर सुट्टीत आम्ही सर्व भावंडं तिथे जायचो. त्या वेळचा घाट तर खूपच कठीण होता! जीव मुठीत धरून आम्ही गाडीत बसायचो. एकदा घाट पार केला की कधी एकदा लोणावळ्याला पोहोचतो, असं होऊन जायचं. गेल्यावर झाडांच्या गार सावलीत जीव अगदी सुखावायचा! काकांनी आंब्याची, फणसाची, जांभळाची अशी खूप झाडं लावलेली होती. मग आंबा-फणसावर ताव मारणं, जांभळं वेचणं, बकुळीची फुलं वेचून त्यांचे गजरे करणं यात दिवस कधी संपायचा ते कळायचं नाही. बऱ्याच वेळा झाडांखाली सापसुद्धा दिसायचे. पण तरीही बागेतला कवठीचाफा, मोगरा, गुलाब तोडायला आम्ही धावायचो. रात्री रातराणीनं वातावरण अगदी धुंदकुंद व्हायचं. घर मोठं असल्यानं काकांनी गडीमाणसंही खूप ठेवली होती. बंगल्याच्या मागच्या बाजूलाच एक्स्टेन्शन असल्यासारखं होतं, तिथल्या खोल्यात ती राहायची. घरातल्या पावणेदोन फुटी रुंदीच्या मजबूत भिंती, सागाचं फॉल्स सिलींग, छतापर्यंत गेलेली लाकडी कपाटं, सगळं सगळं आठवतं मला! घरतले मोठे मोठे हंडे, हंडय़ा, गालीचे, झुंबरं, सगळं शोभून दिसायचं तिथे! काही वर्षांनी काका गेले, आमचीही लग्न झाली. त्यामुळे लोणावळ्याचा संपर्क तुटला. पण बालपणीच्या आठवणी मात्र कायम ताज्या राहिल्या. आता परत कधी लोणावळ्याला जायचा योग येतोय देव जाणे!’’ त्याचं बोलणं झाल्यावर मी म्हटलं, ‘‘अहो असं का म्हणता? तुम्ही आमच्या घरी या ना! आमच्या घराभोवतीसुद्धा पुष्कळ झाडं आहेत. जुन्या काळातलंच घर आहे आमचं! आणि ते माझ्या पतीने सजवलंयसुद्धा अगदी अँटिक स्टाइलनं!’’ त्यावर त्या आनंदून म्हणाल्या ‘‘चालेल चालेल! मी मुद्दाम येईन लोणावळ्याला! कधी जमेल माहीत नाही, पण पत्ता तर देऊन ठेवा!’’
मी पत्ता सांगू लागले, सिद्धेश्वर सोसायटी, न्यायमूर्ती तेलंग रस्ता, एस. टी. स्टॅण्डच्या जवळ.. पुढे माझा पत्ता पूर्ण व्हायच्या आतच त्या अत्यानंदाने ओरडल्या, ‘‘अहो न्यायमूर्ती तेलंग रस्ता.. न्यायमूर्ती तेलंग म्हणजे माझे काका! माझं माहेरचं आडनाव तेलंग! म्हणजे आसपासच तो बंगला असणार!’’ मी आश्चर्याने म्हटलं, ‘‘अहो तेलंगांच्याच बंगल्यात राहतो आम्ही.’’ आता हे ऐकून तर त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. म्हणाल्या, ‘‘आता तर मी तुमच्या म्हणजे आमच्या घरी येणारच.’’ असं बजावून त्यांनी माझा निरोप घेतला.
वाटलं, लोणावळ्याला विस्तीर्ण आवार असलेलं मोठे मोठे वृक्ष असलेलं, शेकडय़ांनी जुने बंगले आहेत. पण नेमका हाच बंगला त्यांचा निघावा? कदाचित वास्तुदेवताही आपल्या जुन्या ऋणानुबंधांना खुणावीत असेल.
uttarakelkar63@gmail.com उत्तरा केळकर संपर्क – ९८२१०७४१७३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 1:15 am

Web Title: renown marathi singer uttara kelkar sharing her life experiences
Next Stories
1 जीवदान
2 संगीत योगी
3 सलाम
Just Now!
X