एक दिवस अचानक सकाळीच तात्या- आमचे घरमालक आमच्या घरी आले. आल्या आल्याच म्हणाले, ‘‘या लतीचं काय करायचं गं? तुझा लळा आहे तिला. तूच तिला जप. अभ्यासात लक्ष घालायला शिकव ना. तुझं ऐकेल ती’’.

लती ही तात्यांची मुलगी. चौथीत शिकणारी. अतिशय हट्टी. मनांत असलं तर अभ्यास करायची. नाही तर कितीही ओरडलं तरी चेहऱ्यावरची सुरकुती न हलवता मख्खपणे ऐकून घ्यायची. कोणत्याही शिक्षेला घाबरायची नाही. तात्या वहिनींच्या कुठल्याही धाकदपटशाला दाद न देता स्वत:ला हवं असेल तेच करणं किंवा न करणं असा तिचा स्वभाव झाला होता. आमच्याकडे लती बऱ्याचदा येत असे. मुक्तपणे खेळत असे. आम्हा दोघांनाही तिचा लळा लागला होता. कदाचित आम्हा दोघांच्याही तिच्याशी बोलण्या- वागण्याच्या लाघवामुळे अन् मोकळेपणामुळे आमच्या सर्व सूचना निमूटपणे ऐकत असे आणि पाळतही असे.

याच कारणाने तात्या माझ्याकडे आले होते. हट्टी स्वभावामुळे बऱ्यापैकी हुशार असलेली लती शाळेच्या अभ्यासात मात्र मागे पडू लागली होती. शाळेतल्या अभ्यासाचे काही विषय तिला मी शिकवावे अशी तात्यांची इच्छा व आग्रहही होता. लहान मुलांची निरागसता लोभसवाणी असते. लहानग्यांचे बालपण अनुभवणं आणि त्यातून उत्कट आनंद मिळवणं यात परमावधीचं सुख दडलेलं असतं. मुठीतल्या वाळूप्रमाणे बालपण हातातून निसटून जातं आणि त्यातली गोड गंमतही हळूहळू लुप्त व्हायला लागते. लतीमध्ये आमचीही भावनिक जवळीक आणि मानसिक गुंतवणूक झालेलीच होती. माझ्या शिकवणीमुळे लतीची शाळेच्या अभ्यासात प्रगती होणार असेल तर लतीसाठी तसंच तात्या, वहिनींसाठी ती एक मोठी दिलासा देणारी बाब झाली असती, अन् आमच्यासाठी लतीचा बालपणाचा आम्हाला हवाहवासा वाटणारा सहवास आम्हाला आपसूक मिळाला असता.

दुसऱ्या दिवसापासून लतीची शिकवणी सुरू करण्याचं मी तात्यांना सांगून टाकलं. लहान मुलांचा हट्टीपणा मोठय़ा माणसांच्या अति धाकापोटी निर्माण झालेला असू शकतो. छोटय़ांच्या वागण्यात मोकळेपणा येऊ देणं हे लतीच्या बाबतीतही मला अपेक्षित परिणाम साधण्यासाठी आवश्यक वाटत होतं. लतीच्या बाबत तशी अडचण येण्याची शक्यता नव्हती, कारण लहानपणापासूनच लतीने आम्हा दोघांशी भावनिक जवळीक साधली होती. तिला तिच्या कलाने शिकवायचं ठरवलं.

सुरुवातीच्या काही दिवसात शाळेत जे शिकवलं असेल ते लतीला किती समजलं ते मी जाणून घेऊ लागलो. कठीण वाटणाऱ्या शाळेत शिकवलेल्या काही धडय़ांची घरी नीटपणे उजळणी करून घेणं अशी शिकवणीची सुरुवात केली. लती मुळात हुशार कॅटॅगरीतली होती, याचा मला अंदाज येऊ लागला होता. तिला खरं तर शिकवणीची जरूर नव्हती. तशी संधी लगेचच आपसूक चालून आली.

एक दिवस शिकवायला सुरुवात करण्याआधीच लता मला म्हणाली, ‘‘आज शाळेत दिशा शिकवल्या. तू दिशांची उजळणी घे.’’

‘‘पूर्वेकडे तोंड केल्यास पाठीमागची पश्चिम, उजवीकडची दक्षिण तर डावीकडची उत्तर.’’

अशा प्रकारे दहा वेळा दिशा घोकून पाठ करून घेतल्या. शेवटी तिच्याकडून दुसऱ्या दिवशी न चुकता दिशा म्हणून घेण्याचं आश्वासन त्या दिवसापुरती शिकवणीची सांगता केली.

दुसऱ्या दिवशी आल्या आल्या शाळेत शिकवल्याप्रमाणे दिशा म्हणायला सांगितल्या. एका क्षणाचाही विलंब न लावता लती म्हणाली, ‘‘पूर्वेकडे तोंड केल्यास पाठीमागची पश्चिम आणि दक्षिणेकडे तोंड केल्यास पाठीमागची उत्तर!’’

शाळेत व घरी घोकंपट्टी केल्याप्रमाणे उत्तर नव्हतं, पण ते चूकही नव्हतं तर बरोबरच होतं. उत्तर अंतर्मुख करणारं, गंभीरपणे विचार करायला लावणारं असं होतं.

लतीचं उत्तर ऐकून मला वेदांग नावाच्या लहानग्या मुलाची गोष्ट आठवली. वेदांग चौथीत इंग्रजी शाळेत शिकणारा मुलगा. अत्यंत व्रात्य आणि खोडकर. पण लतीसारखाच हुशार, पण अति-हुशार या कॅटॅगरीत सहज बसणारा. वेदांगच्या मस्तीखोर व्रात्यपणामुळे त्याचे आईबाबा कायम संत्रस्त असत. अर्थात मुलातल्या हुशारीने त्याचे लाडही होत असत. त्याला मात्र ओढ असे ती रोज काहीतरी नवीन शिकण्याची, नव्याचा हव्यास होता त्याला. त्याचे आईबाबा वेदांगला रोज काय नवं द्यायचं या विवंचनेत असायचे.

असेच एक दिवस वेदांगचे बाबा ऑफिसातून थोडं लवकर घरी आले. आल्या आल्या वेदांगने त्यांचा ताबा घेतला. नेहमीच काहीतरी नवीन देण्याची भुणभुण सुरू झाली. जवळच्याच टेबलावर त्या दिवसाचा इंग्रजी पेपर पडला होता. वरच्याच पानावर जगाचा नकाशा होता. नकाशा बघून वेदांगच्या बाबांना एक नामी कल्पना सुचली. त्यांनी जगाच्या नकाशाचे लहान चौकोनी तुकडे केले आणि ते पुन्हा व्यवस्थित बसवून जगाचा नकाशा पूर्ववत बसवायला वेदांगला त्यांनी सांगितले. यापूर्वी वेदांगने जगाचा नकाशा कधीही पाहिलेला नव्हता वा शाळेतही दाखवला गेला नव्हता. तेव्हा जगाचा नकाशा जोडण्यात वेदांगला एखाददोन तास तर नक्कीच लागतील आणि तेवढा काळ तरी वेदांगच्या भुणभुणीतून आपली सुटका होईल या कल्पनेनं वेदांगचे बाबा सुखावून गेले.

पण घडलं विपरीतच. वेदांग २०-२५ मिनिटांतच परत आला, तोदेखील जगाचा नकाशा पूर्ववत होता तस्सा बसवून! वेदांगचे बाबा आश्चर्यचकित झाले. त्यांनाही कळेना एवढय़ा कमी वेळात नकाशा होता तसा याने कसा काय बसवला असावा? विचार करण्यासारखंच घडलं होतं. अर्थात याचं उत्तर फक्त वेदांगच देऊ शकणार होता. त्याचं उत्तरही चक्रावून टाकणारं असंच होतं.

वेदांग म्हणाला, ‘‘मी जगाच्या नकाशाचे तुकडे नीट निरखून पाहिले. पण मला काहीच कळेना. तुकडे थोडे उलटसुलट करून बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की दुसऱ्या बाजूला माणसाचं चित्र आहे.’’

पुढचं उत्तर त्याने इंग्रजीत दिले, ”It was very easy to set right the man first and the world was automatically set right on other side”. सर्वानाच अंतर्मुख व्हायला लावणारं असं हे उत्तर होतं. Universal truth!

लहानग्यांची कल्पनाविश्व वेगळं असतं. निरागसतेनं भरलेलं असतं. काही वेळा मोठय़ांनाही त्यातून चांगला बोध घेता येईल असं सत्य आपसूक उघड होऊ शकतं. मुलांमध्ये दडलेली अद्भुत विचारशक्ती लतीच्या शिकवणीमुळे मला अनुभवाला आली.
प्र. अ. जोशी – response.lokprabha@expressindia.com