रामू सायकलवरून डोंबिवलीतल्या विष्णुनगरमधून चालला होता. मध्येच रस्त्यावरील खड्डय़ांचे प्रमाण जास्त दिसल्यावर तो सायकलवरून उतरून सायकल हाताने ढकलत निघाला. सुरुवातीला त्याला रस्त्यांत खड्डे की खड्डय़ांत रस्ता हेच कळेनासे झाले. प्रयत्न करत खड्डय़ांना चुकवत चुकवत जात असताना सायकलसकट घसरून एका खड्डय़ात पडलाच. स्वत:ला सावरत अन् खड्डय़ाला बडबडतच तो कसाबसा उभा राहिला.

खड्डय़ातून एक पाय बाहेर टाकणार तोच त्याला आवाज ऐकू आला. ‘‘चूक तुमची आणि शिव्या आम्हाला कशाला?’’ त्याने आजूबाजूला वळून बघितले, पण कोणीच दिसत नव्हते. आपल्याला भास वगैरे झालाय की काय असे रामूला वाटायला लागले. परत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा एकदा आवाज आला, ‘‘अरे! मी बोलतोय. ज्या खड्डय़ात तू पडलास ना? तो मी हा खड्डाच बोलतोय. नवल वाटले ना तुला? अरे, जो पडतो तो आम्हालाच बडबडत बसतो. नाही तरी तुम्हा माणसांची रीतच आहे तशी. चुकी आपली असो वा नसो, दुसऱ्याच्या नावाने शिमगा करायचा. काय रे! खड्डय़ात काय मी तुला बोलावलेले? स्पष्ट दिसताना स्वत:च्या चुकीने माझ्याकडे आलास आणि वर मलाच बोल लावतोस. किती दिवस हे आम्ही खड्डे कुटुंबाने सहन करायचे. म्हणून आज बोलायचेच ठरवले.’’

रामू आपले ऐकतोय हे पाहिल्यावर खड्डय़ाने बोलायला सुरुवात केली. ‘‘तुला माहिती आहे का, आमचा इतिहास खूप जुना आहे? तुम्हा मानवजातीच्या आधीचा आमचा जन्म आहे. सर्व देवदेवतादेखील आमचे महत्त्व जाणून आहेत. म्हणून त्यांनी झाडे लावताना झाडांबरोबर आमचीही पूजा केली. रामायणातील सीतामाईचे रक्षण आम्हीच केले होते. लाक्षागृहातून पांडवांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हीच मदत केली. कर्णाच्या रथाचे चाक ऐन वेळी आम्ही गिळंकृत केले म्हणून तर अर्जुनाचा विजय झाला, नाही तर पांडवांचे काही खरे नव्हते. इतिहासातल्या कित्येक युद्धांत आमचा सिंहाचा वाटा आहे; पण आमच्या या कर्तबगारीची कुठेच नोंद नाही. तुमच्या पूर्वजांनी आमच्याकडे सोपवलेला ऐतिहासिक ऐवज आम्हीच व्यवस्थित जपून ठेवला आहे. अरे! आमचे तुमच्यावर इतके अनंत उपकार आहेत, पण तुम्हाला त्याची जराही जाणीव नाही.’’

रामूला खूप गोंधळल्यासारखे झाले. क्षणभर त्याला आपण काय ऐकतोय हेच कळेना. त्याने खड्डय़ाकडे पाहून हसत हसत विचारले, ‘‘अरे उपकार? कसले उपकार? इथे रोजच खड्डय़ात पडून होणारे अपघात वाढत चालले आहेत आणि तू उपकाराची भाषा बोलतोयस. अरे! तुम्हाला संपविल्याशिवाय हे रात्रंदिवस होणारे अपघात संपणारच नाहीत.’’ खड्डा रामूला मध्येच थांबवत म्हणाला, ‘‘हे बघ! आम्हाला संपविण्याची भाषा तू आता विसर. जेव्हा तुम्ही आम्हाला निर्माण केले ना तेव्हा लगेचच याची काळजी घेतली पाहिजे होती; पण ते तुम्ही सोयीस्कररीत्या विसरलात आणि मग तुमचे महत्त्व वाढवायची वेळ येते तेव्हा तुम्ही आम्हाला संपवायची भाषा करता. आमची संख्या तुमच्या लोकसंख्येसारखीच वाढत चालली आहे. रस्त्यारस्त्यांवर तसेच सोडल्याने आमच्या लहानमोठय़ा भावांचे साम्राज्य पसरत चालले आहे.’’

थोडेसे थांबून खड्डय़ाने आपले पुराण सुरू केले. ‘‘काय रे! उपकार कसले म्हणून आम्हालाच विचारतोस? पाण्यासाठी विहीर खणताना आम्हीच तुमच्या मदतीला धावून येतो ना? फळबागा, फुलबागा फुलवताना आमचीच गरज लागते ना? अरे! हे मोठमोठे पाण्याचे तलाव आहेत ना.. तेपण आमचेच बांधव आहेत. तुमचे जीवन समृद्ध करण्यासाठी आम्हीच कारणीभूत आहोत बरं का! खरं सांगायचं तर तुमच्या सुखी जीवनाची नाळ आमच्याशी जोडलेलीच आहे. आमच्याशिवाय तुमचे जीवन अशक्यच आहे. आता आणखी एक गंमत सांगतो. तुमच्या आयुष्यात कधी कधी वाईट किंवा दु:खाचे प्रसंग येतात. देवाने तुम्हाला एवढी चांगली बुद्धी दिली आहे, पण त्याचा वापर करायची अक्कल कुठे आहे? मग ते दु:ख विसरण्यासाठी भरपूर दारू पिता. घरी जायचा रस्ता विसरून आमच्याच आश्रयाला येता. आता चूक तुमची, दोष आम्हाला.’’ रामूने गडबडून विचारले, ‘‘दोष तुम्हाला कसा काय?’’ खड्डा जोरात हसून म्हणाला, ‘‘अरे! अशा या दीन अवस्थेत तुम्हाला तुमची स्वत:ची माणसंपण घरात घेणार नाहीत या भीतीने आमच्या आश्रयाला येता. रात्रभर निराशेने दु:खाचे जे बोल बरळत असता ते आम्ही शांतपणे ऐकून घेतो. परत सकाळी भानावर आल्यावर झिंगत झिंगत आम्हालाच शिव्या घालत घरचा रस्ता धरता. आहे की नाही गम्मत?  म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ हीच तुमची प्रवृत्ती.’’

थोडेसे थांबून खड्डा परत सांगायला लागला. ‘‘हे बघ! भिंतीला जसे कान असतात तसे आम्हालाही कान आहेत. मोर्चा, मिरवणुका, धरणे धरण, वेगवेगळी आंदोलने आणि अशाच काही प्रसंगांत तुमची आपापसात जी खलबते चालतात ती सर्व आम्ही ऐकतो. आम्ही बोलायचे ठरवले आणि सत्य काय ते बाहेर पडले तर तुमची काय अवस्था होईल माहीत आहे का? अरे! बोलायचे एक आणि करायचे वेगळेच ही तुमची नीतिमत्ता. जनावरे तरी प्रामाणिक असतात, पण तुम्ही रॉयल्टी मिळाली की लॉयल्टी विसरता. कोण तुम्हाला वापरतोय किंवा कोण तुम्हाला विकत घेतोय याचे संपूर्ण भान विसरलेले बेइमानच.’’

रामू ऐकतोय हे पाहून खड्डा पुढे म्हणाला, ‘‘आता रस्त्यारस्त्यांत पाण्याचे पाइप, गॅस लाइन, टेलिफोन लाइन वगैरे वगैरे कारणांसाठी आमची मदत घेता, पण काम झाल्यावर आम्हाला तसेच रस्त्यावर सोडून देता. रोजच्या रोज कसले तरी मोर्चे, मिरवणुका अन् त्यानंतरची भाषणे चालू असतात. त्यामुळे आमच्या संख्येत वाढ होतच राहिली आहे. आमची संख्या वाढवायची नसेल तर प्रथम हे मोर्चे, मिरवणुका, भाषणे बंद करा. ते शक्य आहे का? अरे! आम्हाला संपविण्यापेक्षा किती तरी असे विषय आहेत ते संपवणं काळाची गरज आहे. भ्रष्टाचार, लहान मुले- मुली, बायकांवर होणारे अत्याचार, निरक्षरता, अंधश्रद्धा, बेकारी असे किती तरी महत्त्वाचे विषय आहेत, पण तुम्ही फक्त घोषणा करता अन् विसरून जाता. रोज नवीन नवीन प्रश्न येतात अन् जुने होतात तसेच ते सोयीस्करपणे विसरले जातात. बिच्चारा तो शेतकरी, तुमच्यासाठी एवढा राबराब राबतो, पण तुम्हाला त्या शेतकऱ्याचे काही आहे का? अरे! ज्यांच्यामुळे तुमच्या ताटात जेवण येते तो उपाशीपोटी मरू लागलाय याचा कधी तरी तुम्ही विचार करता का? कोणते तरी निमित्त पुढे करायचे अन् आपली पोळी भाजायची ही तुमची रीत. अरे! आम्ही जमिनीवर एकाच जागी असलो तरी जमिनीवरच्या सर्व खड्डय़ांबरोबर आमचे संवाद होत असतात. तुमच्या मोर्चे, मिरवणुका, सभांना जे लोक येतात ते आमच्या शेजारीच उभे राहून बोलतात, ते आम्ही लक्ष देऊन ऐकत असतो. सभा, मोर्चाना येणाऱ्यांच्या झेंडय़ांचे रंग वेगवेगळे असले तरी त्यांच्या वेदना एकच असतात. दु:खी, पीडित वेगवेगळे असले तरी त्यांच्या अश्रूंतील असहायता एकच असते. खोटय़ा आशेवर जगत असले तरी आजही उपेक्षित ते उपेक्षितच राहिले आहेत, हे विसरता येण्यासारखे नाही.’’

खड्डय़ांचे पुराण ऐकून रामू विचारात पडला. थोडा वेळ विचार करून रामूने खड्डय़ाला विचारले, ‘‘अरे! तू सांगतोस ते खरे आहे, पण तुमच्या या वाढत्या संख्येमुळे होणारे अपघात कमी करायचे असतील तर तुम्हाला संपवायलाच पाहिजे ना?’’ खड्डा जोरात हसून म्हणाला, ‘‘तू म्हणतोस ते खरेच होण्यासारखे आहे का? तुमच्या आयुष्यात रोज एवढे नवीन नवीन प्रश्न निर्माण होतायेत, त्यातला एक तरी प्रश्न पूर्णपणे मिटला आहे का? बऱ्याच जणांचे अस्तित्व या नवनवीन उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांवरच असते.’’

रामू संभ्रमात पडलेला पाहून खड्डा हसत हसत म्हणाला, ‘‘अरे! आमचे हे रस्त्यारस्त्यांवरचे साम्राज्य वाढायला तुमच्यातला स्वार्थीपणा, कामचुकारपणा, भोंदूपणा, निष्काळजीपणा अन् सोकावत चाललेली भ्रष्टाचारी वृत्तीच जबाबदार आहे. आता तू निघणार तर निघ; पण जाता जाता तुमच्या समस्त मानवजातीला आमचा निरोप सांग की, आम्हालापण तुमच्यासारखी धमकी देता येते. उगीच ऊठसूट आम्हाला संपवायची भाषा कराल तर तुमच्याच भाषेत सांगतो की, ‘हमसे जो टकरायेगा.. मिट्टी में मिल जायेगा.’ हा.. हा.. हा..’’’
गुरुप्रसाद शिरसाट – response.lokprabha@expressindia.com