News Flash

विलोभनीय हिवाळा

हळू हळू थंडीच्या लाटा जोर धरू लागतात व हिवाळा ऋतूचे राज्य सुरू होते.

आश्विन महिना सरत आला की, वतावरणात गारवा जाणवू लागतो. हळू हळू थंडीच्या लाटा जोर धरू लागतात व हिवाळा ऋतूचे राज्य सुरू होते. ओलसर पावसाळा, दाहक उन्हाळा यापेक्षा गोड गुलाबी थंडीचा हिवाळा त्याच्या गुणवैशिष्टय़ामुळे सगळ्यांनाच आवडतो. लोभसवाणा वाटतो व प्रसन्नमय भासतो. हिवाळ्यात निसर्ग सौंदर्याने सृष्टी खुलते. एरवी नकोनकोसे वाटणारे ऊन त्याच्या उबदारपणामुळे हवेहवेसे वाटू लागते. कोवळे उन्हे अंगावर घेण्यासाठी जो तो आतुर होतो. उत्सुक असतो. गरम कपडय़ातील उबदारपणा शरारास सुखावतो. हिवाळ्यात दुपारच्या सावल्या मोठय़ा व घनदाट पडतात. संध्या समयी अंधाऱ्या सावल्या लवकर पसरतात. थंडीचा कडाका, रात्रीचा गारवा, विलोभनीय धुक्याचा झिरझिरीत विस्तीर्ण पर दवबिंदूचा ओलावा आकाशाचे बदलते रंग या निसर्ग चमत्काराने चित्तवृत्ती खुलतात. हिवाळ्यापूर्वी समाधानकारक पाऊस झाला असेल तर थंडीच्या मोसमात सृष्टी सौंदर्याला झळाळी पोचते. खळाळत्या नद्या, विहिरी पाण्याने तुडुंब भरलेला तलाव खटय़ाळ निर्झर हिरवी वृक्षराजी, पिवळी धमक गेंडेदार झेंडूची शेतं, सुगंधी रंगीबेरंगी ताटवे शेवंती, पारिजातकाचा बहर ऊस, बोरं, आवळा, हरभरा, गाजर, संत्री, मोसंबी अशी आस्वादक फळफळावळे हिरवा भाजीपाला यांच्या लयलुटीने तसेच सुक्या मेव्याच्या लाडवांनी खवय्यांची चंगळ होते. दसरा, दिवाळी, ख्रिसमस, चंपाषष्ठी, संक्रांत असे उत्साहवर्धक आरोग्यकारक व आनंददायी सणामुळे जीवनात रंगत वाटते. या दिवसातील पानगळतीने त्यांची जागा घेणारी टवटवीत कोवळी नवीन पालवी पुनरुपी जननम्  पुनरपी मरणं! हे वैश्विक सत्य हिवाळा सिद्ध करून जातो.

व्यायामप्रेमी मंडळींना हिवाळ्याचे विशेष आकर्षण असते. भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत व्यायाम करताना त्यांच्या अंगात शिगोशिग उत्साह भरलेला असतो. या दिवसात मॉर्निग वॉक करणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ होते. हौशी पर्यटकांना हिवाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी भेटी देऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्याची सुवर्णसंधी चालून आलेली असते. तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त असल्याने लग्न समारंभाची धामधूम सुरू होते. एकंदरीतच हिवाळा ऋ तू सुंदरता गूढरम्यता, खानपान, पर्यटन, व्यायाम, सणसमारंभ यांची रेलचेल असलेल्या उत्साह, आनंद, धामधूम यांनी परिपूर्ण ऋ तू असला तरी नाजूक प्रकृतीच्या थंडी सहन न होणाऱ्या व्यक्तीकडून ‘आग लागो त्या थंडीला’ अशी दूषणे लाभत असलेला ऋ तू असतो. तरीपण हिवाळा निश्चितच चित्ताकर्षक ऋ तू असतो. हेच खरे.
विजय भदाणे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:23 am

Web Title: winter
Next Stories
1 सी.एल.
2 ‘ससा-कासव’ शर्यत
3 आता बुजवू नका-खोदा!
Just Now!
X