03 December 2020

News Flash

कलेनं तारलं..

फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरीत्या शाळा सोडावी लागली.

‘‘फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरीत्या शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी काहीही केलं. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केलं. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या.  रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचं. मी खूप लोकप्रिय झाल्यावर शाळेनं माझा सत्कार केला विचारलं, ‘आम्ही तुझ्यासाठी काय करू.’ मी म्हणालो, ‘फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या. मी त्यांची फी भरेन.’ सर म्हणाले, ‘आम्ही यापुढे असं होऊ देणार नाही.’ खूप समाधान वाटलं.‘‘

आम्ही मूळचे आंध्र प्रदेशचे. माझे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा. आम्ही माटुंग्याच्या लेबर कॅम्प, धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचो. वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचं कुटुंबही तिथेच राहायचं. म्हणजे त्या घरात कमीत कमी आठ माणसं नक्की राहायची. ते चार आणि आम्ही चार. आमच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होतं. पण मराठी माणसंही भरपूर होती. सतत काही ना काही चालायचं. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नंही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकर चालू असायचा व त्यावर गाणी वाजत राहायची. सर्व दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी! तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व आम्ही सारे एकत्र बसून तो पाहात असू. मी तर एका जागी न बसता अलीकडून पलीकडून असा दोन्हीबाजूने पाहायचो. या वातावरणाचा माझ्यावर नकळत परिणाम घडला.
असं सारं ठीक सुरू असताना वडिलांचं दारूचं व्यसन वाढलं व नशिबाचं चक्र फिरलं. आम्ही किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आलो. अक्षरश: फरफट सुरू झाली. मी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होतो. सात रुपये फी होती तीही देणं परवडत नव्हतं. महिनाअखेरीस बाकावर उभं राहायचं किंवा वर्गाबाहेर जायचं. कधी कधी वेताच्या छडय़ा मिळायच्या. त्या वयातच मला जबाबदारीची जाणीव झाली होती. मी छान नाचायचो, नकला करायचो. रेकॉर्ड डान्स करायचो. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचो. त्यामुळे अर्थात रात्री घरी उशिरा पोचायचो. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला उशीर. मग ओरडा. तसा मी मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचो. वर्गात अभ्यासात यथातथाच होतो. पण मनात आलं तर काहीही करायचो. नेहमी पहिला येणाऱ्या मुलानं रुबाब दाखवला, तेव्हा मी त्याला पुढच्या सहामाहीत भरपूर अभ्यास करून वर्गात दुसरा येऊन दाखवलं. सातवीत असताना एकदा असाच रात्री रेकॉर्ड डान्स करून घरी आलो. उशीर झाला. त्यामुळे सकाळी रात्रीचे कपडे न बदलता तसाच शाळेत धावलो. उपमुख्याध्यापकांनी बोलावलं व विचारलं, ‘‘युनिफॉर्म का घातला नाहीस?’’ इतर मुलांचं नेहमी जे उत्तर ऐकायचो, ते उत्तर ठोकून दिलं, ‘‘लॉण्ड्रीत दिलाय.’’ ते म्हणाले, ‘‘अच्छा, वडिलांना दारू प्यायला पैसे आहेत, कपडे लॉण्ड्रीत द्यायला पैसे आहेत आणि शाळेची फी भरायला पैसे नाहीत.’’ त्यांनी मला वेताच्या छडीने फोडून काढला. मला खूप वाईट वाटलं, रागही आला. त्या तिरमिरीत मी मित्रांचा निरोप घेतला व शाळा सोडली. माझ्या वर्गशिक्षिका दमयंती टीचर होत्या. त्यांना हे कळलं. त्यांनी मला ‘‘तुझी फी भरते, पण शाळा सोडू नकोस’’, असं सांगितलं. पण मी गेलोच नाही. त्या आता अमेरिकेत असतात. मी त्यांना तिथे भेटून आलोय.
शाळा सोडली. पुढे मी विनोदवीर म्हणून प्रसिद्ध झालो. शाळेला जेव्हा हे कळलं, तेव्हा १९८३ साली, मला बोलावून माझा सत्कार केला. शाळेला त्या दिवशी सुट्टी दिली, तेच उपमुख्याध्यापक आता मुख्याध्यापक झाले होते. ‘‘मी शाळेकरता काय करू शकेन,’’ असं त्यांनी मला विचारलं. मी शाळेकरता स्वखर्चाने दोन कार्यक्रम केले. त्यातून वीस लाख रुपये जमले. त्यात त्यांनी नवी इमारत बांधली व कॉलेज सुरू केलं. मग शाळेनं मला विचारलं, ‘‘आम्ही तुझ्यासाठी काय करू?’’ मी म्हणालो,‘‘फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या. मी त्यांची फी भरेन.’’ सर म्हणाले, ‘‘आम्ही असं होऊ देणार नाही पुन्हा.’’ खूप समाधान वाटलं.
तर मी शाळा सोडली. जगण्यासाठी काहीही केलं. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केलं. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचं. आवश्यक तेवढे पैसे घरात खर्च करून उरलेल्या पैशात आजूबाजूला कोणी उपाशी-तापाशी नाही ना हे पाहायचो व त्यांना शक्य ते खाऊ घालायचो. स्वस्ताई होती तेव्हा. चार आण्यात पोट भरायचं. आज मागे वळून बघताना आश्चर्य वाटतं, की १२-१४ वर्षांच्या त्या वयात देवानं ही बुद्धी कशी दिली? तो कृपाळू आहे, हे खरं.
नाचता नाचता माझं नाव होऊ लागलं. गल्लीबाहेर लोक ओळखू लागले. आमच्या मित्रांच्या टोळीने ‘सूरज कला झंकार’ नावाची डान्स पार्टी बनवली. त्यांच्यासोबत व बाहेरही मी नाच करू लागलो. थोडेसे जास्त पैसे मिळू लागले. वयाच्या सतराव्या वर्षी मी गल्लीतल्या गणपती उत्सवात पहिली जाहीर मिमिक्री केली. लोकांना ती खूप आवडली. तेव्हा तीस रुपये मिळाले. ते मित्रांत वाटून टाकले. मला पैशाचं महत्त्व वाटत नाही. मित्र हवेत.
१८ व्या वर्षी मला ‘हिंदुस्थान लिव्हर’मध्ये नोकरी लागली. सातवी नापास मुलाला जे काम मिळणार तेच मिळालं- स्वीपरचं. झाडू मारून सुरुवात झाली. फरशा पुसायच्या वगैरे कामं असायची. त्यात एक काम होतं रसायनांचे ड्रम उघडण्याचं व ते साफ करून ठेवण्याचं. पहिल्याच वेळी ड्रम उघडला व तो पुसला, तेव्हा मी त्यात डोकं घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. मला गम्मत वाटली. मी पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसं करू लागलो. मला जाणवलं, त्यामुळे माझ्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. माझ्याबरोबर कोल्हापूर साताऱ्याकडचे कामगार होते. ते म्हणायचे, ‘‘याच्या नादी लागू नगा रं बाबा. हा येडा हाय. अंगावर यील.’’ एकदा ड्रममध्ये तोंड घालून आवाजाचा रियाज करून झाला व मागे वळून पाहिलं तर एक कामगार उभा होता, तो विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहात घाबरून पळून गेला. मग आमच्या सुपरवायझरनं मला बोलावलं व विचारलं, ‘‘ये क्या कर रहा है.’’ मी म्हणालो, ‘‘मी मिमिक्री करतो. त्याची ही प्रॅक्टिस आहे.’’ त्याचा विश्वास बसेना. शेवटी मी त्याला तऱ्हे-तऱ्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला व म्हणाला, ‘‘यार तू तो जबरदस्त है। तेरे को अपने गॅदरिंग में चान्स देते है।’’ ..आणि मी रंगभवनला आमच्या संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून सारं दणाणून सोडलं. क्षणात लोकप्रिय झालो. मग मला कंपनीत जरा कमी कष्टाचं काम मिळू लागलं. एकदा आमचे जनरल मॅनेजर काही परदेशी पाहुण्यांना घेऊन आले. जनरल मॅनेजर म्हणजे नऊ हजार लोकांचा पोशिंदा, काय त्यांचा रुबाब! त्यांनी मला सफाई करताना पाहिलं व जोरात ओरडले, ‘‘अरे जॉनी, कैसा है?’’ माझ्याबद्दल त्या पाहुण्यांना काहीतरी चांगलं सांगितलं. माझा भाव कंपनीत वधारला. काही जण तर म्हणाले, ‘‘इथं काय करतोस. पिक्चरमदी जा, मेहमूदसारखं कर.’’ सोपं नव्हतं ते. मी दुपारच्या वेळात नकला करून मित्रांना हसवायचो. एकदा मी आमच्या साहेब लोकांची नक्कल करत होतो व कामगार मित्र तो साहेब कोण ते ओळखत होते. आमच्या युनियनच्या लीडरनी, सुरेश भोसलेंनी ते पाहिलं व ते म्हणाले, ‘‘अरे याने तर लीव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लीव्हर म्हणायचं.’’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात मी माझी ओळख जॉनी लीव्हर करून दिली व तेव्हापासून आजतागायत मी माझं व्यावसायिक नाव तेच ठेवलंय. पुढे एकदा हे जनरल मॅनेजर मारबलीसाहेब व मी, कल्याणजी-आनंदजीभाईंच्या कार्यक्रमात नागपूरमध्ये एकत्र होतो. त्यांच्या शेजारी मी खूप अवघडून बसलो होतो. ते म्हणाले, ‘‘अरे तू आता मोठा माणूस झालास.’’ पण माझं अवघडलेपण दूर झालं नाही. आजही ‘लीव्हर’मधले माझे मित्र घरी येत असतात. शेवटी माझं नाव, त्यांनी मला दिलंय.
मला नोकरी लागल्यावर वडिलांनी नोकरी सोडली. सात वर्षांनी मी नोकरी सोडली. पैसे बऱ्यापैकी मिळत होते. माझी पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. मग त्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं. गावाकडे त्यांनी एक मुलगी पाहून ठेवली होती, त्यांनी मला तिकडे बोलावलं. पण त्या मुलीच्या वडिलांनी मला नोकरी नाही म्हणून नकार दिला. मी परत आलो. तर इकडे मुलीच्या वडिलांना त्यांच्या जावयांनी सांगितलं, काय चूक करताय का तुम्ही. मुलगा खूप टॅलेण्टेड आहे. मुंबईत त्याचं नाव आहे. मग पुन्हा मला बोलावलं गेलं. मी नाराजीनंच तिथे गेलो. पण त्याच मुलीशी वडिलांच्या सांगण्यानुसार लग्न केलं, सुजाता तिचं नाव. आज आमच्या लग्नाला ३१ र्वष झाली. आम्ही समाधानी आहोत. जी रुखीसुखी रोटी मी मिळवत होतो, तीच रुखीसुखी सांभाळत तिनं संसार केला. घरच्या साऱ्या चिंता तिनं हसतमुखानं वाहिल्या. लग्नानंतर आम्ही अ‍ॅन्टॉप हिलवर राहायला गेलो आणि आता गेली दोन दशकं आम्ही ओशिवऱ्याच्या घरात आहोत. जेस्सी आणि जॅमी अशी दोन मुलं आम्हाला आहेत.
आमच्या घरात कलेची परंपरा तशी नाहीच, पण माझ्या आईला अभिनयाचं अंग आहे. एकदा आमच्या झोपडपट्टीतल्या घरी एक ब्रीफकेस घेतलेले सुटाबुटातले गृहस्थ येऊन गेले. त्यांचं नाव ती विसरली. तेव्हा फोनही प्रचलित नव्हते. मी अस्वस्थ झालो. कोण आलं असेल मला भेटायला. तेव्हा तिनं मला त्यांची नक्कल करून दाखवली. मी लगेच ओळखलं, ते शो अ‍ॅरेंजर कालिदास होते. कदाचित अभिनयाचा गुण आईकडून माझ्यात आला असावा.
कल्याणजी-आनंदजी यांच्याबरोबर मी मिमिक्री करत असे. त्यांच्याबरोबर र्अध जग पाहिलं. त्यांनीच मला पहिली लंडन, दुबईची सफर घडवली.
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मी पहिल्यांदा अमेरिका पाहिली. एकदा, १९८० मध्ये कल्याणजीभाईंच्या येथे मी कॅरम खेळत होतो. त्यांच्याकडे एक दाक्षिणात्य निर्माता आला. त्याला हिंदी चित्रपटासाठी एक मिमिक्री कलाकार हवा होता. कल्याणजीभाईंनी माझ्याकडे बोट दाखवलं. काही कळायच्या आत, माझ्या हातात मद्रासचं विमानाचं तिकीट आलं. मी बावचळून गेलो होतो. कॅमेरा कधी पाहिलेला नाही. पुरती घाबरगुंडी उडालेली. दुसरं, म्हणजे त्या सेटवर सारखी धावपळ सुरू होती. जो तो आपल्या कामात, मला न कळणाऱ्या अगम्य भाषेत बोलत होते. त्यात ‘‘बॉम्बे आर्टिस्ट आया है,’’ असं चालू होतं. पळून जावंसं वाटत होतं. तेव्हा, मनात दुसरा विचार आला, कल्याणजीभाईंचा शब्द पडलाय, तो वाया घालवायला नको. मग रिहर्सलच्या वेळी मी साधीशी मिमिक्री करून दाखवली. तर दिग्दर्शक ‘व्हेरी गुड’ म्हणाले. ‘आता दाखवलं ते व्हेरी गुड काय. मग माझ्याकडचं चांगलं दाखवतोच,’ असा विचार करून मी दुसरी नक्कल दाखवली. ते खूप खूष झाले.
माझी चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे मी मिमिक्रीच करायचो. मला अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात मी माझे रंग भरले. त्यानंतर लोकांना वाटायला लागलं, ये बच्चा थोडी अ‍ॅक्टिंग भी करता है. मी एन. चंद्रांच्या आजूबाजूला असायचो. तिथे मला कळलं की दिग्दर्शन काय असतं, अ‍ॅक्टिंग काय असते, लेखन कसं करायचं. ‘तेजाब’साठी मी थोडंसं लेखनही केलंय. मग अब्बास-मस्तान यांनी मला ‘बाजीगर’ दिला. ‘बाजीगर’नंतर मला वेगळीच ओळख मिळाली. मग मी सुटलोच. १९९६-९७ पर्यंत मी जवळजवळ पावणेतीनशे फिल्म केल्या. नंतर मी कामाच्या बाबतीत चोखंदळ होत गेलो. आतापर्यंत चारशेहून अधिक चित्रपट मी केलेत. मध्यंतरी काही काळ माझ्या कारकीर्दीला ब्रेक लागला. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात तशी वेळ कधी तरी येतेच. त्या काळात लोक कोलमडून जातात. पण माझं तसं झालं नाही. कारण, मला वाचनाची खूप आवड आहे. माझ्या घरी स्वत:चं मोठं ग्रंथसंग्रहालय आहे. मी भरपूर वाचन केलं. मंटो वाचला, प्रेमचंद, मोहन राकेश आदी पुन्हा वाचून काढले. विनोदाची व विनोदी अशी भरपूर पुस्तकं वाचली. टी. व्ही. वर चिक्कार चित्रपट पाहिले. आपण काय करायला हवं होतं, काय केलं याविषयी अंतर्मुख होऊन विचार केला, ते तपासून घेतलं. तो एक प्रकारचा रियाज होता. त्यानंतर माझा कमबॅक झाला तो ‘ऑल द बेस्ट’, ‘दे दणादण’, ‘गोलमाल -३’ अशा चित्रपटांमधून.
त्या वेळी मी भरपूर नोट्स तयार केल्या, किस्से जमवले. नवनवे लिहून काढले. १९९६-९७ पर्यंत मी कॉमेडी शोज करायचो. पुन्हा त्याचे शोज करण्याचा निर्णय घेतला तो २०१४ मध्ये. मिमिक्री करणं हा माझा आवडीचा प्रांत आहे. मिमिक्री कलाकाराला दुय्यम लेखलं जातं, ते मला मान्य नाही. खरा कलाकार जेव्हा अभिनय करतो, तेव्हा त्याच्यात, त्या भूमिकेचा आत्मा घुसावाच लागतो, असं मला वाटतं. मिमिक्री आर्टिस्टचं काम त्याहून अवघड असतं. तो एकाच वेळी अनेक भूमिका साकारतो. त्यामुळे मिमिक्रीच्या काळापुरता त्या त्या व्यक्तिरेखांचा आत्मा त्याच्यात घुसलाच पाहिजे. त्या त्या व्यक्तिरेखांचे अस्तित्त्व कलाकारात भिनावेच लागते. त्याशिवाय तो कलाकार तो अनुभव साक्षात करू शकत नाही. ती केवळ नक्कल नसते, तर तो एक स्वतंत्र कलाविष्कार असतो. देवदयेनं माझ्यामध्ये ती प्रतिभा उपजत आहे. त्या आधारावर मी संजीवकुमार, दिलीपसाबना त्यांचीच मिमिक्री करून चकित केलंय. ही एक अद्भुत देणगी आहे. तिचाच वापर मी स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये करतो. या स्टॅण्ड अप कॉमेडीमध्ये एकच माणूस दहा जणांच्याही भूमिका करतो आणि कोणत्याही प्रॉपर्टीशिवाय. मराठीमध्ये पु. ल. देशपांडे आणि प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी तसं केलंय. लक्ष्मण देशपांडे थोडीशी प्रॉपर्टी वापरत होते, पण पु. लं. नी तीही वापरली नाही. मी लक्ष्मण देशपांडेंचं ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ला पाहिलंय, पण दुर्दैवानं पु. लं. चा प्रत्यक्ष कार्यक्रम नाही पाहिला. पण टी. व्ही.वर पाहिलंय. एक माईक व पु. ल.! मीही तसंच करतो. माईक व मी. माझ्या आविर्भावातून ओढणी दिसायला हवी, टोपी, तलवार जे काही आहे ते दिसायला हवं. माझ्या बोलण्याच्या लकबीतून व्यक्तिरेखा बदलली हे कळायलाच हवं. तरच ती स्टॅण्ड अप कॉमेडी यशस्वी ठरते. माझीही नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ते टिकले नाहीत. कारण कुठे तरी त्यांनी स्वत:चे प्रयत्न केले नाहीत. मिमिक्री कलाकाराचे स्वत:चे निरीक्षण हवे, त्याचा स्वत:चा विचार हवा, स्वत:चं विश्लेषण हवं आणि अभ्यास हवा. अभ्यास म्हणजे पाठांतर नाही तर तीच गोष्ट पुन:पुन्हा करत राहणे. जे हे करत नाहीत ते बाजूला फेकले जातात. मी परदेशात गेलो की टी. व्ही. वर हे स्टॅण्ड अप कॉमेडी शोज सतत पाहायचो. निसर्ग पाहण्यापेक्षा हे करणं मला आवडायचं. त्यातून नवनवीन शिकायला मिळायचं. त्यांचं इंग्लिश पटकन कळायचं नाही, पण तरीही मला ते शोज कळायचे हेच त्यांचं यश होतं. मीही तसंच करायचं ठरवलं. माझ्या स्टॅण्ड अप कॉमेडीमध्ये कोणतीही लिखित संहिता नसते. एक आराखडा बनलेला असतो आणि त्या आधारावर शो ऐन वेळी घडत जातो. त्यात प्रेक्षकांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा असतो. कमरेखालचे विनोद मला आवडत नाहीत, माझ्या शोमध्ये तसे मी करत नाही. मेहमूदसाहेब आणि किशोरकुमार यांचा विनोद माझा आदर्श आहे. त्यातही किशोरदा मला अतिशय आवडतात. कारण ते द्वयर्थी संवाद कधीच वापरत नाहीत. त्यांचा ‘पडोसन’मधला गानगुरू आठवा. किती सहजता होती त्यांच्या अभिनयात! हे सर्व मनात ठेवून जेव्हा मी स्टॅण्ड अप कॉमेडी २०१४ पासून करायला सुरुवात केली, तेव्हा पहिले दोन्ही शोज हाऊसफुल्ल झाले होते. पहिल्या शोनंतर एक बाई भेटायला आल्या होत्या. सोबत एक १७-१८ वर्षांचा मुलगा व एक वयस्कर गृहस्थ होते. त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, ‘‘जॉनीभाई, सतरा वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही शेवटचा शो केलात तेव्हा हा मुलगा माझ्या पोटात होता, आज तो आलाय व माझे सासरे आलेत. आम्हाला तुम्ही खूप आनंद दिलात, खूप हसवलंत, हसता हसता खूप शिकवलंतही.’’ तीन पिढय़ांना मी एकाच वेळी आनंदी करू शकलो, हे महत्त्वाचे आहे. देवाची दया आहे. कर्ता करविता तो आहे. पहिल्या पाच मिनिटात जर हास्याचा स्फोट झाला नाही, तर मी अस्वस्थ होईन, काम करणंच बंद करेन.
मी हीच ठाम भूमिका पहिल्यापासून घेतली आहे. लोकांना केवळ हसवायचं नाही, तर त्यांना आनंदाबरोबरच जगण्याचं भान, जबाबदारीची जाणीवही दिली पाहिजे. हे माझे कर्तव्यच आहे. पोटातल्या भुकेची आग काय असते हे मला माहिती आहे. तीही जाणीव माझ्या स्टॅण्ड अप कॉमेडी शोमधून देण्याचा माझा प्रयत्न असतो.
जवळपास र्अध जग मी फिरलोय. कलेनं खूप काही दिलंय. त्याहीपेक्षा तिनेच मला घडवलंय. दोन शोज माझ्या लक्षात आहेत. ‘होप-८६’ आणि ‘न्यू जर्सी’चा. ‘होप -८६’ मध्ये खरं तर मी नव्हतो. त्या दिवशी वापीला माझा कार्यक्रम होता. पण काही कारणानं आम्ही वाटेतून परतलो. ‘होप -८६’ मध्ये कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, भप्पी लाहिरी आणि आर.डी. बर्मन सहभागी होते. ‘नुक्कड’, ‘ये जो है जिंदगी’ या मालिकांच्या कलाकारांची दोन आणि कोणाची तरी एक अशी तीन स्किट्स होती. तिसऱ्याची काही अडचण निर्माण झाली होती आणि वापीला न गेलेला मी नुसताच बॅज लावून फिरत होतो. आनंदजीभाईंनी संयोजकांना सांगितलं की आपण जॉनीला काही करायला सांगू या. ते तयार झाले. आनंदजीभाईंनी मला तसं सांगितलं व ब्रेबॉर्न स्टेडियमवर हजारो लोकांसमोर नाव अनाऊन्स करून सरळ ढकललं. मी गेलो, जे सुचेल ते केलं, त्या रंगमंचानं माझ्याकडून ते करवून घेतलं. समोर दिलीपसाहेबांपासून बच्चनसाहेबांपर्यंत अख्खी फिल्म इंडस्ट्री बसली होती. साऱ्यांनी तो कार्यक्रम डोक्यावर घेतला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतून अमिताभ बच्चन आणि जॉनी लीव्हर यांच्याच बातम्या लागलेल्या. न्यू जर्सीला असाच कार्यक्रम होता. ५०,००० लोक जमलेले. पुन्हा सारी फिल्म इंडस्ट्री हजर होती. आता नवं काय करू? या विचारात असताना त्या वेळी जगभरात लोकप्रिय असणारे मायकेल जॅक्सन, अपाची इंडियन, टीना टर्नर आणि हॅमर यांच्या गायन-नृत्याच्या शैलीची आपण मिमिक्री करू या असा विचार आला. एका म्युझिशियनला बोलावलं, मला असलेल्या अपेक्षा सांगितल्या आणि या सर्वाना एकत्र आणेल अशा प्रकारचं संगीत तयार करायला सांगितलं. तो
‘आयटम’ तुफान गाजला. लोकांनी अक्षरश: उभं राहून कौतुक केलं. पण मी हे सारं करतच नव्हतो. तो सर्वसाक्षी परमेश्वर माझ्या माध्यमातून ते करवून घेत होता. आमच्या घरात, ‘येशू मसिहा या घराचा कुटुंबप्रमुख आहे,’ अशी पाटी आहे व तीच माझी धारणा आहे. येशू शत्रूवरही प्रेम करा असं सांगतो, मीही तसंच मानतो. शत्रूवर प्रेम केलंत तर मित्रावर किती कराल? देवावर श्रद्धा ठेवा. सर्व धर्म तेच सांगतात. माझ्या मुलाला कर्करोगाची बाधा झाली होती. मी समूळ हादरून गेलो होतो. त्याच्याजवळ तीन दिवस बसून देवाची करुणा भाकली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. जॅमी माझी मुलगी. ती विदेशात मास्टर्स करून आली. ती म्हणाली, स्टॅण्ड अप कॉमेडी शोज करायचेत. मी तिला लंडनच्या शोमध्ये संधी दिली. म्हणालो, आज तगलीस तर तगलीस, नाही तर हे करायचं नाही. आज तिचं स्वत:चं नाव आहे.
मी देवाचा ऋणी आहे. जे आजवर हातून झालं, ते त्यानंच करवून घेतलं, हा कृतज्ञतेचा भाव कायम मनी राहो हीच इच्छा. आमेन!

शब्दांकन: प्रा. नीतिन आरेकर
(सदर समाप्त)
nitinarekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:02 am

Web Title: johnny lever actor and comedian in bollywood industry telling about his life journey
टॅग Chaturang
Next Stories
1 शेवटचं वळण सुलभ व्हावं..
2 जागं ठेवणाऱ्या नागमोडी वाटा
3 आयुष्य सवलत कुठे देतं?
Just Now!
X