या एका शब्दाची संकल्पना, त्याच्या व्याख्या जशा पद्धतीने घ्याल तशा त्या तुम्हाला उमगतील. कारण, प्रपोजच्या संकल्पना गेल्या काही वर्षांमध्ये अशा काही बदलल्या आहेत की विचारुन सोय नाही. त्या दिवशी सहज लोकलची वाट पाहताना एक विचार मनात आला. विचार म्हणण्यापेक्षा कोणाची तरी आठवण झाली. त्या आठवणीसोबत बाजारात जसे एकावर एक फ्री डबे मिळतात, तसेच काहीसे विचारही मिळाले. आठवणींवर विचार फ्री… कसली भारी ऑफर आहे ना?

पण, खरंच ही ऑफर प्रेमाच्या वळणावर येते ना तेव्हा मनात काही वेगळ्याच लहरी उठतात. अर्थात प्रत्येकाच्या मनात त्या लहरी कमी जास्त प्रमाणात असतात. पण, असतात खऱ्या. त्याच लहरी एखाद्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीकडे व्यक्त करण्याच्या संकल्पनेला प्रपोज असं नाव दिलं आणि सुरु झाला नवा ट्रेंड, प्रपोजचा. खरंतर प्रपोज करण्याच्या आजच्या संकल्पना आपण रोजच्या आयुष्यात पाहतो. पण, गतकाळातही प्रेम व्यक्त करण्यासाठी काही कलात्मक आणि सुरेख मार्गांचा वापर केला जायचा. अर्थात, तेव्हा त्याला प्रपोज वगैरे असे टॅग लावण्यात आले नव्हते.
पुराणकथांमध्ये असणारे उल्लेख असोत किंवा मग काळानुरुप होणाऱ्या बदलांनुसार चित्रपटांच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतींचा खजिना असो, ते व्यक्त होणंच फार महत्त्वाचं.

success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन
kamal nath
भाजपात जाण्याच्या चर्चांवर कमलनाथांची रोखठोक भूमिका, प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले…

एक काळ असा होता जेव्हा प्रपोज करण्यासाठी, कोणा एका व्यक्तीप्रती असणाऱ्या भावना त्याच व्यक्तीसमोर ठेवण्यासाठी शब्दांची गुंफण करत चारोळ्या किंवा सुरेख कविता केल्या जायच्या. शाळेच्या एका दुसऱ्या वर्गात ‘ती’ असेल तर कागदाच्या बोळ्यात ती कविता लिहून तो बोळा त्या वर्गात फेकायचा, किंवा तिच्या कोणा मैत्रिणीला गाठून हा भावनांचा ठेवा तिच्यापर्यंत पोहोचवायची सोय करायची. बरं हे फक्त ‘तो’ तिच्यासाठी करायचा असंच नाही. काहीजणीसुद्धा हे धाडसी पाऊल उचलायच्या. पण, तो काळ असा होता जिथे तुलनेने तीचं व्यक्त होणं तसं कमीच होतं. शाळेत असणाऱ्या तिच्या घरचा पत्ता ठाऊक असेल तर तिच्या घरापाशी येरझऱ्या घालणारे अनेक प्रेमवेडे मित्र आपल्याला भेटतील. अर्थात आता त्यांची वयं मात्र वाढली असतील हे खरं. एखादा गजरा किंवा तिच्या आवडीचं पुस्तक देऊन प्रेमाची कबुली देणारेही तेव्हा बरेच होते. ती मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आणि गाण्यांचा आधार घ्यायची. गाणी, शब्द, सूर यांची सुरेख उधळण.

नजरेतून प्रेम व्यक्त करण्याची पारी ओलांडल्यानंतर थेट आपल्या भावना त्या एका व्यक्तीपर्यंत कशा बरं पोहोचवायच्या असा प्रश्न त्या काळात तसा फार कमीच उद्भवला असावा. कारण, साहिर लुधियानवी, प्रदीप, शकील बदायुनी, कैफी आझमी, शैलेन्द्र यांच्या शब्दांची आणि त्यांच्या कल्पनाविश्वातून साकारलेल्या कवितांची साथ जणू या प्रेमी युगुलांना मिळाली होती. ये मेरा प्रेम पत्र पढकर, के तूम नाराज ना होना…. या ओळी कानावर पडल्या की काय सुरेख काळ होता तो याचा अंदाज येतो. किंवा मग लिखे जो खत तुम्हे… आठवलं की कसली रोमॅन्टिक पिढी होती ती याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. गुलाबाची फुलं, कविता, एखादी सुरेख साडी, गजरा, नजरानजर आणि त्यात ओसंडून वाहणारं प्रेम या अशा अंदाजात व्यक्त व्हायची त्या काळची मंडळी. म्हणूनच का त्यांच्या प्रेमाचा बहर आजही मनावर हलकीशी फुंकर घालून जातो? असो.. ये हुई गुजरे जमानेकी बाते… मियाँ अब थोडा इन दिनों की ओर रुख करे..

आज प्रेम या शब्दावरील श्रद्धा जरा कमी झाली असं जुनी मंडळी म्हणतात. आमच्या काळात असं नव्हतं हा टॅग ते ज्या अनेक गोष्टींना लावतात त्या गोष्टींच्या यादीमध्ये ‘प्रेम’ही आहेच. म्हणजे आम्ही कसं पुस्तकातून लव्ह लेटर द्यायचो या आजी-आजोबांच्या काळापासून ते पीसीओच्या फोनवर वीस रुपयांचे कॉइन घेऊन बाबांनी आईशी मारलेल्या प्रेमगप्पा, असा तो प्रेम व्यक्त करण्याचा प्रवास ऐकायला मिळाला असणार. मात्र त्यांच्या नजरेतून हा प्रवास ‘ऐकताना’ (मुद्दाम पाहताना नाही म्हणत आहे कारण आज आपल्याला तंत्रज्ञानामुळे इतकं रोमॅन्टिक काही पाहता येत नाही. पाच इंचाच्या पडद्यामुळे कल्पनाशक्तीला मर्यादा आल्यात म्हणा हवं तर) तर हा प्रवास ऐकण्याचा वेगळाच आनंद असतो. तुम्ही तो अनुभवला नसेल तर मुद्दाम एखाद्या संध्याकाळी आजी-आजोबा किंवा आई-बाबांबरोबर वाफाळत्या चहाच्या कपबरोबर या विषयावर ‘चाय पे चर्चा’ घडवून आणाच.

आज आपण अगदी सहज प्रेम व्यक्त करतो आणि आधी अनेक पर्याय होते. प्रेम व्यक्त करण्यासाठी मात्र आज तंत्रज्ञान या एकाच दृष्टीतून आपण प्रेम व्यक्त करण्याला प्राधान्य देतो. म्हणजे अगदी व्हॉट्सअपवरील संवादातील आय लव्ह यू किंवा १४३ असो अथवा फोन ठेवताना कधीतरी फॉरमॅलिटी म्हणून म्हटलेलं आय लव्ह यू. आपलं प्रेम ना असं तंत्रज्ञानाभोवती फिरतंय. म्हणजे मोबाईल फोन किंवा इतर समाजमाध्यमे आपल्या प्रेम संवादाचा गाभा झाले आहेत. यात चूक काहीच नाही मात्र असे अनेक कपल्स आपण पाहतो जे सतत फोनवर त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलत असतात किंवा चॅट करत असतात आणि मग फोनची इतकी सवय होते की प्रत्यक्षात ते दोघे भेटल्यावर ते कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीबरोबरच फोनवर असतात. म्हणजे डेटवर गेल्यावर ती त्याच्यासमोर बसून गप्पा मारतेय आणि तो फोनमध्ये पाहत असतोय असं किती तरी कॉफी शॉपमध्ये दिसतं आज काल नाही का?

प्रेमाच्या व्याख्या खूप बदलल्या आहेत आज. हल्ली व्हॉट्सअपवरील एका लव्ह यू ने प्रेमकहाण्या सुरु होतात आणि आय थींक वी शूड ब्रेक अप म्हणत संपतात. या दरम्यान, बाबू, शोनू, बच्चा असं काय काय ते सगळं दिसतं चॅट हिस्ट्रीमध्ये. पण जशी या तंत्रज्ञानामुळे मने पटकन जुळतात तसंच कंटाळा आला की हो बरोबर वाचलंत तुम्ही कंटाळा आली की ब्रेकअप करतात. इतकं सोप्प झालंय आज अनेकांसाठी. प्रेमवीर आणि प्रेमविरांगनांव्यतिरिक्त रोजच्या संवादात आपण सहज एकमेकांना लव्ह यू किंवा किसवाले इमोजी पाठवतो. म्हणजे अनेकांच्या फोनमध्ये त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला पाठवलेले किसींग इमोजी किंवा हार्ट इमोजी असतील. मग कधीतरी आई-बाबांनी ते चॅट चुकून पाहिलेच की ठरलेलं उत्तर, ‘बाबा ते खूप कॅज्युअली होतं. मी माझ्या मैत्रिणीवर प्रेम नाही करु शकत का? आपण मुलगा आणि मुलीमध्ये त्या एकाच नात्याने किती दशके बघणार आहोत?’ ब्लाब्लाब्लाब्लाब्ला… असं बरंच काही बोलून जातो आणि आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवून देतो आई-बाबांना.

हल्लीच्या डिजीटल प्रेमाचा अजून एक तोटा सांगायचा म्हणजे फेसबुकवरील मेमरीज. म्हणजे ‘आज ये तो कल कोई दुजा’ या तत्वावर चालणाऱ्या लव्हस्टोरीजमध्ये मागील वर्षी कोणातरी बरोबर सेलिब्रेट केलेल्या खास दिवसांच्या मेमरीज यावेळी तुम्हाला हण्ट डाऊन करतात असंच म्हणावं लागेल. असे अनेकजण आहेत ज्यांच्या एक्सबरोबरच्या मेमरीज त्यांना यंदाच्या वर्षी छळत आहेत. त्यामुळे जर अशा उथळ प्रेमात पडत असला तर उगाच समाजमाध्यमांवर त्याचा शो ऑफ करण्याची किती गरज आहे हे एकदा तपासून पाहाच. कारण प्रेम संपलं तरी डिजीटल फुटप्रिंट तुमचा पाठलाग सोडत नाहीत. तुम्ही एक्सचेंज केलेली वचने खोटी ठरली तरी इंटरनेटवर एकदा पोस्ट केलेली माहिती तुम्हाला आयुष्यभर त्या व्यक्तीची आठवण करुन देत राहते. म्हणूनच आजच्या डिजीटल युगात प्रेम या संकल्पनेचे असे लहान पण महत्वाचे विविध पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे. डिजीटल माध्यमातून प्रपोज करणे ते स्वीकारणे आणि मग ब्रेकअप करणे या दोन स्थानकांमधील प्रवासातील आठवणी तुमच्याबरोबर आयुष्यभर राहतात. हो म्हणजे तुम्ही त्याला किंवा तिला विसरलात तरी डिजीटल माध्यमातून त्या आठवणी कधीच पुसल्या जात नाही म्हणून वेळीच सावध व्हा आणि पुढचा त्रास टाळा असाच सल्ला आम्ही तुम्हाला आजच्या डिजीटल प्रेमाबद्दल देऊ शकतो.

हा होता आधीपासून आजपर्यंतच्या डिजीटल प्रेमाचा प्रवास… म्हणजे कबुतरापासून ते व्हॉट्सअपपर्यंतचा हा प्रवास ग्रॅज्युअली झाला असला तरी त्यामधील प्रेम संकल्पना बदलत गेली आहे हेच यातून दिसून येते. म्हणूनच आजच्या डिजीटल युगात प्रेमात पडताना आणि नातं सांभाळताना एकच सल्ला आम्ही देऊ इच्छितो…

बाबू जी धीरे चल ना… प्यार मे जरा संभलना… बडे धोके है… बडे खतरे है इस राह पे…

 

शब्दांकन- सायली पाटील, स्वप्नील घंगाळे

sayali.patil@loksatta.com

swapnil.ghangale@loksatta.com