Valentine’s Week 2018 : जाणून घ्या, प्रिय व्यक्तीला देत असणाऱ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ

तिला किंवा त्याला तुमच्या मनातील भावना सांगताय?

multicolored
गुलाब

आज रोझ डे (Rose Day)! प्रेमाची उधळण आणि प्रेमाचाच उत्साह साजरा करणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन्स डे’ या दिवसाची सुरुवात होण्याआधीच साधारण आठवडाभरापूर्वी व्हॅलेंटाइन्स वीकला सुरुवात झाली आहे. या वीकच्या पहिल्याच दिवशी साजरा केला जातो ‘रोझ डे’. प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुलाबाचं तसं फार महत्त्वं. प्रेमाच्या या प्रवासात जितकी वळणं येतात, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक गुलाबाच्या रंगाचंही आपलं असं एक वेगळं अस्तित्व आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी तिला किंवा त्याला तुमच्या मनातील भावना सांगणार असाल आणि त्याही गुलाब देऊन सांगणार असाल तर आजच्या रोज् डे साठी गुलाबाच्या फुलांच्या वेगवेगळ्या रंगाचे अर्थ एकदा जाणून घ्या….

गुलाबी गुलाब
प्रेमात पडतानाही लक्षपूर्वक पडायचं असतं भाऊ. हिंमत लागते. प्रेमाच्या आणभाका घेण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव. त्याच्या किंवा तिच्या आवडीनिवडी हेही कळणं आवश्यक असतं. तुम्हीपण अशा सिच्युएशनमध्ये आहात का? मग बिनधास्त गुलाबी रंगाचं गुलाबाचं फूल देऊन टाका. ‘मला तुझ्याविषयी आणखी जाणूव घ्यायचं आहे’ हा संदेश समोरच्यापर्यंत बिनचूक पोचेल. आता हे सगळं आपण व्हॉट्सअॅपवरनं वगैरेपण बोलत असतो. पण यार रोज् डेच्या दिवशी अशा पध्दतीने आपलं म्हणणं सांगणं यात आणखीच बात आहे!

लाल गुलाब
आता या रंगाचा अर्थ सांगण्याची कोणाला गरज नाही. अनादी काळापासून जगभरातल्या प्रेमिकांनी या रंगाचा गुलाब देत आपल्या प्रेमाचा ‘इजहार’ केला आहे. तुमच्या मनात ‘त्या’ स्पेशल व्यक्तीबददल खरोखर प्रेमाची भावना असेल तर बेधडक लाल गुलाब देऊन टाका. त्याला किंवा तिला तुमच्या मनातल्या भावना लगेचच समजतील.

पिवळा गुलाब
व्हॅलेंटाइन डे काय अशी शंकाच आहे का? मित्रमैत्रिणींनी या दिवशी काय करायचं? जास्त कल्पनाशक्ती ताणू नका पण फेसबुकवर फोटोच्या खाली ‘नाईस क्लिक डिअर’, ‘फ्रँडशिप’ वगैरे कमेंट्स टाकण्यापेक्षा त्या व्यक्तीला पिवळा गुलाब देणं कधीही चांगलं. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, हा मेसेजसुध्दा समोरच्यापर्यंत थेट पोचतो.

जांभळा गुलाब
कधीकधी ना बात एकदम क्लिक होते. त्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहताच ‘मन मे लड्डू’ फुटतात, व्हायोलिन्स वाजतात, कधीकधी ‘प्रथम तुज पाहता’ ची धून वाजते (वाईट होता,पण असो). अशा वेळी काही सुचत नाही, काय बोलायचं कळत नाही.
हे म्हणजे ‘तुम मेरेको पहिली नजर में आवड्या’ वगैरेचा मेसेज द्यायचा असेल तर बाजारात जरा जास्त पायपीट करा आज आणि जांभळा गुलाब शोधून काढा. मेहनत थोडी जास्त आहे, पण लव्ह अॅट फर्स्ट साईटचा दमदार मेसेज समोरच्या पार्टीला द्यायचा असेल तर एवढी मेहनत पायजेल.

नारंगी गुलाब
पिवळा, नारिंगी हे रंग धगधगत्या आगीशी जोडले जातात. कल्पनाशक्ती आता इथे ताणा.

हिरवा गुलाब
हा पण गुलाब असतो. हिरवा रंग निसर्गाची आठवण करून देतो. त्यामुळे एक नव्या सुरूवातीशी, नव्या निर्मितीशी या रंगाचं नातं जोडलं जातं. कोणाच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरूवात होत असेल तर तुम्ही तुमच्या सदिच्छा हिरवा गुलाब देत कळवू शकता.

पांढरा गुलाब
पांढरा गुलाबही एका नव्या पर्वाची सुरूवात किंवा शेवटसुध्दा दर्शवतो. तेव्हा हा गुलाब देताना जरा जपून.

काळा गुलाब
त्यामुळे तुमची प्रिय व्यक्ती ब्लॅक मेटल रॉक म्युझिकची चाहती असेल आणि त्याचत्याच गोष्टींचा तिला तिटकारा असेल किंवा दिक्कालातून आरपार जाणारी तिची सौंदर्यदृष्टी वगैरे असेल तरच हा गुलाब निवडा. (थोडक्यात, शक्यतो फंदात पडू नका)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हॅलेंटाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Valentines week special 2018 happy rose day importance and significance of each rose color