12 August 2020

News Flash

प्रेम महत्त्वाचं!

‘‘का? का? मी खात्रीने प्रेमविवाहच केला असता!’’

मी, मोकाशी हळहळलो, ‘‘आपले विवाह झाले त्या काळात, म्हणजे १९५९ च्या आसपास प्रेमविवाहाची पद्धत सर्रास हवी होती. प्रथम प्रेम, नंतर विवाह, पुन्हा प्रेम, प्रेमच प्रेम! मी प्रेमविवाहच केला असता.’’

ओकांनी विचारलं, ‘‘तुमचा विवाह कधी झाला?’’

‘‘१९५९ मध्ये.’’

‘‘मोकाशी, प्रेमविवाहच करायचा हा अविचार तुम्ही मनात धरला असता तर तुम्ही ब्रह्मचारीच राहिला असता! आई-वडील, काका, मामा, आत्या, मावशी अशा तुमच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतला, त्यांनी तुमची खात्री दिली म्हणून तुमचं लग्न झालं!’’

‘‘का? का? मी खात्रीने प्रेमविवाहच केला असता!’’ मोकाशी ठामपणे बोलले खरे, परंतु त्याचबरोबर वधूपक्षानं सर्व नातलगांना आपल्या संबंधात विचारलं होतं, नातलगांच्या शिफारशीमुळं आपले लग्न झालं, हा ओकांचा अंदाज खरा ठरावा याचा मोकाशींना राग आला.

‘‘मोकाशी, मी तुमचा शाळा-कॉलेजपासून मित्र आहे. तुम्ही कधीही एका मुलीशी चार शब्द बोलू शकला नाहीत; तुम्ही काय प्रेम करणार? बोलल्याशिवाय प्रेम जुळणारं कसं?’’

परब मोकाशींच्या मदतीला धावले, ‘‘ओक, प्रेमाची तऱ्हाच वेगळी आहे. ती तुम्हाला समजणार नाही. प्रेम करण्याकरिता बोलावे लागत नाही. तुकोबा म्हणतात, ‘प्रेम न ये सांगता, बोलता, दाविता। अनुभव चित्ता चित्त जाणे॥ तुका म्हणे बरे विचारावे मनी। आणिक भल्यांनी पुसो नये॥’ ओक, प्रेम मनातून करावयाचे असते, त्याकरिता सांगावे लागत नाही, बोलण्याची गरज नसते.’’

ओक म्हणाले, ‘‘परब, आपले मोकाशी १९५९ मधील, स्त्री-पुरुषांमधील प्रेमविवाहाविषयी बोलत आहेत. तुमचे तुकोबा स्वत:च्या विवाहाविषयी बोलत आहेत का? तुकोबा म्हणतात ते त्यांच्या विठ्ठलाविषयीच्या प्रेमाबाबत.’’

परब गडबडले व गप्प राहिले. ओक म्हणाले, ‘‘मोकाशी, प्रेमविवाह करण्याकरिता एकतर्फी प्रेम पुरे नाही. तुम्ही एक नाही दहा मुलींवर मनातल्या मनात प्रेम केलं असेल, पण उपयोग काय? प्रेमविवाह करण्यासाठी मुलीनं प्रतिसाद द्यायला हवा.  मुलीनं आपल्यावर प्रेम करण्यासाठी आपल्यात काही तरी खास असावं लागतं. तुमच्यात असं खास काय होतं किंवा आजही आहे? वरती आपलं प्रेमप्रकरण घरच्यांना पसंत नसेल तर दोघा प्रेमिकांना घर सोडून पळावं लागतं. नव्या गावी, कोणाच्याही ओळखीशिवाय नोकरी मिळवावी लागते. राहण्यासाठी भाडय़ानं घर शोधावं लागतं. घरासाठी पागडीचे पैसे वडील देत नाहीत.’’

मोकाशी एकदम ताळ्यावर आले. ते म्हणाले, ‘‘ओक, प्रेमविवाह एवढा खडतर असतो? बरं घडलं, मी प्रेमविवाह केला नाही.’’

उत्सुकतेनं मोकाशींनी संत परबांना विचारलं, ‘‘माझ्या लग्नाचा विषय बाजूला ठेवा. तुमच्या लग्नाबाबत सांगा.’’

परब म्हणाले, ‘‘माझे वडील म्हणाले, ‘गणू, तू लग्न कर. सदू शिंदेची सोयरा तुला योग्य आहे. तुझ्या आईला हाताखाली सून हवी.  मी हो म्हणालो. शिंदेकाका व माझे वडील दोघेही दरवर्षी पंढरीच्या दोन्ही वाऱ्या करतात.’’ परब उत्तरले.

‘‘ते ठीक आहे. बघण्याचा कार्यक्रम कोठे व कसा झाला?’’

‘‘मोकाशी, बघण्याच्या कार्यक्रमाची गरजच काय? आम्हा दोघांच्या वडिलांनी ठरवलं, लग्न झालं.’’

‘‘तुमच्या व तुमच्या पत्नीची मतं, मनं जुळतात का नाही हे तुम्ही लग्नाच्या पूर्वी पाहिलं नाही?’’

‘‘मोकाशी, आमची मतं जमणारच. आमची दोघांची घरं विठ्ठलभक्त आहेत. म्हटलंच आहे : ‘ते माझे सोयरे सांगाती। पाय आठविती विठोबाचे॥ तुका म्हणे जैसे आवडती हरिदास। तैशी नाही आस आणिकांची॥’ माझी पत्नी व मी दोघंही विठ्ठलभक्त, दोघंही सोयरे. आमचं पूर्ण जमलं.’’

ओकांनी तोंड उघडलं, ‘‘मोकाशी, तुम्ही हरिदास नसतानाही परब तुमच्याशी बोलतात हे तुम्ही तुमचं भाग्य समजा!’’ ‘‘ओक, तुमच्या विवाहाची कथा सांगा. विवाह कसे जमतात हे जाणण्यासाठी मी, मोकाशी नेहमीच उत्सुक असतो, घटस्फोटाबाबत थोडा जास्त!’’ ओक सांगू लागले, ‘‘साठ वर्षांपूर्वीची ही कथा आहे. पाहण्याच्या वेळी, माझी पत्नी आपणहून म्हणाली, ‘तुम्हाला काही विचारायचं असेल तर नंतर विचारा. मी माझी आवड प्रथम सांगते. मला संस्कृत सुभाषितं खूप आवडतात. तुम्हाला?’’

ओकांचं शाळेपासूनचं संस्कृतप्रेम मला व माझी संस्कृतची धास्ती ओकांना परिचयाची आहे; पण बायको, पुढाकार घेऊन, दाखवण्याच्या प्रसंगी, बोलते हे मला दहशतवादी कृत्य वाटले! मी माझा वासलेला आ प्रयत्नपूर्वक बंद केला.

ओक बोलत होते, ‘‘मी होय म्हणालो. त्यावर कुसुम म्हणाली, ‘सुभाषित म्हणजे ज्ञानाचं कॅप्सूल, अत्तर, सार. धर्म म्हणजे काय हे सांगणारं सुभाषित मला अत्यंत प्रिय आहे. ‘न तत् परस्य संदध्यात्, प्रतिकूलम् यत आत्मन:। एष: संक्षेपत: धर्म:, अन्य: कामात् प्रवर्तते॥’ जे आपल्याला नकोसं, अडचणीचं वाटतं ते आपण दुसऱ्याला देऊ नये. बस्स! धर्मानं वागणं म्हणतात ते हेच. हे टाकून, आपण इतरच काही करतो ते स्वार्थप्रेरित असतं.’ कुसुम असं म्हणाली आणि मग काय? मी अर्धा तास कुसुमला सुभाषितं ऐकवत सुटलो. कुसुम रंगून ऐकत होती. सुभाषित प्रीती जुळली, लग्न झालं.’’

मी आश्चर्यानं म्हणालो, ‘‘कमाल आहे! सुभाषित प्रेमापोटी लग्न जमलं, वा! ओक, मी अनेक र्वष तुमच्या घरी येतो आहे, पण वहिनींचं संस्कृतप्रेम माझ्या कधीच कसं कानांवर पडलं नाही?’’

ओक पुटपुटले, ‘‘कसं पडणार? कुसुमला संस्कृत मुळीच येत नाही. लग्नानंतर मी विचारलं तेव्हा मराठीत मुसमुसत ती म्हणाली, ‘नानांनी व तात्यांनी एवढं एकच सुभाषित व काय बोलायचं हे माझ्याकडून घोटून, पाठ करून घेतलं होतं. मी तसं केलं. तुम्ही नानांना व तात्यांना विचारा.’ मी काय विचारणार? तात्या माझे वडील व नाना कुसुमचे वडील!’’

‘‘ओक, म्हणजे लग्नाच्या बाबतीत तुम्हाला संस्कृतनं फसवलं!’’ मी खुशीनं चुकचुकलो.

‘‘पण कुसुमचं मराठीतील मुसमुसणं संस्कृत सुभाषितांप्रमाणे गोड होतं. कुसुमच्या पदार्थाना उत्तम चव आहे. त्यामुळं लग्नानंतरची गेली साठ र्वष, कुसुमकडं संस्कृत नसूनही बेचव झाली नाहीत.’’ ओकांमधील प्रामाणिक मराठी नवऱ्यानं कबुली दिली. परब म्हणाले, ‘‘आपण तिघे भाग्यवान नवरे आहोत. आईवडिलांनी आपल्यासाठी बायका निवडल्या. ते जोखमीचं काम त्यांनी आपल्यावर सोडलं नाही. आपला गरिबीतील संसार बायकांमुळे सोन्याचा झाला. ‘पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण। आम्हा नारायण तैशा परी॥ तुका म्हणे, एकविध झाले मन। विठ्ठलावाचून नेणे दुजे॥’ तुकोबांना ‘एकविध मन’ करायला विठ्ठल मिळाले, पण बायकांनी आपल्याला प्रमाण मानावं असे नवरे आपण आहोत का याचा आपण तिघांनी विचार करावा.’’

ओक म्हणाले, ‘‘परब, आपण आता काहीही विचार करण्याची, स्वत:ला सुधारायची गरज नाही. आपण जसे आहोत तसे बायकांनी आपल्याला साठ वर्षे स्वीकारलं आहे. सुंदर-कुरूप, चांगलं-वाईट असं काही नसतं, (‘किम् अपि अस्ति स्वभावेन सुंदरम् वा अपि असुंदरम्।’), ज्याला आवडतं, ज्याचं प्रेम आहे, त्याच्या दृष्टीनं ते सुंदरच असतं (‘यद् एव रोचते यस्मै, भवेद् तत् तस्य सुंदरम्’।).’’

परब उद्गारले, ‘‘छान, छान, प्रेमविवाह काय किंवा विवाह काय, प्रेम महत्त्वाचं. आपल्या बायकांनी प्रेमापोटी आपला संसार सांभाळला आहे.’’ मोकाशी मनापासून बोलून गेले, ‘‘परब, आपल्या बायका, तुमच्या विठ्ठलाप्रमाणे आहेत. त्यांनी पातकी नवऱ्यांचा स्वीकार केला आहे.’’

परबांनी ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत मोकाशींना दाद दिली.

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2017 12:16 am

Web Title: b l mahabal loksatta chaturang marathi articles part 5
Next Stories
1 किलबिल
2 एक विठ्ठल आधार!
3 पावसाळा
Just Now!
X