ज्ञानेबा, तुकोबाचा जयघोष करत आळंदी ते पंढरपूरला जाण्यासाठी वारीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक निघाला असून यामध्ये ‘प्लुटो’ या श्वानाचाही समावेश आहे. मागील सहा वर्षांपासून प्लुटो हा माऊलींच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पुण्यापर्यंत सतीश अग्रवाल यांच्या समवेत सहभागी होतोय. यंदा देखील प्लुटो वारीमध्ये सहभागी झाला आहे.

सतीश अग्रवाल म्हणाले की, माझे वडील दरवर्षी वारीमध्ये सहभागी होत असत. त्यांचे निधन झाल्यानंतर मी त्यांची परंपरा कायम ठेवत अविरतपणे वारीला जात असून सहा वर्षांपूर्वी वारीला जाताना प्लुटो मला सोडत नव्हता. मग त्याला देखील मी बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तो येत असून यापुढे देखील त्याला प्रत्येक वारीला घेऊन जाण्याचा माझा मानस आहे, असा विश्वास व्यक्त करत समाजातील प्रत्येक घटकाने वारीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.