जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीच्या मुक्कामानंतर सकाळी काटेवाडीकडे मार्गस्थ झाला. तेथे परंपरेप्रमाणे परीट समाजाच्या वतीने पालखीला धोतराच्या पायघडया घालण्याचा सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी धनगर समाजाच्या वतीने पालखी रथाभोवती मेंढय़ांचे गोल रिंगण झाले. विलोभनीय आणि डोळयांचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली होती.

काटेवाडीच्या सरपंच गौरी काटे, उपसरपंच जय सुतार, बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामतीचे तहसीलदार प्रांत अधिकारी व गटविकास अधिकारी तसेच काटेवाडीचे एकनाथ काटे, संजय काटे आदींनी गावात पालखीचे स्वागत केले. काटेवाडीत मुख्य रस्त्यापासून पाकळी गावात जात असताना परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघडय़ा घालण्यात आल्या. गावातून पालखी मार्गस्थ होताना पुन्हा मुख्य रस्त्यावर आल्यानंतर धनगर समाजाच्या वतीने परंपरेप्रमाणे मेंढय़ांच्या रिंगणाचा सोहळा झाला.

काटेवाडी येथे दुपारची विश्रांती पूर्ण करून तुकोबांचा पालखी सोहळा भवानीनगरकडे मार्गस्थ झाला. त्या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चेअरमन बाळासाहेब घोलप यांनी पालखीचे स्वागत केले. कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, सभासद कामगार वर्ग या वेळी मोठया संख्येंने उपस्थित होते. कारखान्याच्या वतीने वारकरी बांधवांना मिठाईचे वाटप करण्यात आले. पालखीचा मुक्काम रविवारी इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी आहे. सोमवारी सकाळी बेलवाडी येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर सोहळा इंदापूर मुक्कामी दाखल होणार आहे.