News Flash

माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्हय़ात

स्वागत स्वीकारल्यानंतर सायंकाळी नातेपुते येथे पालखी मुक्कामासाठी विसावली.

पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी विठ्ठलनामाच्या अखंड गजरात सोलापूर जिल्हय़ात धर्मपुरी येथे आगमन झाले. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख व विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, माळशिरसचे आमदार हणमंत डोळस, आमदार रामहरि रूपनवर, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील आदींनी पालखीचे स्वागत केले. स्वागत स्वीकारल्यानंतर सायंकाळी नातेपुते येथे पालखी मुक्कामासाठी विसावली.

सकाळी पावणेअकराच्या सुमारास सातारा जिल्हय़ाची शीव ओलांडून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने सोलापूर जिल्हय़ात माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे प्रवेश केला. तेव्हा सातारा जिल्हय़ातर्फे तेथील जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निरोप दिला. तर सोलापूरचे पालकमंत्री देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. वीरेश प्रभू यांच्यासह नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी संजीव जाधव, माळशिरसच्या तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी सुरेश मारकड यांची उपस्थिती होती. धर्मपुरी ते पुढे शासकीय विश्रामगृहापर्यंत पालखी सोहळय़ात पालकमंत्री देशमुख व इतरांनी पायी चालत दिंडीत टाळ-चिपळय़ा हाती घेऊन वाजवत आनंदाची अनुभूती घेतली.

धर्मपुरी येथे माउलींच्या पालखीचे आगमन होण्याअगोदर ज्येष्ठ भारूड कलाकार चंदाताई तिवाडी यांनी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या पर्यावरण, निर्मलवारी व स्वच्छताविषयक जनजागृतीवर भारूड सादर करून भाविकांना खिळवून ठेवले होते. धर्मपुरी शासकीय विश्रामगृहाजवळ विसावा घेऊन दुपारी उशिरा पालखी सोहळा नातेपुते येथे मुक्कामासाठी रवाना झाला. सायंकाळी नातेपुते येथे पालखीचे आगमन झाले तेव्हा तेथील विविध संस्था व मंडळांसह नागरिक व भाविकांनी पालखीचे मनोभावे स्वागत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 5:11 am

Web Title: sant tukaram and sant dnyaneshwar wari palkhi yatra 2017 pat 12
Next Stories
1 आषाढी यात्रेसाठी राज्यातून ३७०० एसटी बसची व्यवस्था
2 संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश
3 वारीच्या वाटेवर बीजांची पेरणी..
Just Now!
X