पालखी सोहळा आज मार्गस्थ होणार

ज्ञानोबा-माउलींच्या नावाचा अखंड जयघोष करीत सोमवारी असंख्य पुणेकरांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे दर्शन घेतले. त्या बरोबरच पालखीतील वारकऱ्यांच्या सेवेतही हजारो पुणेकर दिवसभर दंग होते. पालख्या मंगळवारी (२० जून) सकाळी हडपसरकडे मार्गस्थ होणार असून हडपसपर्यंत दोन्ही पालख्यांची वाटचाल एकत्रित होईल. त्यानंतर त्यानंतर तुकोबांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी-काळभोरकडे तर, माउलींची पालखी दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी पुण्यनगरीत आल्या. पालख्यांच्या आगमनामुळे शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. तसेच सामाजिक बांधिलकी जपत अनेक संस्था, संघटनांनी वारकऱ्यांची सेवा केली. अनिल अगावणे संचालित महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयातर्फे वारकऱ्यांना हरिपाठाचे वितरण करण्यात आले. तसेच लकडी पूल येथील खंडुजीबाबा विठ्ठल मंदिरात बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सुकांता चॅरिटेबल ट्रस्ट आणि जय आनंद ग्रुपच्या वतीने नगरसेविका मानसी देशपांडे यांच्या हस्ते ७५ वारकरी महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.

लायन्स क्लबच्या वतीने टाकाऊ फ्लेक्सपासून टिकाऊ इरले बनवून त्याचे वाटप करण्यात आले. यंदा सुमारे दोन लाख इरल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. नारायण पेठेतील योगेश तिवारी मित्र परिवारातर्फे  ३५० हून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. दुधभाते नेत्रालय आणि आदित्य फाउंडेशनतर्फे वारकऱ्यांची मोतीबिंदू आणि डायबेटिक रेटिना पॅथीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ वारकऱ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया वारी संपल्यानंतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने वारक ऱ्यांसाठी दाढी-कटिंग सेवा करण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी, औषध वाटप तसेच रेनकोटचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे शिवाजीनगर परिसरात वारक ऱ्यांना गुडदाणीचे वाटप करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी पुणे शहर काँग्रेस, शक्ती सोशल फाउंडेशन, पर्वती, बिबवेवाडी येथील प्रियदर्शनी शिक्षण संस्था आणि जय भवानी टेक्निकल इन्स्टिटय़ूट, शनिवार पेठेतील न्यू युनियन क्रिकेट क्लब, नवी महात्मा फुले पेठेतील रिजवानी मस्जिद ट्रस्ट, शिवाजीनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था, फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन, पद्मकृष्ण फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागासवर्गीय विभाग यांच्या वतीने चहा, नाश्ता, फळे आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

सासवडमध्ये पालखीची तयारी

ज्ञानोबांची पालखी आज दिवे घाट चढून सासवड नगरीत येत आहे. त्या निमित्ताने पुरंदर तालुक्यात पालखी स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी तळावर विजेचे दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवस सासवड येथे मुक्काम करून गुरुवारी जेजुरी नगरीत पालखी सोहळा विसावणार आहे.