News Flash

कृत्रिम जंगल प्रकल्प बारगळणार?

शहरात कृत्रिम जंगल निर्माण करण्यासाठी पाच वर्षांंची व्यापक वनीकरण मोहीम सलग दुसऱ्या वर्षी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशात ७५ दिवसानंतर आढळले सर्वात कमी करोना रुग्ण (प्रातिनिधिक छायाचित्र)

वनीकरण मोहिमेला सलग दुसऱ्या वर्षी करोनाचा फटका

सुहास बिऱ्हाडे

वसई: शहरात कृत्रिम जंगल निर्माण करण्यासाठी पाच वर्षांंची व्यापक वनीकरण मोहीम सलग दुसऱ्या वर्षी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करोनामुळे पालिकेपुढे असलेली कामे तसेच शासनाकडून अनुदान न मिळाल्याने ही योजना रखडणार आहे. याशिवाय शहरातील वृक्षारोपण मोहीम देखील थंडावणार आहे. कृत्रिम जंगल योजनेअंतर्गत एकूण ५ टप्पे असून केवळ ३ टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत.

वसई-विरार महापालिकेने २०१७ पासून शहरात कृत्रिम जंगल विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि वन विभागाच्या सहकार्याने पाच वर्षांंत टप्प्याटप्प्याने शहर परिसरात वनीकरण करणे सुरू केले होते. विरारमधील शिरगाव, गास, कोपरी नारिंगी, चंदनसार, कणेर, विरार, नालासोपारा येथील बिलालपाडा, धानीव, पेल्हार या ठिकाणी कृत्रिम जंगल तयार करून त्या ठिकाणी पर्यटनस्थळ, जंगल पर्यटन, पक्षी अधिवास, हरीण अभयारण्य, औषधी वनस्पती उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.  आतापर्यंत मागील तीन वर्षांत वनीकरणाचे ३ टप्पे पालिकेने पूर्ण केले होते. २०२० मध्ये करोनाची साथ पसरली. पालिकेची संपूर्ण यंत्रणा करोना निवारणासाठी व्यस्त झाली होती. यामुळे वनीकरणाची मोहीम थांबविण्यात आली होती. पुढील वर्षी चौथा टप्पा पूर्ण केला जाईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र २०२१ मध्ये पुन्हा करोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी पालिकेची यंत्रणा पुन्हा व्यस्त झाली. मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च झाला. त्यामुळे यंदा तरी वनीकरणाचा चौथा टप्पा सुरू होईल, का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत पालिकेच्या उपायुक्त चारुशीला पंडित यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप वनीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही वन विभागाच्या संपर्कात आहोत. कारण योजना पालिकेची असली तरी ती वन विभागाकडून राबवली जाणार आहे. सध्यातरी पुढच्या टप्प्याबाबत अनिश्चितता आहे, असे त्यांनी सांगितले.   पाच वर्षांत कृत्रिम जंगल तयार करून शहरात पर्यटन स्थळ विकसित करण्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. त्यामुळे हा प्रकल्प आता दोन वर्षे लांबणीवर गेला आहे.

शहरात पालिकेतर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यासाठी देखील अद्याप शासनाकडून निर्देश आले नसल्याने वार्षिक वृक्षारोपण मोहिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालिकेने वनीकरण्याच्या मोहिमेत नागरिकांनाही सहभागी करून घेतले होते. त्यानुसार विविध संस्था आणि नागरिकांना वृक्ष वाटप केले जात होते. पालिकेच्या  कर्मचाऱ्यांना रोपे दत्तक देणे, विवाह नोंदणी करणारे, जन्म झालेल्या पालकांना आनंदी वृक्ष, निधन झालेल्या कुटुंबीयांना स्मृती वृक्ष देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. महिला बचत गट आणि विविध शैक्षणिक संस्थांना रोपे वाटप करण्यात येत होती. मात्र मागील दोन वर्षांंपासून या योजना देखील रखडल्या आहेत.

कृत्रिम जंगल योजना

वसई विरार महापालिकेने केवळ वनीकरण न करता थेट कृत्रिम जंगलच तयार करून त्यात पर्यटनासाठी विविध प्रकल्प सुरू करण्याचे ठरवेले आहे. पाच वर्षांंचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी वनविकास महामंडळातर्फे वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी पालिकेने वन विभागाशी करार केला आहे. पाच वर्षांत ही वृक्ष लागवड केली जाणार असून ७ वर्षे वन विभागामार्फत वृक्षांची देखभाल केली जाणार आहे. या ठिकाणी पर्यटन स्थळ, फॉरेस्ट पार्क, पक्षीअधिवास, हरीण पार्क, औषधी वनस्पती उद्याने विकसित केली जाणार आहेत.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात २०१७ च्या पावसाळ्यात पहिल्या टप्प्यात शिरगाव, गास कोपरी आणि नारिंगी येथील ५० हेक्टर जागेवर ५५ हजार झाडे लावण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात शिरगाव येथील कक्ष क्रमांक ११२९, ११३० व ११३१ मध्ये एकूण ६० हेक्टर क्षेत्रापैकी ५४ हेक्टर जागेवर ६० हजार आणि निर्मळ, तसेच शिरगाव तलाव परिसरात १० हजार झाडे लावण्यात आली होती.  वनीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात २ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख ९५ हजार झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. शिरगाव (कुंभारपाडा ४९.५३ हेक्टर, खंदरपाडा १३.९६ हेक्टर, कक्ष क्रमांक  ११३१ वर ५.२५ हेक्टर या अवनत वनक्षेत्रावर ३ वर्षांसाठी वनीकरण करण्यात आले आहे.  त्यासाठी ३ कोटी ६२ लाख रुपये एवढा खर्च झाला आहे. या झाडांचे अक्षांश रेखांश घेण्यात आले असून भौगोलिक सांकेतिक क्रमांक (जिओ टॅंगिग) देण्यात आले आहे.

पालिकेने आतापर्यंत केलेल्या ३ टप्प्यांतील वनीकरण

  • पहिला टप्पा ( २०१७) ५० हेक्टर जागेवर ५५,५५०  वृक्षरोपांची लागवड
  • दुसऱ्या टप्पा (२०१८) ५४ हेक्टर जागेवर ६० हजार वृक्षरोपांची लागवड
  • तिसरा टप्पा— (२०१९) १७४ हेक्टर जमिनीवर एक लाख ९५ हजार झाडांची लागवड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 3:54 am

Web Title: coronation forestry campaign second year row ssh 93
Next Stories
1 महापालिकेची परिवहन बससेवा १३ मार्गावर सुरू
2 वसईत पावसाचा जोर कायम
3 मीरा-भाईंदर शहरात सार्वजनिक ठिकाणी करोना चाचणी बंधनकारक
Just Now!
X