प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकडे नागरिकांचा ओढा

विरार : करोना वैश्विक महामारीचे सणांवरील सावट आता पर्यावरणासाठी मोठे हानिकारक ठरणार आहे. मागील काही वर्षांपासून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्तीची मागणी वाढली होती. यामुळे पर्यावरणाला याचा मोठा फायदा झाला होता. पण मागील दोन वर्षांच्या करोना काळात खालावलेल्या आर्थिक परिस्थितीने या वर्षी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीची मागणी घटली असून पुन्हा भाविक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकडे वळत आहेत. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या करोना वैश्विक महामारीने आर्थिकचक्र कोलमडल्याने अनेकांच्या नोकऱ्या, कामधंदे ठप्प झाले. यामुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्यात सणांवरील निर्बंधसुद्धा कमी केल्याने सणांचा उत्साह वाढला आहे. या वर्षी गणेशोत्सव मंडळांची संख्या आणि घरगुती गणपती वाढले आहेत.

पण मूर्तीच्या वाढत्या किमती पुन्हा नवे प्रश्न निर्माण करत असल्याने नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडूच्या, लाल मातीच्या मूर्तीकडे पाठ फिरवत पुन्हा पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची मागणी वाढवली आहे.

शाडूच्या आणि मातीच्या मूर्तीच्या तुलनेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्वस्त दरात उपलब्ध असल्याने नागरिक या मूर्तीची मागणी अधिक करत असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. त्यात अजूनही काही पर्यावरणप्रेमी या मूर्ती खरेदी करत आहेत. पण त्यांच्या मूर्तीची उंची कमी केली आहे.

बंदी असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठय़ा प्रमाणात दाखल होत आहेत. एका वर्षांसाठी बंदी उठवल्यानंतर त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे पुन्हा या मूर्तीमध्ये वाढ होत आहे.

बंदीबाबत निर्णय नसल्यामुळे ‘पीओपी’च्या मूर्तीत वाढ

न्यायालयाकडून  २०१२ मध्ये बंदी आणली  असतानाही त्यावर आजतागयत प्रखरतेने अंमलबजावणी झाली नसल्याने सातत्याने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बाजारात येत आहेत.  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  मागील वर्षी एका वर्षांसाठी बंदी  पुढे ढकलली  होती. पण यावर्षी या बाबत कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे मागणी वाढल्याने  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठय़ा प्रमाणत या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.

किंमत दुप्पट

विरारमधील मूर्तिकार समीर ढगे यांचा गणेश शाडूच्या मूर्तीचा कारखाना प्रसिद्ध आहे. करोना काळापूर्वी ते आपल्या कारखान्यातून ७०० ते ८०० मूर्ती विकल्या जात होत्या. पण मागील दोन वर्षांपासून हे प्रमाण प्रचंड प्रमाणात घटले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सरासरी केवळ १०० ते १२५ मूर्ती  विकल्या जात असल्याचे सांगितले. ढगे यांनी सांगितले की, शाडूच्या, लाल मातीच्या मूर्ती २००० ते २१०० रुपये फूटप्रमाणे विकल्या जातात तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती १००० ते १२०० फूटप्रमाणे विकल्या जात आहेत. आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे अनेकांनी हे निर्णय घेतले आहेत.