नालासोपारा पूर्वेकडील विवा टाऊनशिपजवळील प्रकार; पालिकेच्या सफाई विभागाकडून हेळसांड

वसई: नालासोपारा पूर्व स्थित विवा टाऊनशिप येथील डी-मार्ट जवळील रहदारीच्या ठिकाणी पालिकेकडून नालेसफाई करण्यात आलेला गाळयुक्त कचरा टाकला जाऊ लागला आहे. यामुळे या आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना या दरुगधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

नालासोपारा पूर्वेतील भागात विवा टाऊनशिप परिसर आहे. या ठिकाणी मोठय़ा संख्येची नागरी वस्ती आहे. याच ठिकाणी असलेल्या वृंदावन गार्डनच्या जवळील मोकळ्या मैदानात पालिकेच्या ठेकेदाराकडून नालेसफाई करण्यात येणारा गाळयुक्त कचरा आणून टाकला जात आहे. या कचऱ्याची दरुगधी हवेद्वारे सर्वत्र पसरू लागली आहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिक व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे.

मागील काही दिवसांपासून या ठिकाणी गाळयुक्त कचऱ्याने भरलेल्या गाडय़ा आणून खाली केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे गाळभरलेल्या कचऱ्याचे छोटे छोटे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. यामुळे आजूबाजूच्या भागात दरुगधीचे वातावरण पसरले आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात नागरीवस्ती असलेल्या ठिकाणीच पालिकेकडून दरुगधीयुक्त कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच करोनाचे संकट त्यात या कचऱ्याची दरुगधी यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते चरण भट म्हणाले की, पालिकेचे ठेकेदार गाळ व इतर कचरा हा नागरी वस्ती जवळ आणून टाकत आहे. या दरुगधीचा त्रास येथील नागरिकांना होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्या ठिकाणच्या भागात गाळयुक्त कचरा टाकला जातो याची संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल व त्यानुसार त्यावर पुढील उपाययोजना करण्यात येईल. तसेच हा कचरा नागरीवस्ती वगळता इतर कोणत्या ठिकाणी टाकता येईल याचाही विचार होईल.

— प्रदीप आवडेकर, सहायक आयुक्त, प्रभाग समिती ‘ड’