सखल भाग पुन्हा पाण्याखाली

वसई: उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा  शुक्रवारी सकाळपासून वसई-विरारमधील विविध ठिकाणच्या भागात दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे काही ठिकाणचे सखल भाग पुन्हा पाण्याखाली गेल्याने काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बुधवारपासून वसईत पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यानंतर गुरुवारी पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे अनेक सखल भागातील पाणी ओसरले होते. मात्र शुक्रवारी पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे चित्र दिसून आले आहे.

सकाळच्या सुमारास विरार पट्टय़ातील भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस कोसळत होता. यामध्ये विरार पूर्व पश्चिम जोडणारा प्रमुख मार्ग विवा कॉलेज रस्ता सकाळपासूनच पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागरिकांना  मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात सकाळपासूनच गुडघाभर पाणी साचले आहे. याठिकाणी अनेक इमारतीच्या तळ मजल्यापर्यंत पाणी साचले आहे.यामुळे अनेक इमारतींची वीजसुद्धा बंद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नाळेभागातही रस्त्यालगतच्या गटारातील गाळ योग्यरीत्या काढण्यात आला नसल्याचे रस्त्यावर पाणी साचून राहिले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसेच दुपारनंतर इतर सर्वच ठिकाणच्या भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. यात नालासोपारा पूर्वेतील तुळिंज , संतोष भवन, आचोळे रोड, तर नायगाव पूर्वेतील स्टार सिटीजवळ यासह इतर ठिकाणच्या भागात पाणी  साचले असल्याचे चित्र दिसून आले आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने विरार पूर्वेतील वैतरणा तळ्याचा पाडा येथे भले मोठे चिंचेचे झाड उन्मळून पडले. या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन तातडीने पडलेले झाड तोडण्यात आले.

वसईत शुक्रवारी सकाळपासून पाऊस सुरू झाल्याने दिवसभरात सरासरी ६५. १६ मिलीमीटरइतके पर्जन्यमान झाले आहे. तर १ जून ते ११ जून या दरम्यान वसई तालुक्यात एकूण ३६४.१२ इतक्या पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे.