५० वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या रहिवाशांची पालिका, पोलिसांकडे धाव

विरार : नायगाव परिसरातील एका ५ दशकांहून अधिक काळ राहणाऱ्या भाडेकरूंना रस्त्यावर काढून मालकाने जागा हडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. या संदर्भात रहिवाशांनी पालिका आणि पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे. पण अजूनही या रहिवाशांच्या घरावर टांगती तलवार लटकत आहे.

वसई पूर्व नायगाव परिसरात मोती सदन नावाची चाळ आहे. या चाळीत १० कुटुंबे मागील ५० वर्षांहून अधिक काळापासून भाडेतत्त्वावर राहत आहेत. पण या चाळीच्या मालकाने मागील काही महिन्यापासून ही चाळ तोडून इमारत उभारण्याचा घाट घातला आहे. याला रहिवाशांनी विरोध दर्शवला असता मालकाने वेगवेगळ्या युक्त्या लढवायला सुरुवात केली आहे.  पालिकेने  इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावत रहिवाशांना घर खाली करण्याचे आदेश बजावले आहेत. यामुळे रहिवाशांच्या चिंता वाढल्या आहेत.  या आदेशानुसार रहिवाशांनी पालिकेत जाऊन इमारतीची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी            पालिकेला हमीपत्रसुद्धा दिले.  त्यानुसार रहिवाशांनी इमारतीची डागडुजी करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली. पण मालकांनी त्यांना विरोध करत ठेकेदाराला काम करू न दिल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

येथील रहिवासी कुंदा पाखाडे यांनी माहिती दिली की, मागील दोन वर्षांपासून आम्ही मालकाला चाळ दुरुस्त करण्याची मागणी करत आहोत. पण मालक विविध करणे देऊन आम्हाला घर खाली करण्यासाठी जोर देत आहेत. यामुळे आम्ही आमच्या खर्चाने चाळीची दुरुस्ती करत आहोत. पण त्यालासुद्धा मालक विरोध करत आहेत. यासाठी आम्ही मालकाला वकिलातर्फे नोटीस बजावली आहे. तर पालिके ने मात्र महिनाभराच्या आत घर खाली करण्यास सांगितले आहे. पण रहिवाशांची आर्थिक स्थिती नसल्याने घर खाली करून कुठे जाणार. आणि जर तातडीने इमारतीची दुरुस्ती नाही केली तर रहिवाशांच्या जिवाला धोका आहे. यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

” रहिवाशांनी आम्हाला नोटीस बजावली आहे, मालक असल्याने इमारतीच्या दुरुस्तीचे काम मला विश्वासात घेऊन करणे गरजेचे आहे. पण तसे केले नाही, भाडेकरूंचा विरोध असल्याने विकासकाने इमारत बांधण्यास नकार दिला आहे. आमच्याकडून भाडेकरूंना कुठलीही जबरदस्ती केली जात नाही”

– विश्वनाथ राऊत – चाळीचे मालक

” या संदर्भात अनेक वेळा माहिती दिली आहे, यामुळे आता मला कोणतीही माहिती द्यायची नाही. तुम्ही प्रभाग अभियंत्याशी माहिती घ्या”

– प्रताप कोळी – सहायक आयुक्त, वसई विरार महानगरपालिका