रेखित धनादेश वटवणारा उच्चशिक्षित तरुण गजाआड

वसई: रेखित धनादेश (क्रॉस चेक) हे केवळ ग्राहकाच्या खात्यावरच वटले जात असल्याने ते सर्वात सुरक्षित मानले जातात. मात्र वसईतील एका उच्चशिक्षित तरुणाने बँकेच्या धनादेश ठेवण्यासाठीच्या पेटीमध्ये (ड्रॉप बॉक्स) टाकलेले ग्राहकांचे रेखित धनादेश क्लुप्ती लावून वटवून लाखो रुपयांचा अपहार केला आहे. त्याची ही अनोखी शक्कल पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत. विरार पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

धनादेश हे दोन प्रकारचे असतात. एक कोरे धनादेश आणि दुसरे कोपऱ्यावर  रेखितअसलेले धनादेश असतात. रेघा असलेले धनादेश केवळ ग्राहकाच्या खात्यावरच वटले जात असल्याने ते आजवर सर्वात सुरक्षित मानले जात होते. मात्र वसईतील पीयूष शर्मा (३२) हा बीटेक झालेला उच्चशिक्षित तरुण आगळीवेगळी शक्कल लढवून रेघा असलेले धनादेश वटवून लाखो रुपयांचा अपहार करत होता. स्टेट बँक ऑफ इंडियाने याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून शर्मा याला कौशल्याने अटक केली.

अशी होती कार्यपद्धती

ग्राहक आपले धनादेश वटविण्यासाठी बँकांच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकतात. हे ड्रॉप बॉक्स काचेचे असल्याने धनादेश कुणाच्या नावाचे असतात, ते सहज दिसतं. नेमकं याचाच आरोपी शर्माने उपयोग केला. तो बँकेत जाऊन ड्रॉप बॉक्समधील धनादेशावरील नाव वाचायचा आणि लगेच गूगलवरून कोरा आधारकार्ड फॉर्म डाऊनलोड करायचा. या आधार कार्डावर धनादेशावरील व्यक्तीचे नाव टाकून बनावट आधारकार्ड तयार करायचा. त्यानंतर बॅंकेत जाऊन तो धनादेश शिल्लक नसल्याचे कारण देत पुन्हा मागायचा. बँकेला खात्री पटविण्यासाठी बनावट आधार कार्ड दाखवायचा.

त्यामुळे हा धनादेश संबंधित ग्राहकाचाच आहे अशी बँकेला खात्री पटायची आणि ते त्याला धनादेश परत करायचे. हा धनादेश घेऊन त्यावरील दोन रेघा ओल्या खोडरबरने पुसून टाकायचा आणि बँकेच्या दुसऱ्या शाखेत जाऊन वटवायचा. अशा प्रकारे त्याने ड्रॉप बॉक्समधील ७० धनादेश हस्तगत केले आणि त्यातील २५ धनादेश वटवले होते, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. या प्रकरणात त्याने पाच लाखांहून अधिक रक्कम लंपास केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.

कौशल्याने तपास

बँकेत जाताना तो चेहऱ्यावर मुखपट्टी आणि टोपी घालायचा. त्यामुळे सीसीटीव्हीत त्याचा चेहरा दिसत नव्हता. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, प्रपुल्ल वाघ, अभिजित टेलर, संदेश राणे आदींच्या पथकाने कौशल्याने तपास केला. अशा प्रकारचे गुन्हेगार तपासले. एक संशयित आढळला. त्याच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन हे गुन्ह्यच्या ठिकाणचे आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक केली.