वसई: वसई-विरार महापालिकेने करोना नियंत्रणात आणण्यासाठी  लसीकरण केंद्रासोबतच  आता शहरातील विविध ठिकाणच्या भागात मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष करून जे नागरिक लसीकरण केंद्रापर्यंत पोहचू शकत नाही अशा नागरिकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा वसई— विरार शहराला बसला आहे. मोठय़ा संख्येने रुग्ण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे होते. त्यानुसार जानेवारीपासून पालिकेने शहरातील विविध केंद्रावर लसीकरणही सुरू केले होते. परंतु लशीची मात्रा मिळविण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी जमत होती.

तर काही ठिकाणी लसीकरण करवून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या. तर कधी कधी रांगा लावूनही नागरिकांना लस मिळत नव्हती. तर कधी कधी गोंधळ निर्माण होत होता.  यात विशेष करून वयोवृद्ध नागरिक, अपंग नागरिक, व इतर व्याधी असलेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत होता. अशा नागरिकांचे लसीकरण सुलभतेने व्हावे यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.पालिकेच्या प्रत्येक प्रभागात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागातील दर दिवशी लसीकरण करण्याच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणी मोबाईल व्हॅन उभी करून नागरिकांचे लसीकरण करवून घेतले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.  यात आदिवासी पाडे व झोपडपट्टी या भागातील ४५ वर्षांवरील नागरिक, ७५ वर्षांवरील नागरिक गतीमंद, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त अशा नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तयार करण्यात आलेल्या या व्हॅन मध्ये डेटा ऑपरेटर, डॉक्टर, नर्स , बेड, टेबल  व लसीकरण करून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे आराम करण्यासाठी १० जणांच्या बसण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

महापालिकेने आता मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण देण्यास सुरुवात केली आहे. यात वयोवृद्ध, गतीमंद , दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

डॉ. विनय सालपुरे, वैद्यकीय अधिकारी दिवाणमान प्राथमिक आरोग्य केंद्र