वसई: करोनाकाळात थंडावलेल्या पालिकेच्या परिवहन विभागाच्या सेवेने पुन्हा जोमाने सुरवात केली आहे. सध्या १३ मार्गावर ४१ बसेस धावत आहेत. शासनाने दिलेल्या र्निबधाचे पालन करून मर्यादित प्रवासी घेऊन ही परिवहन सेवा सुरू आहे. सध्या या ४१ बसेसमधून दररोज १५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत,

करोनाकाळात जुन्या ठेकेदाराने परिवहन सेवा बंद केल्याने पालिकेने जानेवारी महिन्यात नवीन ठेकेदार नेमून परिवहन सेवा सुरू केली होती. मात्र या सेवेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचे ग्रहण लागले आणि परिवहन सेवेत खंड पडला.

शासनाने टाळेबंदी जाहीर केल्याने काही ठरावीक मार्गावर ही सेवा सुरू होती. शासनाने निर्बंध उठविल्यानंतर पुन्हा नव्याने परिवहन सेवा सुरू झाली होती. सध्या १३ प्रमुख मार्गावर ही सेवा सुरू  करण्यात आली आहे. पूर्वी परिवहन सेवेच्या बसेस ३८ मार्गावर धावत होत्या. मात्र वसई विरार टप्पा क्रमांक ३ मध्ये असल्याने केवळ १३ मार्गावर ४१ बस सेवा सुरू  करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शासनाच्या निर्देशाप्रमाणे मर्यादित प्रवासी घेण्याचे बंधन असल्याने प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आहेत. तरीदेखील दिवसाला या बसेसमधून १५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत, अशी माहिती परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी दिली. वसई विरार शहर दुसऱ्या टप्प्यात आल्यानंतर मार्गाची आणि बसेसची संख्या वाढवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल लसीकरणाला चांगला प्रतिसाद

परिवहन विभागाने ९ बसेस या मोबाइल लसीकरण मोहिमेसाठी पालिकेला उपलब्ध करून दिल्या आहेत. या मोबाइल लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  परिवहन सेवेच्या बसेसमधून ९ प्रभागात दररोज ही मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत मोबाईल लसीकरणाचे ८८ सत्र पूर्ण झाले असून ६६८ नागरिकांना त्याचा लाभ मिळालेला आहे.  दुर्गम भागात बसेसमधून महापालिकेचे कर्मचारी नागरिकांना लस देत आहेत. लसीकरणापूर्वी आशा स्वयंसेवी कार्यकर्त्यां झोपडपट्टी भागातील नागरिकांचे जाऊन प्रबोधन करून त्यांना लस देत आहेत, असे सभापती पाटील यांनी सांगितले.