वसई :  मुंबई मालवणी येथून तुंगारेश्वर धबधबा येथील पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांना  पोलिसांनी मज्जाव केल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी घडला होता. या मारहाण करणाऱ्या पर्यटकांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

वसईत पर्यटन बंदी लागू असतानाही काही हौशी पर्यटक  मोठय़ा संख्येने पर्यटक समुद्रकिनारी व धबधब्याच्या ठिकाणी येत असतात. वसई पूर्व तुंगारेश्वर येथे चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बुधवारी मूंबई मालवणी येथील आकाश दिलपे (२७), इमरान शेख (२०) व सुचिता दिलपे (२२) हे तीन जण वसईत आले होते. या वेळी तुंगारेश्वर धबधब्याकडे जाणारा मार्ग वालीव पोलिसांनी बाप्पा सीताराम मंदिर येथे बॅरिकेट लावून बंद केला होता.

या तिघांना तेथील पोलीस बंदोबस्तासाठी असलेले पोलीस हवालदार विनोद पावरा (२८) यांनी धबधब्याच्या ठिकाणी मज्जाव केला. यावरून या तीन जणांनी विनोद  यांना

धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. तसेच दगड मारून दुखापत करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणून पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस हवालदार विनोद पावरा यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार केली असता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली होती. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी वसईच्या न्यायालयात दाखल केले असता या तीन जणांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे वालीव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले आहे.