परिसर रस्ता बंद करण्याची नागरिकांकडून मागणी

विरार : सलग तीन दिवसांपासून पाण्याखाली असलेल्या वसई पश्चिमेकडील गास सनसिटी रस्त्यावर अजूनही तीन ते चार फूट पाणी साचलेले आहे. असे असतानाही या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असल्याने हा रस्ता पालिकेने बंद करावा,अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

रविवार कोसळलेल्या पावसामुळे वसईतील गास सनसिटी रोड अजूनही पाण्याखाली आहे. पश्चिमेकडून शहरात दाखल होण्यासाठी या रस्त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. पाणी साचले असतानाही वाहनाची वर्दळ या ठिकाणी आहे. रविवारी या परिसरात एक चार चाकी वाहून जात असताना तिला अग्निशमन दलाने वाचवले तर मंगळवारी एका प्रवासी बस या पाण्यात अडकली होती. यातील प्रवासी काढून ही बस बाहेर काढण्यात आली. अनेक दुचाकीस्वार केवळ  या पाण्यातून वाहने घेऊन जातात. त्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहने वाहून जाण्याचा धोका  आहे. यामुळे हा रस्ता पालिकेने बंद करावा, अशी मागणी येथील रहिवाशी करत आहेत.

पालिकेने पावसाळ्यात हा रस्ता बंद करणे अपेक्षित आहे. यासाठी स्थानिकांनी मागणीसुद्धा केली असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी प्रमोद नेमाडे यांनी सांगितले.

हा रस्ता वसईमार्गे गास, निर्मल, कलंब, नालासोपारा, विरार जाण्यासाठी शॉर्टकट असल्याने नागरिकांकडून त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. मंगळवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली तरी या परिसरातील पाणी ओसरताना दिसत नाही म्हणून पावसाळ्यात हा मार्ग बंद करावा अशी मागणी जोर धरत आहे.

पाणथळ जागेत रस्ता

मिळालेल्या माहितीनुसार सदरची जागा  पाणथळ जागा आहे, नालासोपारा गोगटे सोल्टच्या १५०० एकर भूमीतील ही जागा आहे. पालिकेने पूरजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणलेल्या निरी आणि आयआयटी या संस्थांनी या ठिकाणी पाणी निचरा करण्यासाठी धारण तलाव बांधण्याचे प्रस्ताव पालिकेला दिले आहेत. पण पालिकेने केवळ विकासकांच्या फायद्यासाठी या ठिकाणी हा रस्ता निर्माण केला असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी केला आहे. यामुळे हा रस्ताच अनधिकृत असल्याची माहिती यांनी दिली आहे.