जिल्हा परिषदेची चालढकल; अर्धवट पुलामुळे धोकादायक प्रवास करण्याची वेळ

वसई: विरार पूर्वेतील कण्हेर पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून धिम्या गतीने सुरू असल्याने येथील काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या पुलाखालून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

विरार पूर्वेतील भागातील कण्हेर गावा जवळ पाणी वाहून नेणारी नदी आहे. या नदीवर पूल तयार करण्यात आला होता. याच पुलावरून आजूबाजूच्या भागात राहणारे नागरिक प्रवास करीत होते. परंतु जुना पूल मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवीन पूल उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून डिसेंबर २०२० मध्ये या पुलाचे काम सुरू होईल अशी नोटीस लावण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कामाची सुरुवात ही मार्च २०२१ मध्ये करण्यात आली. त्यावेळी दोन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन येथील ग्रामस्थांना दिले होते.परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही आजतागायत या पुलाचे काम पूर्ण झाले नाही.

तयार करण्यात आलेला पूल हा ३०मीटर लांबीचा असून यासाठी अंदाजे १ कोटी २० लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या पुलाचे काम सुरू झाले तेव्हा वैतरणा येथील डोलीव, खार्डी, कोशिंबे, तळ्याचापाडा, जाधवपाडा, यासह इतर भागातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून भातशेती असलेल्या शेतीतून रस्ता करून देण्यात आला आहे.  उन्हाळ्यात ओढय़ाला पाणी नव्हते त्यावेळी येथून प्रवास सुरू होता. परंतु मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

नागरिक या रस्त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर करीत आहेत. जर ओढय़ाला अधिक पाणी आले तर येथील आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. सध्या पावसामुळे येथील नागरिकांना वैतरणा व विरारमार्गे वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.

कण्हेर पुलाचा वापर आजूबाजूच्या गावात राहणारे नागरिक मोठय़ा प्रमाणात करतात. परंतु नवीन पुलाचे काम पूर्ण न झाल्याने अडचणी येत आहेत. आता तर पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

– बाळा पाटील, नागरिक, वैतरणा

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात ओढय़ाला पाणी आले. यामुळे त्या ठिकाणच्या स्लॅबचे काम करता आले नाही. त्यातच आता पाऊसही सुरू झाल्याने काम करण्यास अडचणी आहेत. पावसातून उसंत मिळेल त्यानुसार पुढील काम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

सतीश शिंदे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, वसई