वसई: वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून यावर्षी १ हजार १०६घरकुले मंजूर करण्यात आली असून फक्त १८९ घरकुलेच पूर्ण झाली आहेत.
ग्रामीण भागात राहणाऱ्या कष्टकरी गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाच्या विविध घरकुल योजना राबविल्या जात आहेत. मागील काही वर्षपासून केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना ही प्रभावीपणे राबविली जात असून त्या योजनेतून गोरगरीब नागरिकांना घरकुल उभारणीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
प्रत्येक घरकुलासाठी तीन टप्प्यात एक लाख वीस हजार ते दीड लाखांपर्यँत अनुदान दिले जाते. यात त्या कामासाठी लागणाऱ्या मजुरीचा ही समावेश आहे. वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर आडणे, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, भाताने, चंद्रपाडा, कळंब, खार्डी, करंजोन, खानिवडे, खोचिवडे, माजीवली, मेढे, नागले, पारोळ, पोमण, रानगाव, सकवार, सायवन, शिरवली, शिवणसई, टेंभी, तिल्हेर , टोकरे, उसगाव, मालजीपाडा गावातील ग्रामपंचायत क्षेत्रात ही योजना राबविली जात आहे.
२०२४-२५ या वित्तीय वर्षात ग्रामीण भागात पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून १ हजार १०६इतक्या घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेच्या लाभाकरीता आवश्यक कागदपत्रे मागविली जात आहेत. त्यांची छाननी करून नंतर ते मंजूर केले जात आहेत. आतापर्यंत १ हजार १०७ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आली आहेत. तर नियमानुसार टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जात आहे असे विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ज्योतिर्मय पाटील यांनी सांगितले आहे.
उद्दिष्टपूर्तीला केवळ चार महिनेच
३१ मार्च २०२६ पर्यंत घरकुले पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण, शासनस्तरावर एक हजाराच्या वर घरं योजनेत मंजूर झाली असली. तरी सद्यस्थितीत १८९ घरकुलचं पूर्ण झाली आहेत. तर, ९१६ घरकुलांचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न आता उद्भवू लागला आहे.
निधी अपुराच
घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.याशिवाय मजूर खर्च ही वाढला आहे. त्यामुळे घरकुलासाठी दिले जाणाऱ्या अनुदानाचे पैसे अपुरे पडतात. त्यामुळे लाभार्थ्यांना स्वतःच्या जवळचे पैसे खर्चून घरकुल पूर्ण करावी लागत आहेत. यासाठी निधीची रक्कम वाढायला हवी अशी मागणी करण्यात येत आहे. काही वेळा घरकुल मंजूर होते. परंतु, वेळेत योजनेचे पैसे मिळत नसल्याने समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
