वसई: वाढत्या नागरिकरणाचा गैरफायदा घेत मिरा भाईंदर व वसई विरार शहरात बेकायदेशीर पणे परदेशी नागरिक वास्तव्यास येत असल्याच्या घटना समोर येत आहे. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना आवर घालण्यासाठी १ ऑगस्ट पासून पोलीस आयुक्तालयाने शोध मोहीम सुरू केली आहे. यात आढळून आलेल्या १२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांना हद्दपार केले आहे. 

मागील काही वर्षांपासून मिरा भाईंदर व वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः वसईच्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याने परिसर अतिशय दाटीवाटीचा बनला आहे. याचाच फायदा घेत परदेशी नागरिक छुप्या मार्गाने वास्तव्यास येऊ लागले आहेत. विशेषतः नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून शहरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विविध छुप्या मार्गांनी तसेच अवैध कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोर शहरात वास्तव्य करत आहेत.

अशा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या  बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मिरा -भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ ऑगस्ट पासून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत काशीमिरा, तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १२ बांगलादेशी नागरिक आढळून आले होते. यात सहा पुरुष, चार महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

चौकशीदरम्यान या नागरिकांकडे भारतात वास्तव्याचा कोणताही कायदेशीर पुरावा पोलिसांना सापडला नाही. तसेच अवैध कागदपत्रे सादर करून भारतीय कागदपत्र मिळवल्याचा आणि भारत-बांगलादेश सीमेवरून  अनधिकृतरित्या भारतात प्रवेश  केल्याचा खुलासा बांग्लादेशी नागरिकांनी  चौकशीदरम्यान केला. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील बागडोरा येथून या १२ बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर कारवाई मिरा -भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.