ग्रामसेवकाकडून २ लाखांचा प्रस्ताव; अर्नाळा ग्रामपंचायतीमधील अजब प्रकार उघडकीस

वसई : स्मशानभूमीचे झालेले नुकसान हे तौक्ते वादळात झाल्याचे दाखवून पंचनामा केल्याचा प्रकार विरारच्या अर्नाळा ग्रामपंचायतीत उघड झाला आहे. पत्रे नसताना ते वादळात उडून गेल्याचा पंचनामा करून ग्रामसेवकांनी २ लाखांची नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केला आहे. अर्नाळा ग्रामपंचायतीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका वसईच्या किनारपट्टीच्या भागाला बसला होता. यात अर्नाळा भागाला ही मोठा फटका बसला होता. यात अनेकांच्या घरांचे व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून पंचनामे करण्यास सांगितले होते. त्यानुसार नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात येत होते.

अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकेश संखे यांनी अर्नाळा गावातील स्मशानभूमीवरील पत्रे वादळात उडाल्याचे सांगून २ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. त्यानुसार त्यांनी पंचनामा करून २ लाख नुकसानभरपाईचा प्रस्ताव पंचायत समिती व तहसीलदार विभाग यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. परंतु करण्यात आलेला पंचनामा हा खोटा असल्याचा आरोप खुद्द ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश बावकर यांनी केला आहे.

अर्नाळा स्मशानभूमीची गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीवर छप्परच नाही विशेषत: पावसाळ्यात येथील भागात अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होतात. मात्र अशी स्थिती असतानाही ग्रामपंचायतीकडून येथील भागात पत्रे लावण्यात आलेले नव्हते. लोकसत्ताने देखील याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या स्मशानभूमीवर पत्रेच लावले नाही तर तौक्ते वादळात पत्रे उडणार कसे असा प्रश्न आहे. पत्रे नसतानाही खोटा पंचनामा करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पंकेश संखे  यांनी केला आहे. यासाठी त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश बावकर यांनी पालघर जिल्ह्यचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

ग्रामसेवक संखे यांनी आरोप फेटाळले

खोटा पंचनामा करण्यात आल्याचे आरोप ग्रामसेवक पंकेश संखे यांनी फेटाळून लावले आहेत. २०२० मध्ये स्मशानभूमी वरील काही पत्रे आधीच वाऱ्यामुळे तुटले होते. कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून जे काही पत्रे लटकत होते काढून टाकले होते. मात्र त्यानंतर त्याठिकाणी नव्याने पत्रे लावण्यात आले होते. मात्र यंदाच्या वर्षी झालेल्या तौक्ते वादळात ते पुन्हा उडून गेले आहेत. त्यामुळे त्याचा पंचनामा करून शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकेश संखे यांनी सांगितले आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या पंचनाम्याच्या संदर्भात जर काही तक्रार असेल तर त्याची शहानिशा केली जाईल व संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल.

– उज्वला भगत, तहसीलदार, वसई