महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि अपघातांतही वाढ
वसई : वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यांत महामार्गावर घडलेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यासोबत अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेषत: मागील दोन वर्षांंपासून महामार्गावर अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अतिवेगाने वाहने चालविणे, वाहनांवरील नियंत्रण सुटणे, बंद वाहनांना धडका लागणे, काही भागांत रस्त्याची झालेली लेन कटिंग, अपुरे दुभाजक, पथदिव्यांचा अभाव अशा विविध कारणांमुळे अपघात घडत आहेत.
२०२३ या वर्षांच्या सुरुवातीच्या दहिसर टोलनाका ते शिरसाड या दरम्यान तीन महिन्यांतच २० जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवासी जखमी व पाच प्रवासी हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. याआधीच्या वर्षांत संपूर्ण वर्षभरात सरासरी १८ ते २० जणांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण होते. मात्र हेच प्रमाण मागील वर्षांपासून वाढीस लागले आहे.
उपाययोजना अर्धवट
महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्राधिकरणाकडून वर्षभरापासून रमलर लावणे, रस्ते दुरुस्ती, सूचना फलक लावणे अशा उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र त्या सुद्धा उपाययोजना अपुऱ्याच आहेत. अजूनही बहुतांश उड्डाणपूल हे पथदिव्यांचा अभाव आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना अडचणी येतात तर दुसरीकडे जे सेवा रस्ते आहेत ते कचरा व राडारोडा याने भरलेले आहेत. त्यामुळे विश्रांतीसाठीची वाहने सुद्धा मुख्य रस्त्यावर उभी केली जात आहेत.
अपघात आकडेवारी
वर्ष जखमी मृत्यू
२०१९ ७० २०
२०२० ९६ १२
२०२१ ८६ १५
२०२२ ५४ ५९
२०२३ २३ २०
महामार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानातून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. वाहनचालकांनी ही नियमांचे पालन करून वाहने चालवावीत. -विठ्ठल चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक, चिंचोटी