वसई- वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागातील २७ आयुर्वेदीक डॉक्टरांना सेवेत कायम करण्यात आले आहे. नगरविकास खात्याने हा अध्यादेश काढला आहे. गेल्या काही वर्षांपासून कायम होण्यासाठी लढा देणार्‍या डॉक्टरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई विरार महापालिकेत सुमारे दिडशे आयुर्वेदीक वैद्यकीय अधिकारी (बीएमएमएस) आणि एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत. हे सर्व डॉक्टर्स ठेका पध्दतीवर काम करत आहेत. २०१४ मध्ये पालिकेचा आकृतीबंध प्रसिध्द झाला होता. तेव्हा २७ बीएमएमस आणि ५६ सामान्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या (एमबीबीएस) डॉक्टरांच्या कायम जागा होत्या. मात्र आकृतीबंध प्रसिध्द होऊनही या डॉक्टरांना कायम सेवेत घेण्यात आले नव्हते. त्यांना कायम सेवेत घेण्यासाठी सातत्याने शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू होता. आयुर्वेदीक तसेच एमबीबीएस डॉक्टरांना कायम सेवेत घेण्यासाठी शासनाकडे एकूण ५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी २७ आयुर्वेद डॉक्टरांना कायम सेवेत समावेशन करण्याचा प्रस्ताव मंंजूर केला असून नगरविकास खात्याने अध्यादेश काढला आहे.

आणखी १८ आयुर्वेदीक डॉक्टरही कायम होणार

वसई विरार महापालिकेत सध्या केवळ ५ एमबीबीएस डॉक्टर्स ठेका पध्दतीने कार्यरत असून कायम पदांच्या ५७ पदे रिक्त आहेत. या ५ एमबीबीएस डॉक्टरांना कायम करण्याता प्रस्तावही शासनाकडे मंजुरीसाठी विचाराधीन आहे. नियमानुसार सर्वसामान्य वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पदासाठी ३३ टक्के जागा या आयुर्वेदीक डॉक्टरांच्या भरता येतात. त्यामुळे पालिकेत काम करणारे उर्वरित १८ आयु्वेदीक डॉक्टर्सही कायम होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने अध्यादेश काढला असली तरी या २७ डॉक्टरांना विविध अटी शर्थींची पूर्तता करायची आहे. ती झाल्यानंतर त्यांना पालिका कायम सेवेत घेईल, असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.