एकाच दिवसात ३६ हजार जणांना मात्रा; नियोजनाच्या अभावामुळे गोंधळ

वसई: गेल्या अनेक दिवसांपासून वसई-विरार शहरात लसटंचाई असल्याने नागरिकांचे हाल होत होते. मात्र बुधवारी शहरात अचानक ३६ हजार लशी देण्यात आल्या. प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने लशी आल्याने नागरिकांची झुंबड उडाली होती. दुसरीकडे नियोजनाचा अभाव आणि ऑनलाइन त्रुटीचा गोंधळाचा फटका नागरिकांना बसला

करोना प्रतिबंधात्मक लशींचे देण्यास जानेवारीपासून सुरुवात झाली होती. मात्र वसई विरार शहरात या मोफत लशींचा मोठी टंचाई निर्माण झाली होती. राज्य शासनाकडून लशी येत नसल्याने पालिकेची केंद्रे बंद असायची. मात्र मंगळवारी राज्य सरकारकडून पालघर जिल्ह्यासाठी ५८ हजार लशींचा साठा देण्यात आला. त्यातील वसई-विरार शहर आणि वसईच्या ग्रामीण भागासाठी ३६ हजार ५०० लशींचे वितरण करण्यात आले. शहरात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर लशींचा साठा मिळाला होता.मंगळवारी संध्याकाळी या लशींची माहिती देण्यात आल्याने मंगळवार रात्री पासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केली होती. पालिकेने ५१ केंद्रांवर ३३ हजार लशी दिल्या तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २२ ठिकाणी साडेचार हजार लशींचे वितरण करण्यात आले होते. पालिकेला २९ हजार कोव्हिशिल्ड  आणि तीन हजार कोवॅक्सिन लशींचा साठा मिळाला होता. तो आम्ही सर्व केंद्रावर नागरिकांना मोफत वितरित केला अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दिली.

कामण केंद्राचे नाव वगळल्याने संताप

शहरातील ५१ केंद्रांवर भरभरून लशी वितरीत केल्या गेल्या होत्या. मात्र वसई पूर्वेच्या कामण केंद्रावर लस दिली नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केल्या. मंगळवारी पालिकेच्या पहिल्या यादीत कामण केंद्रावर १ हजार लशी वितरित करण्यात येणार असे सांगण्यात आले होते. परंतु ऐनवेळी केंद्राचे नाव वगळले असा आरोप कामणचे माजी नगरसेवक दिनेश म्हात्रे यांनी केला. याबाबत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कामण केंद्रावर लस पाठविण्यात आली. आम्हाला लस मिळू नये यासाठी राजकारण केले जात असून यासाठी संबंधित आरोग्य अधिकारी आणि पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली

विरारमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ

विरार पूर्वेच्या रानळे तलाव येथील केंद्रावर १००० मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पण दुपारीच या मात्रा संपल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. यामुळे याठिकाणी एकच गोंधळ उडाला. तर नारंगी प्राथमिक केंद्रावर रिक्षा चालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. येथे ५०० मात्रा उपलब्ध केल्या होत्या. यासाठी रिक्षाचालकांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यात सामान्य नागरिकसुद्धा याठिकाणी लस मिळविण्यासाठी रांगा लावत असल्याने त्यांना परतवण्यास स्थानिक कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. तर मोरेगाव येथे तृतीयपंथी साठी ६०० मात्रा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तर धानीव येथे महिलांसाठी विशेष मोहीम घेवून ५०० मात्रा, बोळींज येथे ८०० उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तर झालावाड येथील केंद्रावर ७५० मात्रा, बोळींज येथे ५००, कर्मवीर केंद्रावर ४०० आणि एव्हर शाइन केंद्रावर ५०० मात्रा महिला बचत गटासाठी उपलब्ध केल्या होत्या. तर तुळींज रुग्णालयात परदेशी नागरिकांसाठी २०० मात्रा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

रात्रीपासून रांगा आणि पालिकेचा ढिसाळपणा

मोठय़ा प्रमाणावर लशी आल्याने त्या आपल्याला मिळतील या आशेपोटी सर्वच केंद्रावर नागरिकांनी आदल्या रात्रीपासूनच रांगा लावल्या.  ऑनलाइन नोंदणीची वेळ सकाळी ९ वाजता असते. मात्र पालिकेने मंगळवार रात्री १० पासूनच नोंदणीला सुरुवात केली. त्याची माहिती व्यवस्थित न दिल्याने नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. दुसरीकडे प्रत्यक्ष केंद्रावर असलेल्या लशी असल्या तरी ऑनलाइन नोंदणीच्या वेळी त्या दाखवल्या जात नसल्याच्या तक्रारी होत्या.  नवीन केंद्रावर पालिकेने लशी उपलब्ध करून दिल्या. त्याची माहितीच नागरिकांना नव्हती.    गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कुठलीच यंत्रणा नव्हती. त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आम्ही सर्व लशी एकाच दिवसात देण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजातील सर्व घटकांना लस मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये आणि नियमांचे पालन करावे

-डॉ. सुरेखा वाळके, मुख्य आरोग्य अधिकारी, वसई विरार महापालिका

मीरा-भाईंदर शहरातील पाच लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात लसीकरण मोहीम सातत्याने राबवण्यात येत असून आतापर्यंत तब्बल पाच लाख ९ हजार ८६ लसी नागरिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण ४७ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका शहराला बसू नये म्हणून  शहरातील नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याकडे प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. याकरीता शहरात  ३३ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार  लसीकरण मोहीम पार पाडण्यात येते.

त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील ७ लाख ६५ हजार ८०५ नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याचे ध्येय  निश्चित करण्यात आले आहे. त्यात  तीन लाख ४९ हजार  ८४२ नागरिकांनी प्रथम मात्रा घेतली आहे. तर  एक लाख ५९ हजार २४४ नागरिकांची दोन्ही मात्रा पुर्ण झाली आहे. त्यानुसार प्रशासनाकडून ५ लाख ९ हजार ०८६ लस देण्यात आल्या आहे.यामुळे लसीकरण मोहीम सुरळीत सुरू असून  येत्या काळात जलदगतीने लसीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती लसीकरण प्रमुख अंजली पाटील यांनी दिली.

पुरुषांसाठी विशेष लसीकरण मोहीम

वसई: वसईच्या ग्रामीण भागात महिलांच्या विशेष लसीकरणा पाठोपाठ आता पुरुष वर्गासाठी सुद्धा विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. बुधवारी या मोहिमेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील चार हजार ८०० इतक्या पुरुषांचे लसीकरण करण्यात आले.

मागील काही दिवसापासून वसईच्या ग्रामीण भागात लशींचा कमी प्रमाणात साठा उपलब्ध होत आहे. तर दुसरीकडे आता राज्य शासनाने लशींचे दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठय़ा संख्येने कामगारांची लसीकरण केंद्रावर झुंबड उडते. याच अनुषंगाने वसईच्या ग्रामीण भागातील टीवरी, नागले, पोमण, कामण, शिवणसई, पारोळ, तिल्हेर, करंजोन, दहिसर, माजीवली, भाताने, खानिवडे, कण्हेर, निर्मळ, कळंब, रानगाव, अर्नाळा, टेम्भी कोल्हापूर, सत्पाळा, तरखड, भुईगाव, नाला, गास अशा २२ ठिकाणी लसीकरण केंद्रावर केवळ पुरुषांसाठी विशेष लसीकरण मोहीम घेण्यात आली. या सर्व केंद्रांवर मिळून चार हजार ८०० इतक्या पुरुषांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पुरुषांसाठी लसीकरण मोहीम असल्याने कामगार पुरुष वर्गाने सकाळपासूनच विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र  दिसून आले.

या विशेष लसीकरण मोहिमेचा कामगार वर्गातील पुरुषांना चांगलाच फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. शासनाने ग्रामीण भागाचा विचार करता जास्त प्रमाणात लशीं उपलब्ध करून सर्वच वयोगटातील नागरिकांचे लसीकरण लवकर पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.