विरार : आजारपणाने आलेल्या नैराश्यातून ८१ वर्षीय वृध्दाने आपल्या ७४ वर्षीय पत्नीची चाकूने वार करून हत्या केली. पत्नीला ठार मारल्यानंतर स्वत:च्या अंगावरही चाकूचे वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर रुग्णालयात वेळीच उपचार झाल्याने तो थोडक्यात बचावला आहे.

वसई पश्चिमेच्या सांडोर परिसरातील कराडी वाडी येथे अर्पिना परेरा (७४) आणि ग्रेबिएल परेरा (८१) हे वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलासोबत राहत होते. वृध्दापकाळामुळे परेरा दांपत्य आजारी असायचे. त्यामुळे गॅब्रियल नैराश्यात होता. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास गॅब्रिएल यांचा मुलगा आणि सून नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी गॅर्बिएल यांनी पत्नीवर चाकूचे वार केले आणि नंतर स्वत:वर वार केले.

काही वेळाने मुलगा आणि सून घरी परतल्यानंतर त्यांनी गंभीर जखमी असलेल्या आई वडिलांना रूग्णालयात दाखल केले. मात्र अर्पिना यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. ग्रेबिएल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गॅब्रिएल परेरा यांच्याविरोधात कलम १०३ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.