सुहास बिऱ्हाडे
वसई : गणेशोत्सव विसर्जनादरम्यान तलावांमधील प्रदूषण रोखण्यासाठी वसई- विरार महापालिकेने यंदा अनोखा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. कृत्रिम तलावांच्या निर्मिती बरोबर शहरातील तलावांच्या ठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्त्यां संकलीत करून त्या शहरातील दगडखाणीतील तलावात पालिकेतर्फे विसर्जित केल्या जाणार आहे. याशिवाय भाविकांना गणेशमूर्त्यांचे विसर्जन न करता त्या दान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. यामुळे तलावांचे प्रदूषण थांबणार आहे.

दोन वर्षांनंतर करोनाचे संकट टळल्यानंतर यंदा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात संपन्न होणार आहे. गणेशोत्सवात गणेशमूर्त्यांच्या विसर्जनावेळी तलावांचे प्रदूषण होत असते.पालिका दरवर्षी या तलावांचे सुभोभीकरण, साफसफाई करत असते. पण विसर्जनामुळे तलाव अस्वच्छ होतो आणि तलावातील जीवसृष्टी नष्ट होत असतात. ते रोखण्यासाठी यंदा पालिकेने त्रिस्तरीय अभिनव आणि अनोखी योजना तयार केली आहे.

दगडखाणीत मूर्त्यांचे विसर्जन
शहरात विसर्जनासाठी एकूण २० तलाव आहेत. पालिकेने जवळ आणि विसर्जन मार्गावर कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहे. विसर्जनासाठी आलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्त्यां या कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जातील. तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यां पालिका जमा करणार आहे. एका ट्रक मधून या मूर्त्यां शहरातील पाच मोठय़ा दगडखाणीती पाण्यात विसर्जित करणार आहे. त्या करण्यापूर्वी मंडळांच्या पदाधिकार्?यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मूर्त्यां कृत्रिम तलावात सोडून लगेच जमा केल्या जाणार आहेत. यामुळे भाविकांना विधिवत विसर्जनाचे समाधान मिळणार आहे. ४ फुटांच्या मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि दगडखाणीत केले जाणार आहे. तर ४ फूटावरील मूर्त्यांचे विसर्जन हे समुद्रात केले जाणार आहे.

मूर्त्यां दान करण्याचे आवाहन
यंदा पालिका पुण्याच्या धर्तीवर मूर्त्यां दान करण्याचे आवाहन करणार आहे. म्हणजे मूर्त्यांंचे विसर्जन न करता त्या भाविकांनी पालिकेला दान करायच्या. या मूर्त्यां जमा करून नंतर त्याची विधिवत विल्हेवाट लावली जाणार आहे. त्या मूर्त्यांची माती विविध कंपन्यांना दिली जाणार आहे.

फिरते कृत्रिम तलाव
गेल्या काही वर्षांपासून भाविक सामाजिक भान जपत शाडू मातीच्या आणि लहान मूर्त्यां आणतात. पण विसर्जन करण्यासाठी जाताना मिरवणूक काढतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि ध्वनी प्रदूषण होत असते. हे रोखण्यासाठी फिरते कृत्रिम तलाव करून नागरिकांच्या दारात नेल जाणार आहे. एका मोठय़ा ट्रक किंवा टेम्पो मध्ये हौद ठेवण्यात येईल आणि हा ट्रक प्रत्येक विभागात फिरत राहील. नागरिकांनी विसर्जन मिरवणूक न काढता या ट्रक मधील हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करायचे आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही हा प्रयोग राबवत असून कुठल्याही प्रकारे परंपरा आणि धार्मिक भावना दुखावली जाणार नाही. यामुळे सणाचे पावित्र्य अबाधित राहून हा सण अधिक मंगलमय होणार आहे. सुजाण नागरिक सकारात्मकतेने या प्रयोगाचे स्वागत करून प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावतील अशी आशा आहे.— अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार महापालिका

यामुळे शहरातील तलाव स्वच्छ राहतील, विसर्जनाच्या वेळी होणार्?या दुर्घटना टळतील. ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी आदी प्रकारांना आळा बसेल. यानिमित्त वसई विरार महापालिका एक आदर्श घालून देण्याचा प्रय करणार आहे.— आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका