वसई: वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर व कडेला अजूनही बेवारस अवस्थेत वाहने पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही वाहने हटविण्यात आली नसल्याने राहदारीला अडथळे ठरत आहेत.अशा बेवारस वाहनांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी पुढे येत आहे.
वसई विरार शहरात वर्षानुवर्षे रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहने व भंगार साहित्य यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. त्यासोबत शहरातील वाहतुकीस अडथळा तयार होऊन वाहने चालविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शहरात आधीच रस्ते अरुंद व वाहनांची संख्या अधिक आहे. त्यातच बेवारस व भंगारात गेलेली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून रस्ते गिळंकृत होऊ लागले आहेत.
वर्षानुवर्षे वर्षे ही वाहने एका जागीच उभी राहत असल्याने समस्या निर्माण होत असतात. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथला निर्माण होत असतो. याशिवाय रस्त्यावरून नागरिकांना ये जा करणेही अडचणीचे ठरते. तर दुसरीकडे या वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वाहने ही तशीच पडून असल्याने अशा वाहनांत आजूबाजूच्या भागातील लहान मुले ही खेळण्यास जात असतात त्यामुळेही एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असते. तर काही वेळा गर्दुल्ले ही अशा बेवारस वाहनांचा वापर गैरप्रकारासाठी करण्याची शक्यता आहे.
विरार, नालासोपारा, वसई अशा सर्वच भागात बेवारस वाहने उभी असल्याचे दिसून येतात असे प्रवाशांनी सांगितले आहे.शहरातील रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही वाहने व भंगार साहित्य रस्त्यावर पडून राहिल्याने योग्य रित्या स्वच्छता करता येत नाही. मध्यंतरी महापालिका व वाहतूक पोलीस यांच्या तर्फे बेवारस वाहने हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. आता ती मोहीम थंडावली असल्याने बेवारस वाहने तशीच पडून राहिली आहेत असे नागरिकांनी सांगितले आहे.
पालिकेकडून वाहने हटविल्याचा दावा
वसई विरार महापालिकेने बेवारस वाहने हटविण्यात येत असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागांत सर्वेक्षण करून ज्या ज्या भागात वाहने आहेत ती उचलली जात आहेत. मागील पाच महिन्यात नऊ प्रभागात १४३ बेवारस वाहने उचलण्यात आल्याचे पालिकेच्या परिवहन विभागाने सांगितले आहे.सातत्याने ही कारवाई सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
टोइंग साठी तत्परता मात्र बेवारस वाहनांसाठी उदासीनता
वसई विरार मधील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे , रहदारीचे रस्ते अशा विविध ठिकाणच्या भागात वाहने उभी केली जातात. या वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागाकडून टोइंग करून उचलली जातात. मात्र वर्षानुवर्षे धूळखात व रस्त्यावर उभी असलेली बेवारस वाहने उचलली जात नाही. त्यामुळे तिथे तत्परता आहे तशी इथे का नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.