|| कल्पेश भोईर

किनाऱ्याजवळील नागरिकांना दिलासा

वसई : मागील काही वर्षांपासून वसईच्या किनारपट्टीच्या भागात तयार करण्यात येत असलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे रखडली होती. मात्र मागील वर्षभरापासून या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामेही वेगाने सुरू झाल्याने या कामाला चांगलीच गती मिळाली आहे. सध्या वसईच्या भागातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची ६० ते ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

वसईच्या किनाऱ्याची होणारी धूप व किनारपट्टीच्या भागांचे लाटांपासून संरक्षण व्हावे यासाठी वसईच्या किनारपट्टीच्या भागात धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याची कामे पतन विभागाने हाती घेतली आहेत. यात अर्नाळा किल्ला २५० मीटर, अर्नाळा १५० मीटर, रानगाव, भुईगाव, कळंब प्रत्येकी १०० मीटर अशा पाच ठिकाणच्या किनारपट्टीच्या भागात ही कामे सुरू केली आहेत. यासाठी ११.५० कोटी रुपये इतक्या निधीची ही तरतूद केली आहे. ही कामे पाच वर्षांपूर्वी मंजूर झाली होती.

मात्र धूपप्रतिबंधक बंधारे तयार करताना सीआरझेड परवानगी, टीएस परवानगी अशा परवानग्या प्रस्ताव टाकूनही मिळत नव्हत्या. त्यामुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. २०१९ पासून परवानगी मिळण्यास सुरुवात झाली तेव्हापासून हळूहळू धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यातच करोनाचे संकट आल्याने या कामाला खीळ बसली होती. करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याची कामे सुरू केल्याची माहिती पतन विभागाकडून देण्यात आली आहे.

सध्या भुईगाव आणि रानगाव या दोन्ही भागांतील शंभर मीटरचे बंधारे तयार झाले आहेत. तर कळंब भागातील बंधाऱ्यांचा एक भाग पूर्ण झाला आहे. अर्नाळा किल्ला येथील २५० मीटरपैकी १०० मीटर इतके काम झाले असून बाकीचे काम प्रगतिपथावर आहे, तर दुसरीकडे अर्नाळा येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी पर्यावरण विभागाची परवानगी न मिळाल्याने हे काम अजूनही सुरू करता आले नाही. परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पतन विभागाचे शाखा अभियंता कल्पेश सावंत यांनी सांगितले आहे. तसेच उर्वरित बंधाऱ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत, ती लवकरच पूर्ण केली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.