घरोघरी जाऊन पडताळणी तसेच जागोजागी औषध फवारणी
भाईंदर : मीरा भाईंदर शहरात डेंग्यू व हिवतापाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने पालिका प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने जागोजागी औषध फवारणी करण्यात येत असून नागरिकांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचत असून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. अशा परिस्थितीत करोनासह डेंग्यू व हिवताप या साथीच्या आजारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या आजाराचा संसर्ग वाढण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळवण्याकारिता पालिका प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. अन्यथा शहरात डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णात वाढ झाल्यास करोनाबाधित रुग्णांना शोधण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे करोनासह इतर साथीच्या आजाराचा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
शहरातील जागोजागी औषध फवारणी करण्यात येत असून कोणत्या परिसरात पाणी साचले आहे याचा शोध घेतला जात आहे. यासह घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत असून घरातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात येत आहे. याकरिता प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या औषध फवारणीचे काम हे ‘ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट’ या कचऱ्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडूनच करण्यात येत आहे. याकरिता १८० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून प्रत्येक विभागाप्रमाणे कर्मचाऱ्यांची विभागणी केली आहे. प्रत्येक प्रभागात औषध फवारणीकरिता टेम्पो तैनात केला असून नगरसेवकांच्या मदतीने फवारणीचे काम पार पडत आहे. त्यामुळे आतापर्यंत डेंग्यू व हिवतापाचे रुग्ण कमी असले तरी त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हिवताप अधिकारी नंदकुमार लहाने यांनी केले आहे.
नगरसेविकेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा
भाईंदर पूर्व येथील प्रभाग क्रमांक २४ येथील मुर्धा गावात पालिका प्रशासनाकडून औषध फवारणीचे काम करण्यात येत होते. या प्रसंगी स्थानिक भाजप नगरसेविका नयना म्हात्रे आणि शिवसेना शहर संघटक तेजस्विनी पाटील यांमध्ये वादास सुरुवात झाली. त्यावेळी म्हात्रे यांनी पाटील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यामुळे भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.