मीरा-भाईंदरमध्ये आरटीईअंतर्गत २५१ विद्यार्थ्यांचे खासगी शाळेत प्रवेश

बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते.

प्रतिनिधिक छायाचित्र

भाईंदर : करोना आजाराच्या पाश्र्वाभूमीवर यंदा मीरा-भाईंदर मधील खासगी शाळेत २५१ गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे ही विद्यार्थी संख्या गत वर्षाच्या तुलनेत दुप्पट असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

 बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. मिरा भाईंदर शहरातील ९०  अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.२०१८-१९ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या प्रवेश प्रक्रियेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती नव्हती. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेस प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळाले. परंतु, कालांतराने या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात झाली असून या प्रक्रियेला नागरिकांचा  प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार मीरा-भाईंदर मागील चार वर्षांत ५४८ विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे.

यामध्ये सन २०१८-१९ वर्षात ५२ आणि २०१९-२० वर्षात ८० विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे. तर, करोनासारख्या परिस्थितीतही मागील वर्षी या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत १६५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. यंदाच्या वर्षी राबविण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला शाळा व्यवस्थापनासह पालकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे २०२१-२२ या कालावधीत तब्बल २५१ विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश मिळाला असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

जनजागृती करीता प्रशासनाचे प्रयत्न

मीरा-भाईंदर शहरात एकूण ९० शाळा आहे.या शाळेत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते.मात्र याकरिता सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती पुरेश्या प्रमाणात होत नसल्यामुळे  विद्यार्थांना प्रवेश मिळणे अवघड होत होते.तर अनेक खासगी शाळा चालक या नियमांचे पालन करत नसल्याची तक्रार वारंवार पालिका प्रशासनाला करण्यात येत होती. त्यामुळे खासगी शाळेत गरजू विद्यार्थांना शिक्षणाचा लाभ मिळावा याकरिता जनजागृती मोहीम राबवणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Admission of 251 students in private schools under rte in mira bhayandar akp