वसई : शहरात बॉम्बहल्ले होत असताना आम्ही बंकरमध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हते. सुखरूप परतायची आशा नव्हती, पण सुदैवाने मी माझ्या घरी पोहोचली, अशा शब्दांत युक्रेनमधून परतलेल्या वसईच्या ऐश्वर्या राठोड या तरुणीने आपला थरारक अनुभव सांगितला.

वसईच्या वसंत नगरी येथे राहणारी ऐश्वर्या राठोड (२१) ही तरुणी युक्रेनमध्ये वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेण्यासाठी गेली होती. गुरुवारी रात्री ती रोमानियावरून इतर भारतीय विद्यार्थ्यांबरोब सी-१७ या विशेष विमानाने भारतात परतली. युद्धभूमीतून सुखरूप परतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. वसईत परतल्यानंतर तिने युक्रेन शहरात आलेले भीषण अनुभव सांगितले. ती विनित्सिया शहरात राहात होती. तिचे तिसरे वर्ष पुर्ण होत आले होते. त्याच वेळी युद्धाचे सावट पसरले.

आम्ही नॅशनल पिरोगावा हॉस्टेलमध्ये राहात होतो. शहरात दोन बॉम्बहल्ले झाले. मुलांना बंकरमध्ये लपायला सांगितले. हा अनुभव भयानक होता. कधी काय घडेल याची खात्री नव्हती. त्यामुळे खूप भीती वाटत होती, असे ऐश्वर्याने सांगितले. बाहेर कसे पडायचे हे माहीत नव्हते. दरम्यान, दूतावासाने सीमा पार करून रोमानियापर्यंत पोहोचा असे सांगितले होते. आम्ही दाटीवाटीने बसमध्ये बसलो. १२ तासांनी आम्ही रोमानिया सीमेवर पोहोचलो. पण तेथे प्रचंड गर्दी होती. युक्रेन देशातील लोकदेखील देश सोडून जात होते. ते आम्हाला धक्काबुक्की करत होते. आम्हाला तेथे सापत्न वागणूक मिळत होती, असे तिने सांगितले.

आमचे सर्वाधिक हाल सीमेवर झाले. १२ तास आम्ही सीमेवर अडकून पडलो होतो. तापमान उणे सेल्सिअसमध्ये होते. बर्फ पडत होता. प्रसाधनगृहाची सोय नव्हती. त्यामुळे खूप हाल झाले, असे ऐश्वर्या म्हणाली. बसायलादेखील जागा नव्हती. एक वेळ वाटले की आम्ही सुखरूप सीमा पार करू शकणार नाही. पण सुदैवाने आम्ही सीमा पार करू शकलो आणि नंतर भारताच्या सी-१७ विमानाने दिल्लीत आलो. चालून चालून माझे पाय सुजले आणि कमालीचा मानसिक आणि शारीरीक थकवा जाणवत असल्याचे तिने सांगितले.

खूप प्रयत्न करूनही तिकीट मिळाले नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युद्धाच्या आधी भारतीय मुले युक्रेनमधून का परतली नाहीत, असा आरोप या मुलांवर करण्यात येत आहे. त्याला ऐश्वर्याचे वडील गोविंद राठोड यांनी सांगितले की, युद्धाची चाहूल लागताच आम्ही विमान तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र आम्हाला तिकीट मिळत नव्हते. एकही विमान उपलब्ध नव्हते. मी १८ तारखेपासूनच आरक्षणासाठी प्रयत्न करत होतो. पण एकही विमान मिळाले नाही. मला ४ मार्चचे तिकीट मिळाले पण ती विमानदेखील मिळू शकले नाही,  या गदारोळात एक भारतीय विद्यार्थी मारला गेल्याची बातमी आली आणि काळजात धस्स झाले होतं, असेही ते म्हणाले.