वसई:-नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील तलाव व उद्यान याच्या देखभालीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने तलाव प्रदूषित झाला आहे. तर दुसरीकडे उद्यानातील साहित्य मोडकळीस आले असून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या उद्यानात येणारे नागरिक व लहानमुलांची गैरसोय होऊ लागली आहे.
नायगाव पूर्वच्या जूचंद्र परिसरात अनेक वर्षे जुने तलाव आहे. मागील काही वर्षांपूर्वी वसई विरार महापालिकेने हे तलावाचे सुशोभिकरण करून उद्यान तयार केले आहे.
मात्र सद्यस्थितीत या तलावाची देखभाल दुरुस्ती योग्य रित्या होत नसल्याने या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
विशेषतः तलावातील कचरा, निर्माल्य हे वेळीच काढून टाकले जात नसल्याने त्यातील पाणी प्रदूषित झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय गाळ उपसा ही केलेला नाही त्यामुळे तलाव अधिकच बकाल दिसू लागले आहे.
तर दुसरीकडे गावातील नागरिक व लहान मुलं यांना एक विरंगुळा म्हणून उद्यान तयार केले आहे. त्यात विविध प्रकारची खेळणी बसविले आहेत. तर खुली व्यायाम शाळा ही तयार केले आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी व लहान मुलं यात खेळण्यासाठी येत असतात.
परंतु त्यातील व्यायाम व खेळण्याचे साहित्य ही तुटले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अपघात होऊ शकतो असे सामाजिक कार्यकर्ते चेतन घरत यांनी सांगितले आहे. साईदुर्गा मित्र मंडळाने या उद्यानातील खेळणी व फिटनेस साहित्य बदलण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केलेली होती. किंबहुना; लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणारे साहित्य काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केलेली होती. परंतु पालिका या मागणीची दखल घेत नसल्याचे घरत यांनी सांगितले आहे.
पालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेले उद्यान तलावाची देखभाल होत नसल्याने ही दुरवस्था दिसून येत आहे.
पालिकेने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
पालिकेकडून उपाययोजना करण्याच्या सूचना
जूचंद्र तलावाचे स्वच्छता करण्याचे काम महिलाबचत गटा मार्फत पाहिले जात आहे. या तलावाची स्वच्छता करवून घेतली जात आहे. जे साहित्य तुटले आहे ते ठेकेदाराला सांगून दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. असे प्रभाग समिती जी चे सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी सांगितले आहे. याशिवाय तलाव ही स्वच्छ करून घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.