लसवंतांना नव्याने तर लस न घेताही प्रमाणपत्र, तांत्रिक दोषाचे कारण असल्याचे स्पष्टीकरण

सुहास बिऱ्हाडे

वसई: पालघर जिल्ह्यत सर्वाधिक लसीकरण होत असल्याचे आकडे जाहीर होत असताना दुसरीकडे अनेक लसवंतांना पुन्हा नव्याने लस प्रमाणपत्र मिळू लागले आहे. त्यामुळे लशींचे वाढीव आकडे जाहीर केले जात असल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. दरम्यान, वसईत अनेक ठिकाणी लस न घेताही प्रमाणपत्र दिले जात असल्याचा आरोप आगरी सेनेने केला आहे. जिल्ह्यच्या आरोग्य विभागाने असे प्रकार होत असल्याचे मान्य केले असून तांत्रिक दोषाचे कारण दिले आहे.

केंद्र शासनाने नुकतेच १०० कोटीं लसमात्रा दिल्याचे जाहीर केले होते. मुंबईतही शंभर टक्के जणांना लशीच्या पहिल्या मात्रा दिल्याचे जाहीर झाले होते. पालघर जिल्हा देखील लसीकरणात आघाडीवर आहे. लशीची पहिली मात्रा ७५ टक्के  आणि दुसरी मात्रा ३२ टक्के जणांनी घेतल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. मात्र आता अनेक जणांना लशींच्या दोन्ही मात्रा घेऊनही पुन्हा लस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि संदेश येत असल्याचे सांगितले आहे. यामुळे लसीकरणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वसईत राहणाऱ्या माधवी गवाणकर या ज्येष्ठ नागरिक महिलेने मार्च महिन्यात पहिली मात्रा आणि मे महिन्यात दुसरी मात्रा घेतली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाला लशीचे दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले. विशेष म्हणजे या दोन्ही लशी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात घेतल्याचे त्यात नमूद केले होते. ९ नोव्हेंबरला दुसरी मात्रा घेतली असे त्या प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आले होते. ते पाहून गवाणकर यांना धक्का बसला कारण त्यांनी दोन्ही मात्रा वसईत ७ महिन्यांपूर्वी घेतल्या होत्या. मग आता हे प्रमाणपत्र कसे आले असा त्यांना प्रश्न पडला. अशा प्रकारच्या तक्रारी अनेक जणांनी केल्या आहेत.

माझ्या आईने नोंदणी माझ्या मोबाइलवरून केली होती. त्यावरून माझ्या आईला यापूर्वीच लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले होते. मग हे नवीन प्रमाणपत्र आले कसे? असा सवाल करून या मागे केवळ तांत्रिक दोष नाही तर लशींचे आकडे वाढविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप या ज्येष्ठ नागरिक महिलेचे पुत्र चिन्मय गवाणकर यांनी केला आहे.

याबाबत पालघर जिल्ह्यचे लसीकरण समन्वयक अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तांत्रिक दोषांमुळे असे प्रकार होत असल्याची कबुली त्यांनी दिली. मार्च महिन्यात  कोविन अ‍ॅप बाबत नागरिाकंना फार माहिती नव्हती. त्यामुळे एकापेक्षा अधिक मोबाईलवर नोंदणी केली जात होती. त्यामुळे असे प्रकार घडत असावेत असे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यच्या लसीकरण मोहिमेच्या तांत्रिक विभागाने देखील ही तांत्रिक चूक असल्याचे सांगितले. दुरूस्तीसाठी आम्ही केंद्रीय समितीकडे अनेक प्रकरणे पाठवली असल्याचे या विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. युनिव्हर्सल पास घेताना अनेकांनी चुकीचे नंबर दिले असावेत किंवा नंबर टाकताना चूक झाली असावी अशी शक्यता त्यांनी वर्तवली. मात्र आकडे वाढविण्याचा काही प्रकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लस न घेता प्रमाणपत्र 

वसई विरार महापालिकेसह मिरा भाईंदर महापालिकेत सध्या लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र दुसरीकडे मोठा वर्ग लस घेण्यास नकार देत आहे. परंतु लस न घेता लसीकरण प्रमाणपत्र मिळविण्याचेही प्रकार घडू लागले आहे. वसईतील अनेक केंद्रात लस न देता प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा आरोप आगरी सेनेचे प्रवक्ते भूपेश कडूलकर यांनी केला आहे. पाचशे रुपयांमध्ये लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. अशा प्रकारची प्रमाणपत्रे कुणी देत असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.