वसई: नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड वर असलेल्या साईदीप इमारतीमध्ये दुसऱ्या माळावर स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून इमारतीमधील राहणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड शिर्डी नगर येथे साईदीप नावाची चार मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये ३८ कुटुंब राहत आहेत. शनिवारी अचानकपणे या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक २०१ चा स्लॅब कोसळून खाली पडल्याची घटना समोर आली आहे. या घडलेल्या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी पोहचून कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पालिकेने या जुन्या इमारतीचे लेखापरीक्षण करून ही इमारत २०२१ मध्ये धोकादायक ठरविली होती. ही इमारत रिकामी करून दुरुस्त करायची होती.तशा नोटिसा ही येथील नागरिकांना दिल्या होत्या. मात्र तरीही धोकादायक अवस्थेत या भागात नागरिक राहत होते.या स्लॅब कोसळण्याच्या घटनेनंतर पालिकेने येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. काही कुटुंब ही आपल्या नातेवाईकांकडे जात आहेत तर काही पालिकेच्या संक्रमण शिबिरात जाणार आहेत अशी माहिती प्रभाग समिती डी च्या प्रभारी सहायक आयुक्त मनाली शिंदे यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील आठवड्यात नालासोपारा हनुमाननगर भागात असलेल्या जैनम या अतिधोकादायक इमारत कलंडली होती तेव्हा ५० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करून इमारत जमीनदोस्त केली होती.ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरात स्लॅब कोसळण्याची घटना समोर आल्याने धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.