वसई : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी मंगळवारी भाजप मध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. सक्रीय राजकारणापासून ते अलिप्त होते. मात्र अचानकपणे त्यांनी भाजपशी घरोबा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वसई विरार शहरात आगामी महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांतराला सुरवात झाली आहे.भाजपाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून विविध पक्षातील प्रमुख नेते व कार्यकर्ते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मंगळवारी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी काही स्थानिक कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला. त्यात राजेश ठाकूर, सविता ठाकूर, रवी पाटील, राजेश पाटील, दिलीप भोईर, हर्ष म्हात्रे, धवल सतीश चोरघे, जन्मेजय प्रजापती, संदीप फाटक यांचा समावेश आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार स्नेहा दुबे- पंडित, आमदार राजन नाईक, भाजप जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोण आहेत महेश पाटील?
महेश पाटील हे हितेंद्र ठाकूरांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. तसेच बविआ मधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. उच्चशिक्षित असलेल्या महेश पाटील यांची अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. त्यांनी पक्ष सोडल्याने बविआला आणखीन एक धक्का बसल्याचे बोलले जात आहे.आठवडाभरा पूर्वीच बहुजन विकास आघाडीचे दिग्गज नेते नितीन ठाकूर, माजी नगरसेवक दिनेश भानुशाली यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला होता.