Anti Encroachment Drive Vasai Virar: विरार मध्ये धोकादायक अनधिकृत इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम आखली आहे. पहिल्याच दिवशी विविध ठिकाणच्या भागात सुमारे ५० हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.
वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत उभी राहू लागली आहे. यात बैठ्या चाळी, गाळे, लोड बेअरिंग इमारती यांचा समावेश आहे. ही अनधिकृत बांधकामे तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने आता हीच बांधकामे नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. नुकताच विरारमध्ये रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत ६० कुटुंबे बेघर झाली. या घटनेनंतर अनधिकृत आणि धोकादायक इमरातींचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम आखली आहे. यात प्रभाग निहाय पथके नियुक्त केली आहेत. सुरवातीच्या दोन दिवसातच नालासोपारा प्रगतीनगर मध्ये २८०० चौरस फूट, प्रभाग समिती सी सहकार नगर ४६०० चौरस फुट, प्रभाग समिती ई गास टाकीपाडा अनधिकृत इमारत ४४०० चौरस फुट, प्रभाग समिती एफ जाबरपाडा ४००० हजार चौरस फुट, प्रभाग जी मधील नाईकपाडा, कामण, गोखीवरे, तुंगारेश्वर येथे गाळे व चाळी ८८०० चौरस फुट, प्रभाग एच माणिकपूर १८७५ चौरस फुट, प्रभाग समिती आय खाऊ गल्ली अतिक्रमण १६८० चौरस फुट, तर विशेष नियोजन प्राधिकरणाने कण्हेर, खैरपाडा व विरार फाटा येथील २० हजार ९६० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित केले आहे. असे एकूण ४९ हजार ११५ इतके अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
शहरात ज्या भागात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ती तोडण्याच्या सूचना प्रत्येक प्रभागाला दिल्या आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरू झाली आहे. याशिवाय जे अनधिकृत धोकादायक इमारती आहेत त्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. – मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका
५० जणांचे पथक
गणेशोत्सव सरल्यानंतर तातडीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. कारवाईसाठी महापालिकेने प्रभागनिहाय १० पथके नियुक्त केली आहेत. एका पथकात ५ कर्मचारी यांचा समावेश ठेवण्यात आला आहे. अशा एकूण ५० जणांचा समावेश आहे.
…तर अधिकाऱ्यावर कारवाई
पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या सुचनेनंतर महापालिकेने शहरात अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. मात्र काही प्रभागात नियुक्त केलेले अधिकारी, अभियंते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे येऊ लागल्या आहेत. कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर ही कारवाई केली जाईल असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.