भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या कंटेनर शाखांना उत्तर देण्यासाठी भाजपनेही कंटेनर कार्यालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी मिरा रोड येथील महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर भाजपने आपले पहिले कंटेनर कार्यालय उभारले. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरात मागील दोन वर्षांत शिवसेनेने पंधरा पेक्षा अधिक कंटेनर शाखा रस्त्याच्या कडेला व पदपथांवर उभारल्या आहेत. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही, राजकीय दबावामुळे कारवाई टाळल्याचा आरोप आहे. सध्या काही भागांत पुन्हा नव्या शाखांची उभारणी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने अनोखी भूमिका घेत आयुक्त निवासस्थानासमोरच कार्यालय सुरू करून आपल्या नाराजीची ठोस भूमिका मांडली आहे.त्यानुसार सोमवारी या कार्यालयाचे उदघाटन आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनावेळी आमदार मेहता यांनी सांगितले की, “शहरात नियम धाब्यावर बसवून अनधिकृत कार्यालयांची वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हीही याच मार्गाने पहिले कंटेनर कार्यालय १२ मे रोजी उभारले आहे. लवकरच दुसरे कार्यालय महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.
लोकप्रतिनिधींवर नागरिकांची नाराज
देशात सध्या सुरक्षेच्या दृष्टीने तणावाचे वातावरण असताना, मिरा भाईंदरमधील नेते अनधिकृत कार्यालये उभारून राजकारण करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक या दोघांकडून चाललेली ही स्पर्धा पोलिस दलावर अतिरिक्त ताण आणत आहे. परिणामी नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे.