भाईंदर : भाईंदरमध्ये अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.भाईंदर पूर्व भागात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बऱ्याच वर्षांपूर्वी गोडदेव व नवघर गावाच्या वेशीवर स्मशानभूमीची उभारणी केली होती. यातील नवघर स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र मागील दीड वर्षांपासून हे काम सुरू असल्यामुळे ही स्मशानभूमी बंद आहे. परिणामी या भागातील नागरिकांना अंत्यविधीसाठी गोडदेव स्मशानभूमीत जावे लागत आहे.
परंतु गोडदेव स्मशानभूमीत देखील विकासकाम सुरू आहे. तसेच येथे एका दिवशी फक्त तीन जणांचा अंत्यविधी करण्याचीच सोय आहे. यापेक्षा अधिक मृतदेह अंत्यविधी आल्यास नागरिकांना रांगेत थांबावे लागते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नवघर स्मशानभूमी लवकर सुरू करण्याची मागील काही महिन्यापासून महापालिकेकडे करीत आहे असे स्थानिक नागरिक विशाल पाटील याने सांगितले आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात काशी नगर येथील एका कुटुंबाला देखील अंत्यविधीसाठी बराच वेळ थांबावे लागले. यामुळे संतप्त होऊन पाटील यांनी याबाबतचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केला. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्ते उद्घाटन सोहळा करण्याच्या हेतूने नवघर स्मशानभूमी सुरू केली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला आहे. तर, स्मशानभूमीचे काम अंतिम टप्प्यात असून ती लवकरच सुरू केली जाईल, अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता
भाईंदरच्या नवघर स्मशानभूमी बंद असल्यामुळे येथील नागरिक गोडदेव स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत. यामुळे गोडदेव स्मशानभूमीवर ताण वाढला आहे. मात्र येथे केवळ एकच कर्मचारी तैनात असल्याचे दिसून येते. परिणामी एकाच वेळी दोन अंत्यविधी करायचे असल्यास मोठी अडचण निर्माण होते. तसेच सर्व कामाचा ताण एका कर्मचाऱ्यावरच आल्यामुळे नाईलाजाने आलेल्या नागरिकांनाच लाकडे जमा करणे व इतर कामे करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.