भाईंदर: – तरण तलावात चिमुकल्याचा बुडून मृत्यू प्रकरणी सर्व स्तरातून जनक्षोभ उसळला.नागरिकांच्या वाढत्या जनआक्रोशामुळे  महापालिकेने गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाचे कंत्राट अखेर तात्पुरते रद्द करण्यात आले आहे. यासाठी चौकशी समिती नियुक्त करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

मात्र, घटनेनंतर तब्बल पाच दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आल्यामुळे  प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या रविवारी क्रीडा संकुलातील तरण तलावात ग्रंथ मुथा (वय ११) या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. संकुलातील व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

महापालिकेचे हे संकुल ‘साहस चारिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आले होते. घटनेनंतर महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला स्पष्टीकरण मागवले होते.दरम्यान, बुधवारी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलन करत पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर पालिकेने हे कंत्राट तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत चे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी जारी केले असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

तपासानंतर पुढील निर्णय

क्रीडा संकुलातील निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. त्यामुळे गुन्ह्यातील कलमे वाढवण्याच्या मागणीसाठी बुधवारी मृत मुलाचे वडील आणि शेकडो नागरिकांनी नवघर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

चौकशी समिती स्थापन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रीडा संकुलात घडलेल्या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांना केले असून त्यात शहर अभियंता व क्रीडा अधिकाऱ्यांना समाविष्ट केले आहे. प्रामुख्याने ही समिती क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराने केलेल्या सर्व कामकाजाचा आढावा घेणार आहे. याशिवाय नागरिकांनी केलेल्या आरोपाची चौकशी करून अहवाल आयुक्तांपुढे सादर करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.