वसई: वसई विरार शहरात रुग्णालये व दवाखान्यातून निघणारा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. तर दुसरीकडे त्यातील काही कचरा हा भंगारात ही दिला जात आहे. नुकताच एका भंगार गोदामात सलाईन व औषधसाठा आढळून आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई विरार शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठीपालिकेची  २ माताबाल संगोपनकेंद्र , ७  रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. तर, सुमारे ३३५ खासगी रुग्णालये आणि तेराशेहून अधिक  लहान दवाखाने आहेत. ही रुग्णालये व दवाखान्यांतून मोठ्या जैववैद्यकीय कचरा निर्माण होते. यातून साधारणपणे २७ हजार किलो इतका जैववैद्यकीय कचरा निघतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक संस्था नियुक्त केली असून त्यांच्याद्वारे याची विल्हेवाट लावली जाते.

शहरातील रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणावर जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती होते. मात्र तरीही काही ठिकाणी महापालिका हद्दीतील रस्त्यालगत, पदपथावर, नदीपात्राच्या कडेला जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. गोळ्या, औषधे, इंजेक्शनच्या सीरिंज असा कचरा टाकल्या जात असल्याची तक्रार नागरिकांमधून करण्यात येत आहे. नुकताच ‘आय’ प्रभाग समितीत वसई कोळीवाडा येथे एका भंगार गोदामात  सलाईन व औषधांचा ढिग आढळून आला आहे. त्यामुळे अशा जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य रित्या विल्हेवाट न लावता सर्रासपणे तो भंगारात व कचऱ्यात दिसून येत असल्याने कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जर अशाच प्रकारे असा कचरा रस्त्यावर किंवा भंगारात आढळून येत असेल तर ते अत्यंत गंभीर असून त्यातून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारे रस्त्यावर व भंगारात जैववैद्यकीय कचरा टाकून देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पालिकेकडून कारवाईचा इशारा 

नुकताच पालिकेच्या आरोग्य पथकाने  दवाखान्यांची तपासणी केली असता जे दवाखाने महानगरपालिकेकडे नोंदणीकृत नाहीत अशा दवाखान्यांत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा दवाखान्यांतील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कशाप्रकारे करण्यात येते याबाबत प्रश्न निर्माण होत आहे.

अशा डॉक्टरांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे प्रमाणपत्र घेणेबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर असे दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर  महानगरपालिका कार्यक्षेत्रात आढळल्यास जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिला आहे.

जैववैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्र पणे विल्हेवाट लावण्यासाठी संस्था नियुक्त केली आहे. त्यांच्याद्वारेच विल्हेवाट लावली जाते.  तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रमाणपत्र सक्तीचे केले असून नियमानुसार त्याची विल्हेवाट लावली जावे अशा सूचना केल्या आहे. :- डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी 

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने कारवाई करणार

जैव वैद्यकीय कचऱ्याच्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणपत्र दिले जाते शहरात उघड्या टाकल्या जाणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने शहरात कारवाई केली जाईल असे पालिकेने सांगितले आहे.