भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील १४६ विधानसभा मतदारसंघातील कामे नुकतीच गणेश नाईक यांनी मार्गी लावल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सदर मतदारसंघ हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा असून, त्यामुळे शहरात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीतील वादाचा मुद्दा पुढे आला आहे.येत्या १५ नोव्हेंबर रोजी मिरा भाईंदर शहरात भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
तब्बल अकरा वर्षांनंतर गणेश नाईक मिरा भाईंदर शहरात येत असल्यामुळे याबाबतची चर्चा शहरात जोरात रंगली आहे.त्यामुळे या कार्यक्रमासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मेहता यांनी गणेश नाईक यांच्या येण्यापूर्वीच शहरातील बहुतांश कामे मार्गी लागल्याचा उल्लेख केला आहे.
महत्वाची बाब म्हणजे १४६ विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली आदिवासी पाड्यांची कामे नुकतीच नाईक यांच्या हस्ते मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. यात रस्ता आणि स्मशानभूमीच्या कामांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रामुख्याने या मतदारसंघाचे नेतृत्व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करत आहेत. मागील काही महिन्यांपासून सरनाईक यांनी शहरात आपला प्रभाव वाढवला असल्यामुळे भाजपला त्याचा मोठा फटका बसत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.आता सरनाईक यांच्या मतदारसंघातील कामे देखील गणेश नाईक करत असल्याचे भासवून, भाजपने सरनाईकांना थेट राजकीय आव्हान दिल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
“१४६ विधानसभा मतदार संघात येत असलेल्या चेना व आसपास च्या गावची कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.ही कामे सरनाईक का मार्गी लावू शकले नाही याचे उत्तर मला माहित नाही. मात्र गणेश नाईक यांनी हे काम केल्यामुळे मी समाधानी आहे.” नरेंद्र मेहता- भाजप आमदार ( मिरा भाईंदर)
