वसई: वसई विरार शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ लागला आहे. नुकताच वसईच्या राजोडी परिसरात घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीर पणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केला आहे. यात ५२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
वसई विरार शहरात वाढत्या लोकसंख्येसोबतच गॅस सिलेंडरची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः घरगुती गॅस सोबतच व्यावसायिक सिलेंडरला ही जास्त मागणी असून ते चढ्या भावाने काळ्याबाजारात विकण्याचे प्रकार सुद्धा वाढू लागले आहेत. नुकताच वसई पश्चिमेच्या राजोडी येथे सहारा जीवन केंद्राच्या समोर असलेल्या घोड्यांच्या तबेल्यात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या मिळालेल्या माहिती नुसार पुरवठा विभागाने बुधवारी धाड टाकली. यात घरगुती गॅस मधून बेकायदेशीर व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले आहे.
नालासोपारातील दोन गॅस एजन्सी मध्ये गॅस पोहचविण्याचे (डिलिव्हरी) म्हणून काम करणाऱ्या क्षत्रगुण वाघमोडे व अमोल हाके या दोघांनी ५२ सिलेंडर घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरण करण्यासाठी घेतले होते. मात्र त्यांनी ते वितरित न करता बेकायदेशीरपणे व्यावसायि क गॅस सिलेंडर मध्ये भरुन त्याचा काळाबाजर करीत असल्याचे पुरवठा अधिकारी भागावत सोनार यांनी सांगितले आहे.
या कारवाईत ५२ सिलेंडर, इलेक्ट्रीक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार व रबरी पाईप तसेच पिकप टेम्पो असा ६ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात बी. एन एस कायदा २०२३ चे कलम २८७, २८८ जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३,७ एलपीजी (पुरवठा वितरण नियम) २००० चे कलम ३,४,५,६,७ तक्रार दाखल करण्यात आल्याचे भागवत सोनार यांनी सांगितले आहे.
पुरवठा विभागाने दिलेल्या तक्रारी नुसार अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे.
अशी केली जात होती रिफिल
गॅस वितरण करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी एक मोटार व गॅस पाईप घेऊन एका सिलेंडरची बाजू दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरले जात होते. घरगुती गॅस मधून १९ किलो वजनी व्यावसायिक गॅस मध्ये भरले जात होते.अशामुळेस्फोट होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप
सातत्याने गॅस सिलेंडरच्या किंमती वाढत असल्याने महागाईला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशातच घरगुती गॅसमध्ये काळाबाजार ग्राहकांना फसविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.घरगुती गॅस साधारपणे १४.२ किलो वजनाचा असतो मात्र त्यातील गॅस हा दुसऱ्या सिलेंडर मध्ये वर्ग करून त्याचा काळाबाजार केला जातो व नंतर तो गॅस सिलेंडर बाजारात चढ्या भावात विकला जातो. अशा प्रकारामुळे ग्राहकांची फसवणूक होते अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
कसा होतो गॅस सिलेंडरचा काळाबाजार ?
काळाबाजारातून सिलिंडर मिळविण्याचे तीन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे मुख्य वितरक, दुसरे म्हणजे ग्राहक आणि तिसरे म्हणजे गॅस वितरक (डिलिव्हर) करणारे कर्मचारी, असे सांगितले जाते.यात वितरकाकडून जास्त किंमतीने सिलेंडर घेऊन ते बाजारात चढ्या भावाने विकले जाते.
दुसरी बाब म्हणजे, अनेक ग्राहक असे आहेत की, त्यांच्या नावावर तीन ते चार सिलिंडर असतात. हे ग्राहक तेवढ्या प्रमाणात सिलिंडरचा वापर करीत नाहीत. त्यामुळे असे ग्राहक हेरून त्यांच्या नावावरील सिलिंडर काळाबाजारात जातात. गॅस डिलिव्हरी करणारे कर्मचारीही यात सहभागी असतात असे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘नंबर लागल्यानंतर आम्ही येऊन गेलो… मात्र तुमचे घर बंद होते… आता दोन तीन दिवस थांबा…,’ असे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उत्तरे असतात असा अनुभव ग्राहकांना येतो.