सुहास बिऱ्हाडे

गेल्या काही दिवसांपासून वसई विरारमध्ये सुनील वाडकर या बोगस डॉक्टरचे प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण केवळ एका बोगस डॉक्टरपुरते मर्यादित नसून त्याला पाठिशी घालणारी भ्रष्ट यंत्रणा, उदासीन प्रशासन आणि तपासात हलगर्जीपणा करणारे पोलीस याच्या वृत्तीचे आहे. वाडकर १४ वर्षे शहरात डॉक्टर म्हणून वावरत होता. त्यातील ७ वर्षे वसई-विरार पालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी होता. कुणीही त्याच्यावर संशय घेतला नाही. त्यापेक्षा संतापजनक बाब म्हणजे तपासात कमालीचा हलगर्जीपणा दाखविण्यात येत आहे. पुरावे असून कारवाई केली जात नाही तसेच आरोपीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. ते धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे.

गुन्हे शाखेने वसईतील एका रुग्णालयावर कारवाई करून ते रुग्णालय चालविणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक केली. त्याचे नाव समोर येताच सर्वाना धक्का बसला कारण हा डॉक्टर दुसरा तिसरा कुणी नसून तब्बल ७ वर्षे वसई विरार महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर होता. त्यामुळे तो बोगस कसा? आजवर का कळलं नाही? पालिकेत त्याची नियुक्ती केली कुणी? असे प्रश्न एकामागून एक निर्माण झाले. हे प्रकरण विरार पोलिसांकडे सोपविण्यात आले. या प्रकरणाच्या खोलात शिरल्यावर हे प्रकरण केवळ एका बोगस डॉक्टरचे नसून त्याला पाठिशी घालणारी भ्रष्ट यंत्रणा, उदासीन प्रशासन आणि तपासात हलगर्जीपणा करणारे पोलीस यांच्यापर्यंत जाते.

  • सुनील वाडकर डॉक्टर बनला कसा?

गुन्हे शाखेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने ८६८३५ हा वैद्यकीय व्यवसाय परवाना असल्याचे सांगितले. मात्र हा परवाना बंगळूरु येथील डॉ. सतीश मणी याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सांगितलं. विशेष म्हणजे २००७ पासून डॉ. सतीश मणी यांनी या परवान्याचे नूतनीकरण केलेले नव्हते. मग डॉ. मणी केले कुठे? डॉ. मणी १९९७ मध्ये वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर बनले होते. त्यामुळे दहा वर्षांत काही निवृत्त होणार नाही. मग ते परदेशात गेले की मरण पावले? सुनील वाडकर २००७ मध्ये डॉक्टर बनून पालिकेत आला होता. तेव्हापासून सतीश मणी यांचा पत्ता नाही. हा योगायोग आहे की अन्य काही? वाडकर जे ‘हायवे’ नावाचे रुग्णालय चालवायचा त्याला पालिकेची परवानगी होती. म्हणजे पालिकेत वैद्यकीय अधिकारी असताना वाडकर याने स्वत:च स्वत:च्या रुग्णालयाला परवानगी दिली होती. वाडकर याने पुन्हा मे २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्रसुतिगृहाच्या नावाखाली परवानगी मिळवली. म्हणजे एकाच रुग्णालयाला दोन वेगवेगळय़ा सरकारी यंत्रणांच्या पदव्या मिळवल्या होत्या. त्यातली खरी कुठली? या नोबेल रुग्णालयातील डॉक्टर दीपक पांडे पोलीस कारवाईनंतर पळून गेला आहे. तो सुद्धा बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हायवे रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक मुकेश भोईर हा रुग्णांना तपासत असल्याचे, स्वत: डॉक्टर म्हणून केसपेपरवर सही करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे या रुग्णालयात काय काय चाललं असेल त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. या काळात सुनील वाडकरने कितीतरी डेथ सर्टिफिकेट दिले, किती रुग्ण दगावले? ते तपासणं गरजेचं आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणात विरार पोलिसांच्या कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एवढं होऊनही डॉ. दीपक पांडेकडे चौकशी केलेली नाही. रुग्णालय सील केलेलं नाही. ज्या डॉ. सतीश मणीच्या नावावर वाडकर डॉक्टर म्हणून वावरत होता. तो कुठे आहे? रुग्णालयाला प्रमाणपत्र दिले कुणी? वाडकरची पालिकेत नियुक्ती केली कुणी? रुग्णवाहिका चालक भोईर डॉक्टर म्हणून रुग्णांना का तपासत होता याची चौकशी पोलिसांनी करणं अपेक्षित आहे. मात्र अद्याप ते झालेलं नाही. वाडकर दाम्पत्यावर अद्याप फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे आरोपींना पुरावा नष्ट करण्यास वेळ मिळत असून अटकपूर्व जामीनदेखील मिळू शकेल. आरोपीला खासगी वाहनातून न्यायालयात नेण्यात आलं होतं. पोलीस एवढे मेहेरबान का?

पालिकेत असा शिरकाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००७ मध्ये महापालिका नव्हती. नगर परिषदेत खासगी ठेकेदारामार्फत आरोग्य विभागात मनुष्यबळ भरती केली जात होती. वसईतील डॉ. आरती वाडकर यांना याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी आपल्या पतीला या कंत्राटाद्वारे वसई नगर परिषेदत भरती केलं. तेव्हापासून तो २००७ ते २००९ मध्ये नगर परिषदेत डॉक्टर म्हणून कार्यरत होता. २००९ साली वसई विरार महापालिकेची स्थापना झाली आणि आरोग्य विभाग तयार झाला. त्या वेळी तत्कालीन पालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी वाडकर याची मुख्य वैद्यकीय अधिकारीपदावर नेमणूक केली. त्या वेळीदेखील वाडकरची प्रमाणपत्रे तपासली गेली नव्हती. आता जेव्हा पालिकेने त्याच्या नियुक्तीची फाइल तयार केली तेव्हा वाडकर याचे एकही प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले. २००९ ते २०१३ पर्यंत तो मुख्य वैद्यकीय अधिकारी होता. तो पत्नीच्याच ठेक्याद्वारे आरोग्य विभागात डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करत होता (याच काळात एका डॉक्टरवर त्याने बलात्कार केला होता.). २०१३ मध्ये पालिकेने स्वत: आरोग्य विभागात भरती करायचे ठरवले तेव्हा िबग फुटेल म्हणून तो पालिकेतून राजीनामा देऊन बाहेर पडला. त्यांनतर त्याने विरारमध्ये ‘हायवे’ आणि नालासोपाऱ्यात ‘नोबेल’ नावाचे खासगी रुग्णालय सुरू केले.