scorecardresearch

इमारती पुनर्विकास प्रकल्पाचा वाद, जूनमध्ये रचला होता कट;समय चौहान हत्या प्रकरण

विरारमधील बांधकाम व्यावसायिक समय चौहान याची हत्या मागील वर्षी जून महिन्यात केली जाणार होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

crime
(प्रातिनिधिक छायाचित्र)

वसई : विरारमधील बांधकाम व्यावसायिक समय चौहान याची हत्या मागील वर्षी जून महिन्यात केली जाणार होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल दुबे याच्या अटकेनंतर ही बाब समोर आली आहे.
विरारमधील चाळी बांधणारा व्यावसायिक समय चौहान याची २६ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमांनी भर दुपारी गोळय़ा घालून हत्या केली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून बिहार राज्यातील बलिया येथून अटक केली. दुबे हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विरार पूर्वेच्या फुलपाडा येथे एक आदिवासी भूखंड विकसित करण्याचे काम २०१५ मध्ये राहुल दुबे याला मिळाले होते. त्याची प्रक्रिया सुरू असताना समय चौहान याने २०१९ मध्ये पुरस्पर मूळ मालकाशी करार केला आणि ११ इमारती बनविण्याचे काम मिळवले. यामुळे हा वाद निर्माण झाला होता. समय चौहान याचे वाढत
चाललेले प्रस्थ आणि त्याने हिसकावून नेलेला प्रकल्प यामुळे राहुल दुबे संतापला आणि त्याने समय चौहान याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
अशी केली हत्या
राहुल दुबे (३२) याने या कामासाठी कुख्यात मारेकऱ्यांना सुपारी दिली. त्यात मनीष सिंग, अजय सिंग, अभिषेक सिंग आणि राहुल शर्मा यांचा समावेश होता. मागील वर्षी १६ जून रोजी ते हत्या करण्यासाठी विरारमध्ये आले होते. परंतु एका मारेकऱ्याची तब्येत बिघडल्याने त्यांनी योजना पुढे ढकलली. दरम्यान, विरारमध्ये निशांत कदम या चाळ बिल्डरची हत्या झाली, पण समय चौहान त्यातून सुटला. त्यामुळे पुन्हा त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला. १६ फेब्रुवारी रोजी चारही आरोपींना दुबे याने विरारमध्ये आणले आणि समय चौहानच्या नित्यक्रमाची माहिती दिली. मनीष सिंग आणि राहुल शर्मा यांनी प्रत्यक्ष गोळय़ा झाडल्या तर अभिषेक सिंग आणि अजय सिंग यांनी पाळत ठेवली. हत्या केल्यानंतर चारही मारेकरी तीन वेगवेगळय़ा रिक्षा करून मुंबईत पसार झाले. आपले शस्त्र एका अज्ञात व्यक्तीकडे देऊन उत्तर प्रदेशात पळून गेले होते. यातील मनीष सिंग याच्यावर ३२ गुन्ह्यांची नोंद होती. तो पोलीस चकमकीत मारला गेला. तर अजय सिंग फरार झाला. मात्र पोलिसांनी राहुल शर्मा आणि अभिषेक यांना अटक केली.
९ जणांना अटक, कुख्यात गॅंगस्टरचा सहभाग
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. त्यात प्रमुख आरोपी राहुल दुबे याचा मेव्हुणा अॅ ड. आशीष शुक्ला याचाही सहभाग आहे. या गुन्ह्यातील पुरावे नष्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
आमच्या पथकाने केलेल्या कामाला यश मिळाले आहे. आम्ही पुरावे गोळा करून कारवाई करत आहोत. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. – सदानंद दाते, पोलीस उपायुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Building redevelopment project controversy chauhan murder case crime builders virar amy

ताज्या बातम्या